महात्मा गांधी आणि रा. स्व. संघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 
 
 
रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी हे दोन्ही नेते समकालीन. डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्या विचारांत कोठे साम्य आढळते, कोठे विसंगती दिसते आणि तरीही दोघांचे देशाच्या उत्कर्षाप्रति असलेले कार्य याचा आढावा या लेखात घेतला आहे.
 
 
रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि स्वातंत्र्य आंदोलनाचे सर्वश्रेष्ठ नेते महात्मा गांधीजी यांच्यातील परस्परसंबंध मतभेद, दृष्टिकोनातील फरक आणि अगदी मोजक्या प्रसंगी का होईना, त्यांच्यात घडून आलेला संवाद इ. चे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे तर तत्कालीन परिस्थिती, तिच्या विविध पैलूंचे स्वरूप आणि त्यावर उभयतांनी केलेले चिंतन यांचा विचार अपरिहार्य ठरतो. स्वाभाविकच स्वातंत्र्य आंदोलनाचा संदर्भ अपरिहार्यपणे लक्षात घेणे आवश्यक ठरते. डॉक्टर हेडगेवार यांचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग ठळक आणि महत्त्वाचा होता, ही वस्तुस्थिती आहे.
 
 
लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाविषयी डॉक्टरांच्या मनात अढळ आणि नितांत श्रद्धा होती. शालेय वयातच वयाच्या आठव्या वर्षी राणी व्हिक्टोरियाच्या राज्यरोहणाला साठ वर्षे झाल्याच्या निमित्ताने शाळेत वाटलेली मिठाई फेकून देणे, सीताबर्डी किल्ल्यावरील युनियन जॅक उतरविण्यासाठी आपल्या राहत्या घरापासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयार खोदण्याची अचाट कल्पना अंगिकारणे, यासारख्या प्रसंगांमधून त्यांच्या बालवयीन अंत:करणात गुलामी झुगारून देण्याविषयीची तळमळ प्रकट झाली. पुढे कोलकाता येथे वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर राष्ट्रीय शिक्षणावर गदा आणणार्‍या सरकारी परिपत्रकाविरुद्ध आंदोलन उभारण्यात डॉक्टर केशव अग्रभागी होते. हे आंदोलन उभे करण्यापूर्वीच डॉ. आशुतोष मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांचे समर्थन डॉक्टरांनी मिळवले होते. कोलकात्याच्या मुक्कामातच तेथील क्रांतिकारक समूहाशी त्यांचा नुसता संपर्क होता एवढेच नाही तर अनुशीलन समितीचे ते सभासदही होते. १९०८ पासून पुढे जवळजवळ दहा वर्षे, दुसर्‍या विश्वयुद्धाच्या अखेरीपर्यंत डॉक्टर भूमिगत क्रांतीकार्यात, क्रांतिकारकांना साहाय्य करण्यात सक्रिय होते. मात्र याच काळात लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीतही ते ठळकपणे आपला सहभाग नोंदवित होते. मध्य प्रांतातील होमरुल लीगमध्ये त्यांनी प्रवेश मिळविला होता आणि त्यांच्यामार्फत होणार्‍या छोट्यामोठ्या सभा-परिषदांमध्ये प्रोत्साहन भाषणे करण्यापासून लोकमान्यांच्या वर्‍हाडातील दौर्‍यात जागोजागी त्यांच्या स्वागताच्या आणि सभांच्या आयोजनांपर्यंत सर्व कामांमध्ये डॉक्टरांचा सहभाग अग्रभागी असे.
 
 
महायुद्धाच्या काळात गुप्तपणे संघटित केलेले सदस्य क्रांतीचे प्रयत्न अंतिमत: विफल झाले आणि क्रांतिकार गटांना अस्वस्थतेने आणि नैराश्याने ग्रासले. याच स्थितीगतीसंबंधीच्या सखोल चिंतनातून डॉक्टरांच्या मनात देशभक्तीच्या संस्कारांची मूलभूत आणि दीर्घगामी रुजवण करण्याचे आणि नि:स्वार्थी, ध्येयवादी नि दृढनिश्चयी तरुणांची संघटना निर्माण करण्याच्या संकल्पनेने बीजारोपण झाले, असे दिसते. नागपूरमध्ये होऊ घातलेल्या कॉंग्रेस अधिवेशनाच्या व्यवस्थांसाठी स्वयंसेवक दल उभे करण्याच्या कामात डॉक्टरांनी पुढाकार घेतला. डॉ. बा. शि. मुंजे, डॉ. ना. भा. खरे, बॅ. अभ्यंकर, भवानीशंकर नियोगी आदी टिळक अनुयायांच्या प्रभावाखाली वर्‍हाड प्रांतातील कॉंग्रेस काम करीत होती. त्याच मांदियाळीत त्या सर्वांमध्ये वयाने काहीसे लहान पण मन:स्थितीने अत्यंत जहाल असलेले डॉक्टर हेडगेवारही सहभागी असत. निर्भेळ स्वातंत्र्याचा उद्घोष त्या काळात डॉक्टर अत्यंत निर्भिडपणे करू लागले होते. कॉंग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये साम्राज्याअंतर्गत स्वराज्य याच उद्दिष्टाचा अंगीकार करण्याची मानसिकता प्रकट होत होती. याच वातावरणात डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधीजी यांचा परस्परांशी संपर्क निर्माण झाला.
 
 
या दिवसातील कॉंग्रेसच्या राजकारणात अन्य काही विषयांचे पैलू आणि संदर्भ येथे ध्यानात घ्यायला हवेत. महात्मा गांधीजी ५-६ वर्षापूर्वींच आफ्रिकेतून परतले होते. परतण्यापूर्वीच त्यांच्याभोवती आफ्रिकेतील लढण्याच्या नेतृत्वस्थानी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका धारण केल्याचे वलय निर्माण झाले होते. नागपूर कॉंग्रेसची तयारी सुरू असतानाच लोकमान्य टिळकांचे ३१ जुलै १९२० च्या मध्यरात्री निधन झाले. कॉंग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे क्रमश: महात्मा गांधींच्या हातात जाऊ लागली असतानाच टिळकांच्या मृत्यूमुळे कॉंग्रेसच्या राजकारणातील टिळक प्रभावाचा प्रवाहही ओसरू लागला. याच सुमारास आणखी एका विक्षिप्त समस्येने डोके वर काढले. ही समस्या होती खिलाफत चळवळीची. या विषयाने कॉंग्रेसच्या राजकारणाची दिशाच पुढे बदलून टाकली, हा इतिहास सर्वश्रुत आहे. या बदलाची चाहूल लागलेले डॉक्टर हेडगेवार आणि त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी नागपूर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने योगी अरविंद यांनी पुनश्च राजकारणात आणि स्वातंत्र्यचळवळीत प्रवेश करावा, असा प्रयत्नही केला. महर्षी अरविंद यांनी मात्र परतायला नकार दिला. अशा स्थितीत कॉंग्रेस अधिवेशन पार पडले खरे, परंतु डॉ. हेडगेवार आणि मंडळीने सादर केलेला निर्भेळ स्वातंत्र्याच्या मागणीचा प्रस्ताव मांडला गेला नाही. स्वयंसेवक दलाच्या माध्यमातून व्यवस्थात्मक काम मात्र डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली यथोचितपणे पार पडले. एवढेच नव्हे तर, अधिवेशनानंतर १९२१ च्या असहकार आंदोलनात डॉक्टरांनी हिरीरीने भाग घेतला आणि एका वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षाही भोगली. वर उल्लेख केलेले निर्भेळ स्वातंत्र्य हेच आमचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा करणारा प्रस्ताव डॉ. हेडगेवार आणि अन्य नेत्यांच्या पुढाकाराने नागपूर येथील एका सभेत संमत केला गेला. हाच प्रस्ताव कॉंग्रेसनेही स्वीकारावा, असा आग्रह करण्यासाठी डॉक्टर हेडगेवार महात्मा गांधीजींना भेटले. बहुधा हीच डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी यांची पहिली भेट असावी. महात्माजींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, परंतु स्वराज्यात निर्भेळ स्वातंत्र्य आलेच, अशी मोघम भूमिका व्यक्त केली. एका परीने निर्भेळ स्वातंत्र्याची स्पष्ट मागणी करण्याचे महात्माजींनी नाकारले. पुढे तसा ठरावही नागपूर कॉंग्रेसमध्ये मांडला जाण्यापूर्वीच नाकारला गेला.
 
 
थोडक्यात या दोघा महापुरुषांचा परस्पर संबंध १९२० पासूनच, कॉंग्रेस संघटना- भूमिका आणि स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भातच सुरू झाला. पुढेही तीन-चार वर्षांपर्यंत डॉक्टर हेडगेवार गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चळवळीत सक्रिय राहिले. असहकाराच्या चळवळीदरम्यान तुरुंगातही गेले, परंतु खिलाफत चळवळ आणि साम्राज्यापर्यंत स्वराज्य की निखळ स्वातंत्र्य या दोन ठळक मुद्द्यांबाबात महात्माजींशी असहमत असणार्‍या नेत्या-कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमधील सहभाग उणावत गेला हा इतिहास आहे. डॉक्टर हेडगेवारांचाही त्या समूहात समावेश होता.१९२१ च्या प्रारंभिक काळात कॉंग्रेसच्या महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनानुसार सुरू झालेल्या असहकार चळवळीचा प्रसार करण्यात डॉक्टर हेडगेवार, डॉ. मुंजे हे दोघेही राहिले. विद्यार्थ्यांनी शाळांवर, लोकांनी न्यायालयांवर बहिष्कार घालावा, सरकारने दिलेल्या पदव्यांचा त्याग करावा, राष्ट्रीय शाळा सुरू कराव्यात, असा प्रचार सर्वत्र होऊ लागला होता. डॉक्टरांनी मध्य प्रांताच्या क्षेत्रात गावोगाव सभा घेतल्या. काही दिवस त्यांनी मुंबई इलाख्यातही प्रवास केला. मात्र, याच काळात हिंदू-मुस्लीम ऐक्याचा होत असलेला अतिरिक्त पुकारही त्यांना खटकत होता. त्याही संदर्भात त्यांनी महात्मा गांधींची भेट घेतली. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, यहुदी, ज्यू अशा अनेक धर्मांचे लोक हिंदुस्थानात राहत आहेत. मात्र, या सर्वांचे ऐक्य अशी कल्पना न मांडता आपण केवळ हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयीच का बोलता? असा प्रश्न त्यांनी गांधीजींना विचारला. मी मुस्लिमांच्या मनात राष्ट्रीय आंदोलनाविषयी आस्था निर्माण व्हावी आणि त्यांनी त्यात सहभागी व्हावे, यासाठी असे करीत आहे, असे गांधीजींनी म्हटले. त्यावरही टिळकांच्या नेतृत्वाखाली आणि हिंदू-मुस्लीम ऐक्य हा शब्दप्रयोग प्रचारात नसल्याच्या काळातही अनेक मुस्लीम राष्ट्रीय भावनेनेच प्रेरित होऊन आंदोलनात सहभागी होत होतेच, हे डॉक्टरांनी गांधीजींच्या ध्यानात आणून देण्याचा प्रयत्न केला. तसेच या नव्या शब्दप्रयोगामुळे ऐक्याऐवजी फुटीरतेचीच भावना वाढीला लागेल, अशी भीती मला वाटते, असेही डॉ. हेडगेवार यांनी नमूद केले. परंतु गांधीजींनी मात्र मला तशी भीती वाटत नाही, असे म्हणून चर्चेला पूर्णविराम दिला.
 
 
या घटनेनंतर १९२१ व्या ऑगस्टमध्ये भाषणबंदीच्या आदेशाचा भंग केल्याच्या आरोपाखाली डॉक्टरांना एक वर्षाची सश्रमकारावासाची शिक्षा झाली. ती कोलकात्याच्या कारागृहात राहून भोगत असतानाही मुस्लीम कैद्यांकडून आलेल्या अनुभवातून त्यांना आपले हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयीचे विश्लेषण योग्य असल्याचाच प्रत्यय ठळकपणे आला. कारागृहातून सुटून आल्यानंतर त्यांच्या स्वागताची जाहीर सभा झाली. या सभेत पंडित मोतीलाल नेहरू, डॉ. ना. भा. खरे, हकित जमलखान, बॅ. विठ्ठलभाई पटेल, राजगोपालचारी इ. वरिष्ठ कॉंग्रस नेते आवर्जून उपस्थित होते.
 
 
खिलाफत चळवळ, तिच्याविषयी भारतीय मुस्लिमांची अतिरिक्त आस्था, त्यातून ’वंदे मातरम’च्या जागी मुस्लिमांच्या तोंडून बाहेर पडू लागलेला ’अल्ला हो अकबर’चा पुकारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मलबारातील मोपल्यांनी थेट हिंदुंविरुद्ध केलेली सशस्त्र उठावणी (सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटीने प्रसृत केलेल्या वृत्तानुसार या उठावात १५०० हिंदू बळी पडले होते.) यांचा गदारोळ माजला होता. त्यातूनही हिंदू-मुस्लिम ऐक्य या संकल्पनेविषयीचा डॉक्टरांनी दिलेला ईशाराच पुन्हापुन्हा अधोरेखित होत होता. यामुळे कॉंग्रेसमध्ये सक्रिय असतानाही त्यांचे मन सचिंत असे. दरम्यान, कॉंग्रेसचे असहकाराचे आंदोलनही चौरीचौरा येथील हिंसाचाराचे निमित्त करुन महात्माजींनी स्थगित केले होते. तर खिलाफत चळवळीमुळे आंदोलनाला मुस्लिमफुटीरतेचे ग्रहण ग्रासू लागले होते. अशातच १८ मार्च १९२२ रोजी महात्मा गांधींना सहा वर्षाची शिक्षा होऊन ते तुरुंगात गेले. तेव्हापासून दर महिन्याच्या १८ तारखेला गांधी दिन साजरा केला जाऊ लागला. गांधीजींचे अनुयायी म्हणून मिरवणारे लोक मात्र आपापल्या निव्वळ स्वार्थमूलकात मग्न राहून देशभक्तीचा शाब्दिक खेळ खेळण्यातच धन्यता मानू लागले होते. व्यथित मनाने हे चित्र पाहण्यार्‍या डॉक्टरांच्या मनातले सचिंत चिंतन अधिकच गंभीरपणे सुरु झाले. नागपुरातल्या एका गांधी दिन कार्यक्रमातच डॉक्टरांनी केलेल्या भाषणातून त्यांच्या मनातली महात्माजींविषयीची भावना आणि सद्य:स्थितीविषयीची व्यथा प्रत्ययाला येते.
 
 
या भाषणात डॉक्टर हेडगेवार म्हणतात, ’’महात्मा गांधींसारख्या पुण्यश्लोक पुरुषाच्या अंगी असलेल्या सदुणांचे श्रवण आणि चिंतन करण्याचा आजचा दिवस अत्यंत पवित्र मानला पाहिजे. त्यांचे अनुयायी म्हणविण्यात भूषण, शिरावर तर त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याची जबाबदारी विशेषच आहे. गांधीजींच्या अंगी असलेला सर्वात महत्त्वाचा सदुण म्हणजे हाती घेतलेल्या कार्याकरिता आत्यंतिक स्वार्थत्याग होय. अनुयायांकडूनही अशाच स्वार्थत्यागाची अपेक्षा आहे. बोलणे एक आणि कृती दुसरी अशा दुटप्पी वर्तनाचे लोक महात्माजींना नकोत. अशा दुटप्पी लोकांकडून महात्माजींची कार्यनौका कधीच वल्हवली जाणार नाही. आपला दुबळेपणा झाकण्यासाठी शांतीचे पांघरुण घेऊ नका. प्रतिपक्षाच्या बरोबरीने मनगटात सामर्थ्य आणून मगच शांतीच्या गोष्टी बोला. महात्माजींचे अनुयायी म्हणवून घ्यायचे असल्यास स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून रणांगणात उतरा!’’ महात्माजींविषयी व्यक्तीगत स्तरावर अशी आदराची भावना उरात बाळगत असतानाच कॉंग्रेसच्या वैचारिक, विशेषत: हिंदू-मुस्लीमऐक्याच्या स्वप्नाच्या नावाखाली अंगिकारल्या जाणार्‍या धोरणात्मक वैचारिक व्यूहाबाबत मात्र डॉक्टर कमालीची नाराजीची भावना बाळगत होते. तरीही त्यांनी कॉंग्रेसच्या अंतर्गत राहूनच राष्ट्रीय विचार बाळगणार्‍या नेत्या-कार्यकर्त्यांना संघटीत करुन कॉंग्रेस समित्यांमध्ये त्यांचा प्रभाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांवरच भर देण्याचा दृष्टीकोन अंगिकारला. अप्पाजी जोशी, डॉ. बा. शि. मुंजे, बॅरिस्टर अभ्यंकर, चंद्रपूरचे बळवंतराव देशमुख इ. कार्यकर्ते याबाबतीत त्यांच्यासोबत होते. मात्र, या काळात राजकारणापासून अलिप्त भान बाळगून नि:स्वार्थ देशभक्तीची जोपासना करण्याच्या संस्कार रचनेचा ते स्वतंत्रपणे विचारही करु लागले होते. आपल्या निकट आणि समविचारी सहकार्‍यांशी सविस्तर आणि प्रदीर्घ विचारमंथन त्यांनी सुरु केले. दरम्यान, तुर्कस्थानातून केमाल पाशा यांनी खलिफाचे समूळ उच्चाटन करुन टाकले.
 
एका परीने खिलाफत चळवळीचा पायाच उखडला गेला. यामुळे भारतातील खिलाफत समर्थक मुस्लीममंडळी एका बाजूला निराश झाली तर दुसर्‍या बाजूला चवताळली. भर रस्त्यावर गाईंची हत्या करणे, हिंदूंच्या सवाद्य मिरवणूकींवर हिंसक हल्ले करणे अशा उपद्रवी कारवाया सुरु झाल्या. पंजाब, मध्यभारत आणि देशाच्या विविध भागात हिंदू-मुस्लिम दंग्यांना जोर चढला. अमेठी, संभळ (ओडिशा), कोहाट, गुलबर्गा (कर्नाटक) इ. ठिकाणी मुसलमानी आक्रमणांचा उद्रेक झाला. कोहाट येथे सप्टेंबरमध्ये झालेल्या दंग्यात १५५ जण मृत्यूमुखी पडले, लक्षावधींची मालमत्ता उद्ध्वस्त झाली, मुस्लीमांनी लाखो रुपयांची लूट केली. महात्मा गांधींनी या सार्‍या परिस्थितीत एकवीस दिवसांचा उपवास आरंभला. शांतता परिषदांच्या उपाययोजनेला ऊत आला. पण शांतता प्रस्थापित होणे तर दूर मुस्लिम अनाचार अधिकाधिक आक्रमक बनू लागला. सरोजिनी नायडू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडीत मदनमोहन मालवीय, स्वामी श्रद्धानंद, डॉ. मुंजे अशा अनेक ज्येष्ठ पुढार्‍यांनीही याबाबत परखड प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हिंदू समाजाच्या असंघटितपणा आणि दुर्बलतेवर तसेच मुस्लीमांच्या उदंडतेवर या सर्वांनीच बोट ठेवले. खुद्द महात्माजींनीही सर्वसामान्य मुस्लिम हा धटिंगण तर सामान्य हिंदू भित्रा आहे, या शब्दात आपली भावना व्यक्त केली. परंतु त्याचबरोबर त्यांनी हिंदूंना उद्देशून म्हटले, ­ या घटकेला माझे हिंदूंना सांगणे आहे की मरा पण मारु नका!’’ या सार्‍या पार्श्वभूमीचा गंभीरपणे विचार करुन डॉक्टर हेडगेरावांनी हिंदू संघटना निर्मितीच्या आपल्या मनातील विचारांकडे वेगवान प्रवास सुरु केला. १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची झालेली सुरुवात हे त्या सखोल चिंतनाचे आणि प्रगल्भ वैचारिक प्रवासाचेच फलित. तिथपासून आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत डॉक्टर हेडगेवार हिंदू संघटनेचा ध्यासच बनले. या काळात स्वाभाविकपणे त्यांची (वैचारिक आणि व्यावहारिकही) जवळीक हिंदू महासभेच्या मंडळींशी आणि कॉंग्रेसमधील डॉ. मुंजे आणि तत्समसमूहाशी निर्माण झाली. पर्यायाने महात्मा गांधींशी संपूर्णपणे एकनिष्ठ असलेल्या कॉंग्रेसजनांपासून अपरीहार्यपणे दुरावा निर्माण झाला. स्वत: महात्माजी तर या दिवसात तुरुंगातच होते. अन्य नेते, कार्यकर्ते संघाविषयी साशंकता बाळगून होते. स्वत: डॉक्टर हेडगेवार यांच्या मनात मात्र संघ आणि कॉंग्रेस यांच्यासंबंधी स्पष्ट धारणा होत्या. त्या धारणेतील समतोल त्यांनी आपल्या टाचणवहीत केलेल्या एका नोंदीवरुन स्पष्ट होतो. डॉक्टर या नोंदीत लिहितात, ’’हिंदू धर्म, हिंदू संस्कृती यांच्या संरक्षणाकडे व प्रत्यही परधर्मियांकडून हिंदू समाजावर होत असलेल्या विध्वंसक हल्ल्यांकडे दुर्दैवाने कॉंग्रेसचे पूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे हे अत्यंत आवश्यक कार्य करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता आहे. तरीपण संघाचा कॉंग्रेसशी मुळीच विरोध नाही. आमच्या राष्ट्रीय संस्कृतीच्या आड न येणार्‍या स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यक्रमात संघ कॉंग्रेसशी सहकार्य करील व आजपर्यंत करीत आलेले आहे. कॉंग्रेस आणि स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ यांच्याशी सहकार्य करण्याची ही भूमिका पुढे वेळोवेळी डॉक्टरांच्या आणि संघाच्याही वर्तनातून कार्यक्रमात मोकळेपणाने अंगिकारली गेल्याचे दिसते.
 
 
२६ जानेवारी १९३० हा दिवस हिंदुस्थानभर स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्याचे कॉंग्रेसच्या वर्कींग कमिटीने जाहीर केले. संपूर्ण स्वातंत्र्य हे उद्दिष्टही कॉंग्रेसने निश्चित केले. याबाबतची धन्यतेची भावना डॉक्टरांनी सर्व शाखांना पाठविलेल्या परिपत्रकातून स्पष्टपणे मांडली. एवढेच नव्हे तर ता. २६-०१-३० या दिवशी सायंकाळी ठीक सहा वाजता आपापल्या संघस्थानी शाखेच्या सर्व स्वयंसेवकांनी सभा भरवून राष्ट्रीय ध्वजाचे म्हणजे भगव्या ध्वजाचे वंदन करावे. व्याख्यानरुपाने स्वातंत्र्य म्हणजे काय व हेच ध्येय प्रत्येकाने आपला पुरस्कार केल्याबद्दल तिचे अभिनंदन करुन समारंभ संपन्न करावा, अशा स्पष्ट सूचनाही दिल्या. पाठोपाठ मार्च १९३० मध्ये मिठाचा सत्याग्रह सुरु झाला. या सत्याग्रहात स्वयंसेवकांनी व्यक्तीश: सहभागी व्हावे, अशी भूमिका डॉक्टरांनी जाहीर केली. त्याबरोबरच सत्याग्रह आंदोलनात निघणार्‍या प्रचंड मिरवणुकांमध्ये संघाचे स्वयंसेवक शुश्रुषापथके बनून राहू लागली. शेकडो तरुण स्वयंसेवकांनी व्यक्तीश: सत्याग्रहात भाग घेतला. स्वत: डॉक्टर, त्यांचे अप्पाजी जोशींसह अनेक संघसहकारी यांनी यवतमाळ येथे जंगल सत्याग्रहात भाग घेऊन अटक करवून घेतली. डॉक्टरांना यावेळी एकूण ९ महिने सश्रमकारावासाची शिक्षा झाली. ती शिक्षा भोगून कारावासातून बाहेर आल्यानंतर मात्र डॉक्टर एकाकीपणे संघकार्याच्या प्रसार आणि विकासाकडेच निश्चयपूर्वक वळले. याच क्रमात त्यांची आणि महात्मा गांधीजी यांची प्रत्यक्ष भेट झाली. ती वर्धा येथील संघशिबीराच्या प्रसंगी १९३४ च्या डिसेंबर महिन्यात.
 
 
महात्माजी आणि डॉ. हेडगेवार यांच्यातील या भेटीच्या प्रसंगाचे सविस्तर वर्णन मूळातून वाचण्यासारखेच नव्हे तर अभ्यासण्यासारखे आहे. यापूर्वी अनेकवेळा ते प्रसिद्धही झाले आहे. म्हणूनच भेटीविषयीचा सविस्तर तपशील सादर करण्याचे टाळून येथे फक्त त्या दोघांमध्ये झालेल्या संवादातील महत्वाच्या भागाचा सारांश नमूद करणे उचित होईल. या भेटीपूर्वी प्रत्यक्ष शिबिरस्थानाला भेट देऊन गांधीजींनी संघशिबिरातून दिसून येणार्‍या विचार आणि संघकार्यशैलीचे सूक्ष्म निरीक्षण केले होते आणि अप्पाजी जोशींजवळ त्याची मुक्तकंठाने स्तुतीही केली होती. त्या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर गांधीजी आणि डॉक्टर यांच्यातील संवाद वाचला की त्यातील मर्म लक्षात येईल.
 
  
महात्माजी : ’’डॉक्टर आपली संघटना चांगली आहे. मला असे समजले आहे की, आपण दीर्घ काळापर्यंत कॉंग्रेसचे काम करीत होता. मग कॉंग्रेससारख्या लोकप्रिय संस्थेच्या छायेखालीच अशी स्वयंसेवक संघटना का चालविली नाहीत?’’
 
 
डॉक्टर : ’’मी प्रथमत: कॉंग्रेसमध्येच हे कार्य सुरु केले होते. १९२० च्या नागपूर कॉंग्रेसमध्ये तर मी स्वयंसेवक विभागाचा कार्यवाह होतो आणि माझे मित्र डॉ. परांजपे अध्यक्ष होते. त्यानंतरही आम्ही दोघांनी कॉंग्रेसमध्ये अशी संघटना असावी म्हणून प्रयत्न केले. पण यश मिळाले नाही. तेव्हा हा स्वतंत्र प्रयत्न केला.’’
 
 
महात्माजी : ’’कॉंग्रेसमधील प्रयत्नांना का यश मिळाले नाही? पुरेशा पैशाचे पाठबळ मिळाले नाही म्हणून.’’
डॉक्टर : ’’छे, छे! पैशांची अडचण नव्हती. पैशाने अनेक गोष्टी सुकर होत असतील पण या जगात नुसत्या पैशावर काहीच यशदायी ठरु शकत नाही. येथे पैशांचा प्रश्न नसून अंत:करणाचा आहे.’’
 
 
महात्माजी : ’’उदात्त अंत:करणाची माणसे कॉंग्रेसमध्ये नव्हती किंवा नाहीत, असे आपणास म्हणावयाचे आहे काय?’’
 
 
डॉक्टर : ’माझ्या म्हणण्याचा तसा आशय नाही. कॉंग्रेसमध्ये अनेक चांगली माणसे आहेत. आम्ही स्वत:ही होतोच. प्रश्न आहे तो मनोवृत्तीचा. एक विवक्षित राजकीय कार्य सफल करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसच्या मनोवृत्तीची घडण करण्यात आली आहे. त्यावर दृष्टी ठेवूनच कॉंग्रेसचे कार्यक्रम आखण्यात येतात. त्या कार्यक्रमांच्या पूर्ततेसाठी तिला स्वयंसेवकांची आवश्यकता असते. स्वयंप्रेरणेने काम करणार्‍यांच्या बलशाली संघटनेकडूनच राष्ट्रापुढील सर्व समस्या सुटू शकतील, यावर कॉंग्रेसचा विश्वास नाही. सभा-परिषदांतून खुर्च्या-टेबले उचलण्यासारखी कामे पैही न घेता करणारे मजूर म्हणजे स्वयंसेवक अशी कॉंग्रेसमधील लोकांची धारणा आहे. अशा धारणेतून राष्ट्राची सर्वांगिण उन्नती करणारे स्वयंस्फूर्त कार्यकर्ते कसे उभे राहणार ? त्यामुळे कॉंग्रेसमधील कार्य उभे राहू शकले नाही.’’
 
 
महात्माजी : ’’मग स्वयंसेवकांसंबंधी आपली कल्पना काय?’’
 
 
डॉक्टर : ’’देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जो आत्मियतेने आपले सारसर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध होतो, अशा नेत्यास आम्ही स्वयंसेवक समजतो आणि असे स्वयंसेवक घडविण्यावर संघाचे लक्ष आहे. या संघटनेत स्वयंसेवक व पुढारी असा भेद नाही. आम्ही सर्वजण स्वयंसेवक आहोत, अशी सदैव जाणीव ठेवून आम्ही परस्परांना समान समजतो व सर्वांवर सारखेच प्रेमकरतो. आम्ही कोणत्याच प्रकारच्या भेदाला थारा देत नाही. इतक्या अल्पावधीत, पैशाचे व इतर साधनांचे पाठबळ नसतानाही संघकार्याचा जो विस्तार होऊ शकला, त्याचे रहस्य यात आहे.’’
 
 
या संवादात आणखीही बरेच काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. संघाच्या आर्थिक व्यवहाराची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत, स्वत: डॉक्टरांचे व्यक्तीगत जीवन याबद्दलची माहिती ऐकून महात्माजी काहीसे विस्मित झाले. शेवटी, डॉक्टरजी, आपले चारित्र्य व कार्यावरील अढळ निष्ठा यांच्या बळावर आपण आपल्या अंगीकृत कार्यात निश्चित यशस्वी व्हाल, अशा मनमोकळ्या शुभेच्छा देऊन महात्मा गांधीजींनी डॉक्टरांचा निरोप घेतला.
 
 
डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधीजी यांच्यातील परस्पर संबंध, त्याच्या एकमेकांविषयी आणि एकमेकांच्या कार्याविषयीच्या धारणा, डॉक्टरांचा कॉंग्रेसमधील सहभाग आणि संघव्यवहार आणि अगदी अल्पावधीतल्या भेटीतून महात्माजींनी या सार्‍याबाबत करुन घेतलेले आकलन. या सार्‍याचे स्वरुप या छोट्याशा संवादातून ठळकपणे प्रत्ययाला येते.
 
 
डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनाला ८८ तर महात्माजींच्या निधनाला ८० वर्षे होत आहेत. त्या दोघांनीही आपापल्या जीवनकार्यातून उभारलेल्या सार्वजनिक संस्थाजीवनाच्या पसार्‍याचे आजचे स्वरुप आपणा सर्वांच्यासमोर आहे.
 
 
- अरुण करमरकर
 
@@AUTHORINFO_V1@@