संघटन शास्त्रातील महाऋषी : डॉ. हेडगेवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करुन डॉ. केशव बळीराम हेडगेवार हिंदु समाजात एकतेची भावना निर्माण केली. जो हिंदू समाज कधी एक होत नसे, त्या हिंदू समाजाला प्राचीन इतिहासाची आठवण करुन देत राष्ट्राला परमवैभवापर्यंत नेण्याची शपथ त्यांनी दिली. हे संघटनाकौशल्य अद्वितीयच. हे कसे घडले, एवढी मोठी संघटना, लाखो स्वयंसेवक हे कसे उभे ठाकले, काय प्रेरणा होती त्यामागे, या सर्व गोष्टींची चर्चा या लेखात केली आहे.
 
 
भारतीय राष्ट्रीय चळवळीचे मूळ हे हिंदू धर्मातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक सुधारकांमध्ये आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय राजकीय नेते हे ब्रिटिशांशी/वसाहतवाद्यांशी जवळीक साधणारे होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांवर भारतीय सुधारकांनी/नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. सुधारणावादी आणि पुनरुत्थान या दोन चळवळींनी हिंदूंना आपली राष्ट्रीय ओळख शोधण्यास प्रवृत्त केले. सुधारणावाद्यांवर पाश्चिमात्त्य सुधारणांचा आणि विचारांचा प्रभाव होता. पुनरुत्थानवादांच्या विचारांत आणि कार्यात हिंदू धर्म केंद्रित असून हिंदू राष्ट्र त्यांचे ध्येय होते. पुनरुत्थानवाद्यांना आपल्या जुन्या परंपरा कायम ठेवून आणि त्यात सुधारणा करून विभागलेला हिंदू समाज एक करायचा होता. रा. स्व. संघाचे मूळ हे त्या पुनरुत्थानवाद्यांच्या विचारातून स्पष्ट होते. हिंदू पुनरुत्थानवाद्यांनी आपल्या लोकांबद्दल मूलभूत सत्य शोधण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांनी भारतीयांची राष्ट्रीय ओळख घालवली, असे या क्रांतिकारकांचे म्हणणे होते. सुवर्ण भूतकाळाचा दाखला देऊन ब्रिटिश सरकार हिंदू समाजाची अवनती करत असल्याचे पुनरुत्थानवाद्यांनी सांगितले. परकीयांमुळे हिंदूंची जी अवनती झाली तिला पुन्हा विजयात रुपांतरित करण्यासाठी, हिंदू धर्मात सुधारणा करून समाजाला एकत्र बांधण्याचा प्रयत्न पुनरुत्थानवाद्यांकडून झाला. पुनरुत्थानाला पोषक अशा घटना १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात घडल्या. राष्ट्रभावना जागृत व्हायला सुरुवात झाली होती. समाजाची बांधणी ही हिंदू परंपरेला धरून असेल, असा पुनरुत्थानवाद्यांचा संदेश अनेक भारतीय हिंदूंंना आपलासा करणारा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये सर्व घटकांचे प्रतिनिधी होते. त्यात पुनरुत्थानवाद्यांचाही समावेश होता. कॉंग्रेसमध्ये सर्व घटकांचा समावेश असला तरी सर्व घटक समाधानी होतेच असे नाही. अनेक मुस्लीमनेत्यांची अशी धारणा होती की, कॉंग्रेसमधील पाश्चिमात्त्य व आधुनिक विचारसरणी मानणारे हिंदू त्यांच्या हितसंबंधांचा विचार करत नसून कॉंग्रेसवर त्यांचेच अधिष्ठान आहे. हिंदू पुनरुत्थानवाद्यांमध्येही अशीच भावना असून कॉंग्रेस हिंदूंच्या हितसंबंधांना प्राध्यान्य देत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामहेडगेवार यांच्या मनात कॉंग्रेस, ज्यात मुस्लिमांचाही सहभाग आहे-ती संघटना हिंदुंच्या एकतेचा पुरस्कार करते का? अशी शंका होतीच.
 
 
हिंदू आणि मुस्लीम नेत्यांनी आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी कॉंग्रेसमधून फारकत घेत आपापल्या संघटना स्थापन केल्या. भारतात कुठलाच समाज एकसंध नव्हता. हिंदू आणि मुस्लीम समाजातही फूट होतीच. दोन्ही समाजात मोठ्या प्रमाणात विषमता असून अनेक भागात सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या विषमता वाढली होती.
 
 
सर्वच समाज अनेक अडचणींनी, समस्यांनी ग्रासलेला असूनही वेगळा होता, आणि त्यांनी त्यांचे त्यांचे क्षेत्र निवडून त्याचाच विकास केला होता, हे सर्वच समाज राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अशाप्रकारे विभागलेले होते. या संघटना जरी त्यांच्या त्यांच्या समाजातल्या थोड्याफार घटकांचे प्रतिनिधीत्व करत असल्या तरी त्या मोठ्या प्रमाणात बचावात्मक पवित्रा घेणार्‍या होत्या.
 
 
संघ स्थापन होण्यामागे ही ऐतिहासिक पार्श्वभूमी कारण ठरली.
 
 
आधुनिक भारताच्या इतिहासातील रा. स्व. संघाच्या स्थापनेसाठीची ही खरे तर अत्यावश्यक-आणीबाणीची परिस्थिती ठरली.
 
 
डॉ. हेडगेवार यांना भारतीयांच्या प्रश्नाचे उत्तर इतिहासात सापडले. त्यांनी तेव्हाच्या काळातील दूरदृष्टी असलेल्या नेत्यांशी यावर सल्लामसलत करून विचार केला की, भारत हा प्राचीन देश असून त्याला धर्माने एकसंध ठेवले. आजचा हिंदू नागरी समाज निर्माण करण्यात आपल्या पूर्वजांचा सिंहाचा वाटा आहे. हिंदुंमध्ये पिढ्यानपिढ्यांपासून प्रयत्न, कौशल्य आणि कल्पकतेच्या माध्यमातून एक संस्कृती तयार झाली होती. त्यांची बुद्धी, समृद्धी आणि हुशारीचा जगाला हेवा वाटत असे. हिंदूंनी भारतमातेसाठी जीवन अर्पण केले आणि तिच्यासाठी सर्वतोपरी त्याग केला.
 
 
त्यांचे ज्ञान, त्यांची श्रेष्ठता, त्यांची समृद्धी जगाला मोहिनी घालणारी होती. पण अशा वैभवात जगणार्‍या हिंदुंनाही तिच्यासाठी म्हणजे भारतमातेसाठी त्रास सहन करावा लागलाच होता. भारत आणि तिची हिंदू ओळख ही पुसून न निघणारी आहे. जगात भारताची ओळख ही हिंदू/हिंदू राष्ट्र अशी आहे. रा. स्व. संघाची स्थापना विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर १९२५ साली झाली. डॉ. हेडगेवार यांचा जन्म १८८९ साली हिंदू नववर्ष दिनी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी झाला. त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू प्लेगने एकाच दिवशी झाला.
 
रा. स्व. संघाची वैचारिक जडणघडण डॉ. हेडगेवार यांनी केली. हेडगेवार हे व्यवसायाने जरी डॉक्टर असले तरी ते ब्रिटिश साम्राज्यवादी विरोधी चळवळीत सामील होते. हेडगेवार तरुण असताना त्यांना इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात रुची निर्माण झाली. १९२० च्या पूर्वार्धात ते कॉंग्रेस पक्षाच्या चळवळीत सक्रिय होते. नागपूरमध्ये १९२० साली अखिल भारतीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन भरले होते, तेव्हा महात्मा गांधींनी १ वर्षात अहिंसेने आणि असहकाराने स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वचन दिले होते. अनेक कार्यकर्ते या चळवळीत सामील झाले. त्यापैकी एक हेडगेवार होते. १९२१ चे वर्ष उलटून गेले पण स्वराज्य काही मिळाले नाही. संयुक्त प्रांतात जमावाने दोन पोलिसांची हत्या केली आणि चळवळीला हिंसक वळण लागल्याने गांधीजींनी असहकाराचे आंदोलन १९२२ मध्ये मागे घेतले.
 
 
१९२३ साली दंगली झाल्या आणि या घटनेमुळे हेडगेवार चिंतीत झाले आणि साम्राज्यवादी सरकार जाण्यासाठी आधी केलेले प्रयत्न कितपत योग्य होते असा विचार करण्यास ते प्रवृत्त झाले. या दंगली म्हणजे हिंदू समाजातील ऐक्य नसल्याचे द्योतक आहे. भारताला स्वातंत्र्य हवे असल्यास हे ऐक्य होणे गरजेचे असल्याचे त्यांना वाटले. डॉ. हेडगेवारांच्या दृष्टीने सतत होणार्‍या दंगली, दंगे हा मोठा सामाजिक प्रश्न-समस्या होती-हिंदुंमध्ये असलेला एकतेचा अभाव हे त्याला कारण होते आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांचे मत होते. हिंदू-मुस्लीम वैरभाव वाढण्याच्या काळात हेडगेवारांनी संघाचा वैचारिक पाया निर्माण केला. त्यांच्या विचारांवर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदुत्वाचा प्रभाव होता. त्या विचारात हिंदू हे एक राष्ट्र असल्याचे सांगितले गेले. हिंदू राष्ट्रासाठी हेडगेवारांना सावरकरांचे बौद्धिक लिखाण उपयोगी पडले, पण समस्त हिंदू समाजाच्या एकत्रीकरणासाठी मार्ग सापडत नव्हता.
 
 
परकीयांचे आक्रमण परतून लावण्यात भारत का अपयशी ठरला, हा प्रश्न हेडगेवारांना तारुण्यात पडला होता. एक छोटा साम्राज्यवादी गट भारतासारख्या मोठ्या देशावर कसे काय राज्य करू शकतो? हा विचार करून ते अस्वस्थ होत. हिंदू समाजात ऐक्य नसल्याने भारताने आपला तिबेट, अफ़गाणिस्तानसारखा भूप्रदेश गमावला असे हेडगेवारांना वाटत असे. भारताचे दोष शोधल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय पुनरुत्थान प्राप्त होणार नाही, असा त्यांचा विश्वास होता. १९२४-२५ च्या काळात त्यांना प्रश्नाचे मूळ कळाले, मूळ प्रश्न मानसिकतेचा/मानसिकदृष्ट्या असून आंतरिक समृद्धी आणल्यास राष्ट्रीयत्वाची जाणीव होऊन सामाजिक ऐक्य निर्माण होईल, असे त्यांना वाटले. राष्ट्र निर्माणासाठी एक पिढी निर्माण झाली की पुनरुत्थानाची चळवळ जोर धरेल. त्यात काही अडचणीही असतील आणि स्वातंत्र्यप्राप्तीचेही ध्येय या पिढीत असेल.
 
 
एकदा राष्ट्राच्या पुनर्उभारणीसाठी, पुनर्रचनेसाठी वचनबद्ध लोकांची संघटना उभारली की, पुनरुत्थानाची चळवळ सुरु ठेवण्यासाठी कमी सायास करावे लागतील, आणि स्वातंत्र्य हेदेखील त्या संघटनेचे उद्दिष्ट असेल.
 
 
डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे एक क्रांतिकारी स्वभावाचे स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यासाठी आणि मातृभूमीसाठी अनेक आघाड्यांवर त्यांनी लढा दिला. ’युगांतर’ आणि ’अनुशासन समिती’सारख्या संघटनेत त्यांचा सक्रिय सहभाग असे. कॉंग्रेसने केलेल्या सत्याग्रहात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. भारताची अशी दैन्यावस्था का झाली, भारतावर परकीयांचे शासन का होते? असा विचार करून ते अस्वस्थ होत. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठी मजबुतीने लढले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. डॉ. हेडगेवार हे लहानपणापासून राष्ट्रभक्त होते. त्यांच्या राष्ट्रभक्तीचे अनेक प्रसंग आहेत. १८९७ साली जेव्हा हेडगेवार प्राथमिक शाळेत होते तेव्हा इंग्लंडच्या राणीच्या राज्यारोहणाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिठाईचे वाटप करण्यात आले. ती मिठाई हेडगेवारांनी फेकून दिली. १९०१ साली ब्रिटिश साम्राज्यात एडवर्ड सातवा याचा राज्याभिषेक झाला तेव्हा आपल्या देशात याचा मोठा उत्सव साजरा केला गेला. मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली गेली. यावेळी हेडगेवार घरी बसून होते. या उत्सवात सहभागी का झाले नाही? अशी विचारणा केली असता हेडगेवार उत्तरले की, ’’हा उत्सव परदेशी राजा आणि राण्यांचा आहे. तो मी का साजरा करावा?’’
 
 
१९०५ साली वंदे मातरम चळवळ चालू असताना हेडगेवार यांनी शाळेत ’वंदे मातरम’ च्या घोषणा दिल्या. या प्रकरणी त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. परिणामी हेडगेवार यांना दहावीपर्यंतचे शिक्षण नागपूरच्या बाहेर पूर्ण करावे लागले. काही मोठ्या राष्ट्रवादी नेत्यांनी सूचना केल्यानुसार हेडगेवार वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कोलकात्याला रवाना झाले. वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या उद्देशाने आणि कोलकात्यामध्ये राष्ट्रवादी लोकांच्या सुरक्षा आणि मदतीसाठी ते तिथे गेले. कोलकाता हे अशा क्रांतिकारी लोकांचे केंद्र होते, जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतील आणि वेळ आली तर प्राणांची बाजी लावायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. हेडगेवारांनी त्यांच्याकडून शिकून चळवळीत सामील होण्यास सुरुवात केली.
 
 
हेडगेवार १९१६ साली नागपूरला डॉक्टरची पदवी घेऊन परतले पण त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला नाही. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. बरेच जण त्यांना विचारीत की, ’’तुमचे कुटुंब गरीब आहे. तुम्ही लग्न करून स्थिरस्थावर का होत नाही?’’
’’यासाठी आपल्याकडे वेळ नाही,’’ असे उत्तर हेडगेवार देत. नागपूरमध्ये राहून त्यांनी विदर्भात राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेसाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली.
 
 
१९२० आणि १९३१ साली महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीत सामील झाल्याप्रकरणी त्यांना कारावासात जावे लागले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र सुरू केले. अनेक राष्ट्रीय मोहिमा आणि चळवळीत त्यांनी उत्स्फ़ूर्तपणे सहभाग घेतला.
 
 
स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक चळवळीत सहभाग घेतला. कार्यक्रमही राबवले पण तरी त्यात ते समाधानी नव्हते. त्याकाळी चाललेल्या प्रयत्नांच्या गुणदोषाचा त्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास केला. त्यांनी इतिहासाचा सूक्ष्म आणि सर्व अंगांनी अभ्यास केला. एक प्रश्न त्यांना नेहमी भेडसावत असे की, आज आपण गुलाम का आहोत?, आपण एवढ्या दारिद्य्रात का आहोत? आपण सुरुवातीपासूनच इतके मागास होतो का?
 
 
आपल्यात ऐक्यभाव नसल्याने आपला पराभव झाला, अशी त्यांची भावना होती. सामाजिक ऐक्यासाठी राष्ट्राला धर्मभूमी, कर्मभूमी, पुण्यभूमी आणि मोक्षभूमी हवी. सर्व हिंदू तीर्थयात्रेसाठी एकत्र येतात. कुंभमेळासारख्या उत्सवात निस्सीम भक्त देशाच्या कानाकोपर्‍यातून एकत्र येतात.
 
 
सगळे हिंदू या निमित्ताने एकत्र येत आहोत, याची जाणीव या हिंदूंना नव्हती. संरक्षणात्मकदृष्ट्या एकत्र असावे हे सर्वांचे आद्यकर्तव्य आहे, पण त्यासाठी राष्ट्रीयत्वाची जाणीव हवी जी पूर्णपणे नष्ट झाली होती. पुढे ब्रिटिशांच्या प्रोपगंडामुळे भारतीयांच्या मनात आपल्या राष्ट्रीयत्वाबाबत संभ्रम निर्माण झाले. इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय आपले राष्ट्रीय हित विसरायला लागले. आपण कोण आहोत?, आपले राष्ट्र कुठले?, आपली राष्ट्रीय ओळख काय? असे प्रश्न त्यांना पडायला लागले आणि त्यांचा गोंधळ उडायला लागला. हेडगेवारांच्या हे लक्षात आले आणि वेळीच यावर उपाय न शोधल्यास हे राष्ट्र तळास जाईल आणि भविष्यातही न सुटणारे प्रश्न निर्माण होतील, हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी ब्रिटिशांपासून देशाला स्वातंत्र्य मिळावे हा प्रत्येक चळवळीचा हेतू होता पण हा हेतू असफल होण्याचे नेमके कारण काय याचा खोलवर अभ्यास कोणीच केला नाही. लोकांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एकत्र आणण्यात हेडगेवार यांना यश आले, कारण त्यांना प्रश्नाचे मूळ शोधण्यात यश आले. तथापि, डॉ. हेडगेवार यांनी देशातल्या मुलभूत कमतरता, उणीवा काढून टाकण्यावर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे शारिरीक आणि बौद्धिक विषयांना महत्त्व देण्यात आले. आपले राष्ट्र पारतंत्र्यात असण्याचे कारण आपल्यात ऐक्य नसल्याचे त्यांना उमगले.
 
 
 
आता लोकांच्या विचारात तफावत असल्याने संघात काही बदल झाले आहेत. स्वयंसेवकांमुळे आता संपूर्ण देशात संघ वाढला असून त्याचा प्रभाव वाढत आहे. यामुळे सर्वसाधारणच नाही तर उच्चशिक्षित नागरिकांमध्येही राष्ट्रीय जाणीव वाढली आहे. संघाच्या १५ वर्षानंतरही हेडगेवार स्वयंसेवक घडविण्यासाठी देशभर प्रवास करत होते. ते दिवसरात्र लोकांशी भेटून त्यांच्या संकल्पनेबद्दल चर्चा करत. श्रीगुरुजी सरसंघसंचालक झाल्यावर नेहमी म्हणत,’’संघ हा हेडगेवारांच्या तत्त्वावरच चालेल.’’
 
 
हेडगेवार यांचा जन्मदिन दरवर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात एक मोहीम राबवली जाते, ज्यातून हेडगेवारांनी जो संदेश आणि वारसा दिला तो पोहोचविण्याचे कार्य केले जाते. स्वयंसेवकांकडून २ लाख १६ हजार २८४ गावांत ही मोहीम राबवली गेली. या मोहिमेतून १ कोटी ४८ लाख ७० हजार ६८२ कुटुंबांशी स्वयंसेवकांनी संपर्क साधला. संघ यशस्वी झाला, कारण संघाने लोकांना सामाजिक जाणीव दिली, जगण्याचा हेतू दिला आणि त्याला योग्य दिशा दिली. ते देशाचे कुठल्या भागातील आहेत, याचा विचार संघाने केला नाही. जेव्हा जेव्हा कुणा स्वयंसेवकांना विचारले जाते की, ’’तुमची उपजीविका चालू असूनही तुम्ही हे कार्य कसे करता?’’ तेव्हा त्याला स्वयंसेवकाकडून एकच उत्तर दिले जाते, ’’कारण आम्हाला माहीत आहे, आम्ही काय करतो, आम्ही काय योगदान देत आहोत, याची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही मोठ्या हिंदू समाजाचे घटक आहोत.’’ संघ प्रत्येकाला आयुष्यात आपला हेतू साध्य करण्यासाठी मदत करतो. स्वयंसेवकांना मानधनाच्या समाधानापेक्षा आपल्या कार्याचे समाधान महत्त्वाचे आहे.
 
 
 
सुरेश कुमार यांनी आपल्या 'RSS : ­ Brotherhood of Trust in The Observer' या पुस्तकात लिहिले आहे की, ’’जेव्हा भारतातील शंभर वर्षे किंवा त्याहून अधिक काळ असलेल्या संघटना ज्यात कॉंग्रेस, साम्यवादी पक्षांचा समावेश आहे, त्यांच्यात बर्‍याच वेळेला फ़ूट पडली, वाद झाले, पण संघाचा जगन्नाथाचा रथ खेचणारी शक्ती कोणती? संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली केली. संघ सध्या जगात सर्वाधिक स्वयंसेवक असलेली संघटना आहे. भारतात अशी कुठलीच गोष्ट नाही, जिथे संघाची छाप नाही. संघाच्या अशा १४० आघाडीच्या संघटना आहेत, ज्या त्या त्या क्षेत्रात कार्यरत आहेत. हे शक्य होण्याचे कारण आणि सर्व हिंदू एकत्र असण्याचे कारण काय? याचे उत्तर असे की, जेव्हा अनेक संस्था आणि संघटनांनी पाश्चिमात्य विचार आणि कार्यपद्धती अवलंबली, तेव्हा संघाने स्वतःची अशी कार्यपद्धती विकसित केली, जी स्वदेशी होती. अनेक जणांचे संघाबद्दल मतभेद असतील पण ते संघाच्या सांघिक कौशल्य, वैचारिक निष्ठा आणि अद्वितीय शिस्तीबद्दल प्रश्न उपस्थित करू शकत नाही.
 
 
 
- सतिश मोढ
(भाषांतर : तुषार ओव्हाळ)
 
@@AUTHORINFO_V1@@