संघप्रचारक दौडले दशदिशांनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
रा. स्व. संघाच्या स्थापनेनंतर सुरुवातीला जे प्रचारक संपूर्ण देशभरात गेले त्यांचे कार्य आणि माहिती या लेखात दिली आहे. यामध्ये जनार्दन चिंचाळकर, वसंतराव ओक, गोपाळराव येरकुंटवार, दादाराव परमार्थ, उमाकांत आपटे आणि आणखी काही संघ स्वयंसेवक, त्यांचा डॉक्टरांशी झालेला संवाद, डॉक्टरांचा त्यांच्याशी असलेला ऋणानुबंध या मुद्द्यांची मांडणी केली आहे.
 
 
१९२५ च्या विजयादशमीला नागपूरला रा. स्व. संघाची स्थापना झाली पण संघ संस्थापक पू. डॉ. हेडगेवारांची त्यामागची दृष्टी अखिल हिंदुस्थान संघटित करण्याची आहे. उमाकांत बळवंत घाटे यांना १ ऑक्टोबर १९३४ च्या पत्रात पू. डॉक्टर लिहितात की, ’’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे एका गावाकरिता किंवा प्रांताकरिता आम्ही हाती घेतलेले नसून अखिल हिंदुस्थान संघटित करून सर्व हिंदू समाजाला स्वसंरक्षण व सामर्थ्यशाली बनवणे, असा आमचा उद्देश आहे. आमच्या मते हिंदू समाजाची ही आणीबाणीची वेळ आहे. हा समाज असंघटित व विस्कळीत राहिला तर याचे अस्तित्वही भविष्यकाळात मिटून जाऊन हिंदू संस्कृतीचे नावनिशाणही उरणार नाही म्हणून केवळ स्वतः जिवंत राहावयाच्या इच्छेनेच या कार्याकडे आम्ही बघत आहोत. एखाद्या गावी १०-५ मुले एकत्र खेळल्याने हे काम होणे शक्य नाही. त्या करिता आपल्यासारख्या मोठ्यामोठ्या समाजधुरिणांनी कार्यक्षेत्रात उतरून त्या कार्याची लाट उसळून दिली पाहिजे.’’ पू. डॉक्टरांची सुमारे ९५१ पत्रे आज उपलब्ध आहेत. ही पत्रे १९२९ ते १९४० या काळातील संघाचा विकासक्रम सांगणारी दस्तऐवज आहेत. त्या पत्रव्यवहारातून मोहिते वाड्यातील पहिली शाखा ते हिंदू राष्ट्राचे लघुरूप या विस्ताराचे आपल्याला दर्शन घडते. त्यात पू. डॉक्टरांच्या योजनेचे तपशील समजतात, एका प्रांतात काम वाढवून हळूहळू शास्त्रशुद्ध पद्धतीने देशव्यापी संघटन उभे करण्याचा वस्तुपाठ आपल्यासमोर उभा राहतो. त्यासाठी पू. डॉक्टरांनी केलेले पद्धतशीर प्रयत्न समोर येतात. या विस्ताराचे जे अग्रदूत झाले त्यांची व्यक्तिचित्रे समोर येतात. त्याचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न लेखात केला आहे.
 
 
देशभरात संघाचा विस्तार करायची योजना १९२९ पासूनच डॉक्टरांच्या पत्रातून दिसते. नागपूरच्या संघाची ही स्वाभाविक जबाबदारी आहे, असे सतत नागपूरच्या कार्यकर्त्यांना ठसवणे हा त्यांचा प्रयत्न दिसतो. इंदोर दौर्‍यातून २ ऑगस्ट १९२९ ला दादाराव परमार्थ यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख आहे. नागपूरचा संघ सर्व संघांना पितृस्थानी असल्यामुळे सर्व प्रांतभर व देशभर संघ स्थापण्याची जबाबदारी जरी नागपूरच्या संघावर असली तरी त्यामुळे नागपूर जिल्ह्याची व खास नागपूर शहराची जबाबदारी मुळीच कमी होत नाही. किंबहुना ही जबाबदारी जर योग्य रीतीने आपण पार पाडू शकलो तरच बाहेर आपली किंमत राहणार. नागपूरचे स्वयंसेवक शिक्षणासाठी अन्य स्थानी जातात. ते संघ कार्य तिथे पोहोचविणारे दूत बनू शकतात, हे त्यांनी हेरलेले दिसते. वर उल्लेखलेल्या पत्रातच ते नागपूरहून इंदोरला वैद्यकीय शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भेटल्याचा उल्लेख येतो व अकोल्याच्या शाखेचे स्वयंसेवक तिथे असतील तर त्यांची नावे कळवावीत, असेही त्यांनी लिहिले आहे.
 
 
संघकार्याच्या विस्ताराचा प्रारंभ नागपुरातील शाखांच्या विस्तारापासून डॉक्टरांनी केला आहे नागपूरच्या विविध भागात संघशाखा प्रारंभ व्हाव्यात, असा आग्रह त्यांनी केलेला दिसतो. इंदोरहून कृष्णराव मोहरीर, बाबासाहेब आपटे यांना लिहिलेल्या पत्रात सीताबर्डीतील शाखेकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केलेली दिसते. अंबाझरी येथे शाखा सुरू व्हावी, असा आग्रह त्यांनी दादाराव परमार्थ यांना केलेला दिसतो, त्याकाळात दादाराव परमार्थ वर्धा, हिंगणघाट व भंडारा जिल्ह्यातील साकोलीला दौरा करून आले आहेत, असाही उल्लेख आहे. नागपुरातील स्वयंसेवकांनी विस्तारासाठी दौरा करावा, अशी योजनाही केलेली दिसते व तिचे संख्यात्मक वृत्त डॉक्टर पत्रातून विचारताना दिसतात पण बाहेरगावी जाताना नागपूरचे काम दुर्लक्ष होऊन दुर्बल होऊ नये ही काळजी घ्यायला हवी, असेही ते सुचवतात. म्हणून दादारावांना लिहिलेल्या पत्रात डॉक्टर म्हणतात की, ’’बाहेरगावी जाणे अगदीच बंद करू नये. नागपूरचे कार्य सांभाळून मधूनमधून बाहेरगावी जेथे अवश्य असेल तिथे जात असावे. तुम्ही बाळाजी व आणखी इतर उत्साही मंडळी यांनी एकमेकांना मधूनमधून सुट्टी दिल्यास बाहेरगावचे कार्य सहज साधणार आहे. नवीन स्वयंसेवकांच्या भरतीला हेच दिवस अनुकूल असल्यामुळे भरतीचे प्रमाण समाधानकारक नाही, असे म्हणावे लागते. परमेश्वरेच्छा! जानेवारी १९२९ ते ऑगस्ट १९२९ या काळात शाखा १८ पासून वाढून ३४ झाल्याचा उल्लेख पत्रात आहे. वर्धा व साकोली येथे आप्पाजी जोशी व दादाराव परमार्थ यांनी तर देवासला स्वतः डॉक्टरांनी संघशाखा स्थापन केल्याचा उल्लेख आढळतो. २४ ऑगस्ट १९२९ च्या दादाराव परमार्थ यांना लिहिलेल्या पत्रात जिथे जिथे नवीन संघ स्थापन कराल तिथे तिथे प्रारंभापासून कडक शिस्त ठेवण्यासंबंधी काळजी घेण्यास सांगा, असा उल्लेख केलेला दिसतो. विस्तार वेगाने करताना मूळ संघकार्याच्या शैलीत शिथिलता येऊ नये व कार्याची गुणवत्ता विस्तारामुळे मागे येऊ नये याबद्दल त्यांचा आग्रह दिसतो. प्रामुख्याने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील कामसंघाचे मुख्य शरीर तसेच भंडारा व चांदा जिल्ह्यातील काम’संघाच्या झेप घेणार्‍या पक्ष्याचे दोन पंख’ अशी उपमा ते वापरतात. वर्धा जिल्ह्यात १२ शाखा स्थापन झाल्याचा उल्लेख आहे. विदर्भातील अन्य स्थानी शाखा प्रारंभ झाल्याचा उल्लेख सुरुवातीच्या पत्रातून दिसतो. १९३१ साली काशीहून नागपूरच्या कार्यवाहला लिहिलेल्या पत्रात नागपूरच्या संघाची ही महत्त्वपूर्ण भूमिका डॉक्टर अधोरेखित करताना दिसतात. बाहेरगावी, बाहेरप्रांती संघाचा जसाजसा जास्त विस्तार होत जाईल तसतशी नागपूर संघाची जबाबदारी जास्त विशेष वाढत जाईल ही गोष्ट मात्र अवश्य लक्षात बाळगावी. उन्हाळ्याचे वर्ग विशेष शिस्तवार व निर्दोष चालवावे लागतील. संघ पाहण्यासाठी नागपूरला अन्य प्रांतातील प्रतिष्ठित मंडळी केव्हाही येऊ शकतात. त्यामुळे नागपूरच्या संघाचे स्वरूप कसे असावे, याबद्दल ते लिहितात, ’’संघाचे नेहमीचे स्वरूप आकर्षक व पाहणार्‍याच्या अंतःकरणात दरारा, कौतुक व प्रेम उत्पन्न करणारे असले पाहिजे. कारण संघाच्या शाखा विस्तार वाढविण्याबरोबरच वाढलेल्या विस्तारावर आपली छाप नेहमी कायम ठेवणे पण आवश्यक असते. त्याच पत्रात काशी शहरात व बनारस हिंदू विश्वविद्यालयात शाखा स्थापन झाल्याचा उल्लेख आहे. एका अर्थाने उत्तर भारतातील हे संघाचे महत्त्वाचे पाऊल आहे. पं. मदनमोहन मालवीयजी ज्यांनी बनारस हिंदू विश्व विद्यालयाची स्थापना केली होती ते संघकार्यासाठी अनुकूल होते. त्यासोबत तिथे संपूर्ण उत्तर भारतातील तरुण शिक्षणासाठी येणे स्वाभाविक असल्याने या स्थानी शाखा सुरू करण्यामागची डॉक्टरांची भूमिका स्पष्ट होते.
 
 
३१ सालच्या अखेरीस दारव्हा, आकोट, वाशीम, उमरखेड, खामगाव या ठिकाणी स्वतः डॉक्टरांनी संघ स्थापन करून तेथील प्रतिष्ठित व्यक्तींची संघचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. ३० जून १९३२ च्या गोपाळराव चितळे, अकोला यांना लिहिलेल्या पत्रात अकोला संघावर वर्‍हाडमधील आदर्शभूत संघ तयार होण्याची जबाबदारी आहे, असे डॉक्टर लिहितात. नागपूरकडील मराठी भाषिक मध्य प्रांत व वर्‍हाड प्रांतात संघ शाखा जागोजागी सुरू केल्यानंतर मध्य प्रांतातील हिंदी भाषिक प्रदेशात संघ कार्यासाठी प्रयत्न सुरू झालेले दिसतात. १९३२ च्या एका पत्रात रायपूरच्या शाखेची स्थापना होऊन ती जितकी बळकट होत जाईल तसे छत्तीसगड विभागात संघकार्य वाढवणे शक्य होणार असल्याचा उल्लेख आहे. रायपूरच्या संघावर सर्व छत्तीसगड विभागाची जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवून आपल्या संघशाखेची काळजी घेत असावी. ज्याप्रमाणात रायपूरचा संघ भरभराटीला येईल त्या प्रमाणात ते कार्य सर्व छत्तीसगड विभागात वाढविण्याची धमक आपल्या संघशाखेत उत्पन्न होईल.
 
 
 
७ ऑगस्ट १९३२ ला पुण्यात संघाची स्थापना डॉक्टरांनी केल्याचे आबाजींना लिहिलेल्या पत्रातून आपल्याला समजते व विश्वनाथ माधव देशमुख, वकील यांची नियुक्ती संघचालक म्हणून केल्याचे समजते. पुण्याला संघस्थापना झाली, याबद्दल डॉक्टर लिहितात की, ’’पुण्यासारख्या अत्यंत नावाजलेल्या चिकित्सक गावातल्या विद्वान लोकांनाही अनेक प्रश्नोत्तरानंतर संघाची कल्पना अत्यंत पसंत पडली.’’ त्याच दौर्‍यात सांगली व कोल्हापूर येथेही संघ स्थापन केल्याची नोंद पत्रव्यवहारात आपल्याला पाहायला मिळते. १९३२ च्या १ सप्टेंबरला मुंबईहून नागपूरच्या सर्व स्वयंसेवक बंधुस उद्देशून लिहिलेल्या पत्रात डॉक्टर लिहितात की, ’’मला हवे तितके दिवस मुंबईत राहू देण्याची आवश्यकता आहे. नागपूरला मी राहून काही विशेष काम करू शकेन, असे मला वाटत नाही. कारण मनावर घेतल्यास माझे पेक्षा कितीतरी कर्तबगार लोक नागपूरचे संघात आहेत याची मला जाणीव आहे.’’ रायपूरच्या कृष्णराव कान्हे यांना ऑक्टोबर १९३२ मध्ये लिहिलेल्या पत्रात रायपूरमध्ये दुसरी शाखा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. तसेच छिंदवाड्यात संघ सुरू झाल्याचा उल्लेख आहे. १९३३ सालच्या पत्रात नागपुरात बगडगंज भागात उपशाखा सुरू झाल्याचे व लवकरच कॉंग्रेस नगर व लेंडी तलाव येथेही उपशाखा उघडायच्या असल्याचा उल्लेख आढळतो. १२ ऑगस्ट १९३३ च्या उमरेडच्या बाळासाहेब दाणी यांना लिहिलेल्या पत्रात नागपूर जिल्हा लवकरात लवकर संघटित करण्याची डॉक्टरांची तगमग दिसून येते. ते लिहितात,’’यावर्षी नागपूर जिल्हा या दृष्टीने संघटित केल्याशिवाय मी संघदृष्ट्या जिवंत राहू शकत नाही, असे माझे स्पष्ट मत झाले आहे. नागपूरच्या प्रत्येक तालुक्यात १० शाखा स्थापन करणे हे लक्ष्य आहे, असे ते म्हणतात व अंतिमतः निर्वाणीचा इशारा देतात, हे कार्य जर आपणा मंडळीकडून होणे अशक्य असेल तर आपण मला हे संघकार्य सोडून विश्रांती घेण्याची परवानगी द्यावी, एवढीच माझी आपणाला शेवटची विनंती आहे. यापेक्षा मी जास्त लिहू शकत नाही.’’ त्याचवर्षी नागपूरमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी १५ वी शाखा सुरू झाल्याचा उल्लेख आढळतो. अमरावती, मलकापूर येथे शाखा स्थापन झाल्याचे व विठ्ठल वामन देशपांडे यांना १ महिन्यासाठी काटोल तालुक्यात संघ कार्यासाठी विस्तारक म्हणून पाठवल्याचा उल्लेख भाऊसाहेब घाटे यांना लिहिलेल्या पत्रात दिसतो. १९३३ च्या डिसेंबर अखेरीस गोपाळराव चितळे यांना डॉक्टरांनी लिहिलेल्या पत्रात ४४ वर्‍हाड-मध्य प्रांत, ४ महाराष्ट्र तसेच काशी आणि बनारस विद्यापीठ या २ अशा ५० शाखा व त्या शाखांचे संघचालक याची सूची आपल्याला वाचायला मिळते. उमाकांत आपटे अर्थात बाबासाहेब आपटे व दादाराव परमार्थ हे दोघेही संघकार्यार्थ डॉक्टरांप्रमाणे प्रवास करीत असत. त्यांचा प्रवास परस्परपूरक व्हावा, त्याची एकमेकांना व डॉक्टरांनाही माहिती असावी, असा उल्लेखही १९३४ च्या पत्रात आढळतो. पू. डॉक्टर लिहितात की, ’’दोघांनीही दोन निरनिराळे विभाग वाटून घेतल्यास किंवा एकेच ठिकाणी एका वेळात कामकेल्यास माझी काही हरकत नाही. मात्र परस्परांशी पत्रव्यवहार जरुर ठेवावा व मलाही प्रत्येक मुक्कामावरून पत्र पाठवित असावे.’’ डॉक्टरांचे काका आबाजी हेडगेवार हे देखील संघ कार्यासाठी दौरा करत असत. या तिघांच्या प्रवासामुळे सोलापूर, नगर, ठाणे, भुसावळ, जळगाव, बर्‍हानपूर व खांडवा शाखा स्थापन झाल्या असल्याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. त्याचवर्षी जुलैमध्ये मुंबईत भरलेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचा लाभ घेऊन मुंबईत संघ सुरू करण्याचा प्रयत्न करावा म्हणून डॉक्टरांनी प्रो. गोळवलकर (श्री गुरुजी) व बाबासाहेब चितळे यांना पाठवल्याचा उल्लेख आप्पाजी जोशी यांना लिहिलेल्या पत्रात दिसतो. यवतमाळच्या अण्णासाहेब जतकर यांना १९३४ च्या १५ ऑगस्टला लिहिलेल्या पत्रात डॉक्टर अखिल भारतात संघकार्याच्या वाढीची पुढील दिशा स्पष्ट करतात. यवतमाळ जिल्ह्यात किमान ५० शाखा असणे आवश्यक आहे, असे लिहून संघकार्य वाढविण्याबद्दल त्यांची संकल्पना ते व्यक्त करतात, संघाचे कार्य हे दिरंगाईने करण्याचे कार्य नसून आपला अखिल महाराष्ट्र आपल्याला शक्य तितक्या लवकर संघटित करून व हा महाराष्ट्राचा नमुना इतर प्रांतापुढे ठेवून पाच-दहा वर्षात संबंध हिंदुस्थान संघटित करावयाचे आहे. १९३५ साली बाबासाहेब चितळे यांना लिहिलेल्या पत्रात ’’अजून बिहार, बंगाल, ओरिसा या ठिकाणी संघकार्य वाढवण्याची तातडी अजून करू नये,’’ याची कारणमीमांसा करताना डॉक्टर लिहितात की, ’’हिवाळी कॅम्पचा अध्यक्ष आपल्याच प्रांतातला पण हिंदू महासभेच्या अधिवेशनाला जाणारा एखादा थोर गृहस्थ निवडावा. बंगाल, बिहार, ओरिसा इ. ठिकाणचे आजच अध्यक्ष नको आहेत. त्या प्रांतात प्रत्यक्ष संघटनेचे कार्य करण्यात निष्णात झालेली आपले येथील भरपूर मंडळी ज्यावेळी आपल्याला पाठवता येतील त्यावेळी तिकडील थोर गृहस्थांना आपले प्रांतात आणून आपले कार्य दाखविण्याचा उपयोग होईल. नाही तर ज्याप्रमाणे भाई परमानंद आपलेकडील सर्व कार्य पाहून गेले पण संघटनेच्या दृष्टीने पंजाबात आपली माणसे कार्य करण्याकरिता जाऊ न शकल्यामुळे त्याचा आपल्याला प्रत्यक्ष काहीही लाभ झाला नाही; त्याप्रमाणेच याचेही होईल.’’ पण लवकरच १९३६ पासून संघटन कार्यात निष्णात समूह हळूहळू तयार होऊ लागल्यावर अन्य प्रांतात कार्यकर्ते पाठविण्याचा विचार डॉक्टर करू लागलेले दिसतात. आबाजी हेडगेवार डॉक्टरांचे चुलत काका होते. त्यांनीही अनेक ठिकाणी दौरे करून शाखा स्थापन केल्याचा उल्लेख आहे. त्यांना १९३६ च्या जानेवारीत लिहिलेल्या पत्रात पुण्याच्या हिंदू महासभा अधिवेशनाची हकीकत कळवून त्यानंतर डॉक्टर असे लिहितात की, ’’आता ठिकठिकाणची बोलावणी संघ शाखा स्थापन करण्याकरिता येत आहेत. या वाढत्या कार्याला मनुष्यबळ पुरविण्याचे कार्य तूर्त तरी नागपूरला करणे प्राप्त आहे.’’ हिंदू महासभेचे नेते बाबू पद्मराजजी जैन यांनी यूपी-बिहार दौर्‍यातून संघ स्थापनेसाठी कार्यकर्ते पाठवा, अशी मागणी केल्याचे डॉक्टरांनी आप्पाजी जोशींना लिहिलेल्या पत्रात कळवले आहे. पण अजूनही डॉक्टरांचा आग्रह नागपूर व मराठी मध्य प्रांत येथील कामअधिक मजबूत होऊन अखिल भारतीय विस्तार पेलायला सक्षम बनविण्याकडे आहे. १९३६ च्या जुलैत गणपतराव देव यांना लिहिलेल्या पत्रात भंडारा जिल्हा संघटित करून तिथे किमान २५ कार्य करणार्‍या शाखा असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करतात. संघाचे काममराठी मध्य प्रांतात सुरू झाले असल्याने तेथील संघाची संघटना किती यशस्वी झालेली आहे, याकडे बारकाईने पाहण्याची वृत्ती इतर प्रांतातील लोकांत असल्याचा उल्लेख करून पुढे लिहितात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ असल्याबद्दल आता कुणालाच शंका राहिलेली नाही पण संघाची कार्यपद्धती व्यवहारात कितपत यशस्वी करता येईल याबद्दल त्यांचे मन साशंक असते. अशावेळी ही पद्धती आमचे प्रांतात आम्ही पूर्णपणे यशस्वी केलेली आहे, हे त्यांना पटवून देणे अवश्य असते. म्हणून इतर प्रांतांत कार्याचा प्रसार करण्याचे पूर्वी आपला प्रांत पूर्णपणे संघटित करणे अवश्य आहे. १९३६ च्या शेवटी विशेष करून महाराष्ट्राबाहेर कार्यकर्ते पाठवायला प्रारंभ झालेला दिसतो. अकोल्याहून आबाजींना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेब आपटे व वसंतराव ओक १८ नोव्हेंबर १९३६ ला दिल्लीला जायला निघणार, अशी तार बाबू पद्माराजजी जैन यांना करावी, असा उल्लेख आहे. यानंतर अनेक कार्यकर्ते देशभर डॉक्टरांनी पाठवले आहेत. पुढे १९३७-३८ सालातील डॉक्टरांच्या पत्रातून दिगंबर पातुरकर लाहोरला, जनार्दन चिंचाळकर मद्रासला, नारायण पुराणिक जालंधरला, राजा जोशी सियालकोटला, मु. द. देवरस अर्थात भाऊराव देवरस लखनौला, नाना भिशीकर, कृष्णराव वडेकर, सगदेव, गाडगीळ आदी दिल्लीला गेल्याचा उल्लेख आहे. पुढे १९३९ च्या पत्रात नाना भिशीकर कराचीला, श्रीगुरुजी विठ्ठलराव पत्कींसोबत कोलकात्याला, दादा परमार्थ व जनार्दन चिंचाळकर मद्रास प्रांतात, बाबासाहेब आपटे यांच्या सोबत बापूराव दिवाकर, नरहरपंत पारखी, मुकुंदराव मुंजे बिहार प्रांतात, गोपाळराव येरकुंटवार जे गेली काही वर्षे मुंबईमध्ये होते त्यांची आंध्र प्रांतात योजना झालेली दिसते. परिणामतः संघकार्य तत्कालीन सर्व प्रांतात प्रारंभ होऊन ओटीसीला अर्थात संघ शिक्षा वर्गाला त्या प्रांतातून शिक्षार्थी आल्याचा उल्लेख पत्रात आहे. १९३९ च्या पत्रात ओटीसीची संख्या ७८० असल्याचे त्यातील ५०५ नागपूरबाहेरील व २७५ नागपूरमधील शाखांतून आलेले आहेत. त्यासोबत पंजाबातून २०, संयुक्त प्रांतातून २०, बिहारमधून ४, बंगालमधून ६ व मद्रासमधून १ शिक्षार्थी आल्याची नोंद आहे. एका अर्थाने हिंदू राष्ट्राचे लघुरूप पाहण्याचा उल्लेख १९४० च्या वर्गाच्या समारोपप्रसंगी पू. डॉक्टर करतात. त्याची पूर्वपीठिका १९३९ च्या वर्गातच तयार झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे १९३९ साली या सर्व प्रांतातून अनेक मान्यवर नागपूरच्या उत्सवास अध्यक्ष यावेत, असा प्रयत्न झालेला दिसतो. त्या वर्षीच्या दसर्‍याला मद्रासहून डॉ. वरद राजलू नायडू नागपूरच्या उत्सवास, कोलकात्याहून डॉ. बी. सी. चॅटर्जी वर्ध्याच्या उत्सवास व डॉ. प्रमथनाथ बॅनर्जी हे पुणे येथील उत्सवास, अजमेरहून चांद किरण सारडा सातार्‍याच्या उत्सवास अध्यक्ष म्हणून आल्याचा उल्लेख आहे. याची देही याची डोळा कार्य पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगणार्‍या डॉक्टरांनी हे विस्तारव्रत शेवटच्या आजारपणातदेखील अखंड चालवलेले दिसते. या काळात बिहारमधील राजगीर येथे पू. डॉक्टर विश्रांतीसाठी गेले आहेत. तिथे वास्तव्यास असताना ५ मार्च १९४० ला दादाराव परमार्थ यांना लिहिलेल्या पत्रात पू. डॉक्टरांनी शाखा स्थापन केल्याचा उल्लेख केला आहे. संघकार्याच्या अखिल भारतीय विस्तारासाठी डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नाचा एक सुस्पष्ट आलेख या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर गोपाळ गोविंद अधिकारी यांनी केशव बळीरामहेडगेवार या नावे केलेल्या संकलनाला लिहिलेल्या प्रस्तावनेत केसरीचे संपादक व लोकमान्यांचे नातू ग. वि. केतकर लिहितात की, ’’डॉ. हेडगेवार यांच्या प्रसिद्धीविन्मुख आणि एकमुखी कार्यपद्धतीमुळे संघाच्या शाखा यावरून कोणाच्या डोक्यावर लादल्याप्रमाणे नव्हत्या, जमिनीतून जसे नकळत पण चौफेर गवत उगवते, नि परवा परवा जे रुक्ष रान होते ते थोडक्या दिवसांत हिरवळीने आच्छादित होऊन जाते, इतक्या स्वाभाविकपणे त्यांनी संघाच्या शाखांचे जाळे क्रमाक्रमाने सर्व देशभर पसरवले. डॉक्टरांच्या या विस्तार व्रतात संघदूत म्हणून ज्यांनी कामकेले अशा व्यक्तिमत्त्वांची धावती ओळख देखील या पत्रव्यवहारातून पुढे येते.
 
 
त्यामधील ही तीन प्रातिनिधिक व्यक्तिचित्रे :
 
 
गोपाळराव येरकुंटवार -
 
गोपाळरावांचा जन्म११ मार्च १९१३ साली नागपूरला झाला. मोहिते वाड्याच्या जवळील विहिरीत पोहणे शिकण्याच्या निमित्ताने त्यांचा डॉक्टरांशी परिचय झाला. पुढे संघ स्थापनेनंतर ते संघशाखेत जाऊ लागले. क्रांतिकारकांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन गोपाळरावांनी बॉम्ब बनविण्याचा प्रयत्न केला व त्याचे परीक्षण मोहिते वाड्याच्या पडक्या आवारात केले. मोठा आवाज होऊन धूर पसरला पण मोठे नुकसान झाले नाही व प्रयोग फसला. डॉक्टरांनी या प्रकरणाचा संघकार्यावर परिणामहोऊ नये म्हणून गोपाळरावांना ४ महिने अज्ञातवासात ठेवले. पुढे १९३४ साली त्यांना सांगली येथील संघकार्यासाठी पाठविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांची तयारी करून घेतलेली दिसते. १९३५ साली पुण्याच्या ओटीसीमध्ये म्हणजे संघ शिक्षा वर्गात त्यांना शिक्षक म्हणून पाठवले. त्याचवर्षी जुलैमध्ये दादाराव परमार्थ यांच्यासोबत त्यांना मुंबईत पाठवले गेले. २६ जुलै १९३५ ला दादाराव परमार्थ यांना लिहिलेल्या पत्रातून डॉक्टरांनी गोपाळराव व मुंबईच्या कामाची चौकशी केलेली दिसते. दादाराव व गोपाळरावांनी मुंबई दौर्‍यांचा तपशील कळवला नाही म्हणून डॉक्टर लिहितात की, ’’मुंबईत कार्याची सुरुवात कुठे कुठे होण्यासारखी आहे? संघस्थान कुठे आहेत अथवा कुठे नाहीत? गोपाळरावांचा मुक्काम कुठे असतो? तो डॉ. सावरकर यांच्याकडे का नसतो तिथे राहण्यात अडचण काय? डॉ. आठल्येंकडे मुक्काम का होता? संघाचे हिताचे दृष्टीने तिथे राहणे अधिक सोईचे आहे का? आवश्यक तिथे कुठेही उतरण्याची परवानगी आहे. फ़क्त अमकी अमकी गोष्ट का केली याची कारणासहित मला माहिती हवी असते इतकेच.’’ १९३६ च्या जूनमध्ये मुंबईचे संघचालक दादासाहेब नाईक यांना लिहिलेल्या पत्रात गोपाळराव मुंबईत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे व या पुढे त्यांना मुंबईत पाठवता येणार नाही, असा उल्लेख डॉक्टरांनी केला आहे. गोपाळराव येरकुंटवार यांना ठरवलेली योजना रद्द करून दादासाहेबांच्या आग्रहावरून पुन्हा मुंबईला पाठविण्याचे निश्चित झाले. त्यावेळी दादाराव नाईक यांना लिहिलेल्या पत्रात मुंबई शहरात स्थानिक लोकांचे काम वाढवणारे बनावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मुंबई शहर हे फ़ार मोठे आहे व म्हणूनच तेथे संघटना घडवून आणणे हेही कठीणच आहे, ही गोष्ट खरी आहे. पण ही कठीण संघटना स्थानिक लोकच घडवून आणू शकतील हीदेखील गोष्ट तितकीच खरी आहे. बाहेरून कार्यासाठी आलेले व स्थानिक यांच्याबद्दल लिहिताना डॉक्टर लिहितात की, ’’दुसरीकडून आलेल्या माणसाचे स्थानिक संघटनेच्या दृष्टीने झालेले प्रयत्न ओळखून ते कार्य आपले शिरावर घेण्यास महत्त्वाची स्थानिक माणसे पुढे येणे संघटनेच्या दृष्टीने किती आवश्यक आहे, हे आपण पूर्णपणे ओळखताच. डॉक्टरांनी ऑक्टोबर १९३६ मध्ये गोपाळराव यांना धुळ्याला पाठवले. डिसेंबरनंतर गोपाळराव मुंबईत येतील व मे महिन्याच्या नागपूरच्या कॅम्पपर्यंत मुंबईत राहतील. पण या ४-५ महिन्याच्या कालावधीचा उपयोग करून घ्यावा, ज्यामुळे मे १९३७ नंतर मात्र त्यांना परत मुंबईत येण्याची आवश्यकता पडणार नाही, असेही डॉक्टरांनी कळवलेले दिसते. पण पुढे मुंबईतील प्रमुख कार्यकर्ता पाटकर यांचे अपघाती निधन झाल्याने गोपाळराव यांना मुंबईतून हलवता येणार नाही, असा उल्लेख एप्रिलमध्ये डॉक्टरांनी वसंतराव ओक यांना लिहिलेल्या पत्रात आहे. १९३९ च्या मार्चमधील पत्रात गोपाळरावांची योजना आंध्र प्रांतात केल्याचा उल्लेख आहे. ते तिथे प्रत्यक्ष गेले याविषयी काही माहिती मिळत नाही. मात्र, १९४० नंतर गोपाळराव मुंबईत कुर्ला येथे शिक्षक म्हणून नोकरी करू लागले व त्यांनी गृहस्थ जीवन स्वीकारले. पुढील संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षक अशी त्यांची ख्याती राहिली.
 
 
जनार्दन चिंचाळकर -
 
जनार्दन चिंचाळकर हे मूळ भंडारा जिल्ह्यातील पवनीचे होते. डॉक्टरांनी वसंतराव ओक, गोपाळराव येरकुंटवार यांच्याप्रमाणे यांचीही तयारी करून घेतलेली दिसते. १९३६ च्या सप्टेंबरमध्ये त्यांना ब्रह्मपुरीला १ महिन्यासाठी पाठविल्याचा उल्लेख पत्रात आढळतो. दिल्ली, पंजाब, झाशी येथे १९३६ साली त्यांना डॉक्टरांनी पाठवले. २६ जुलै १९३७ ला त्यांना लिहिलेल्या पत्रात परप्रांतात काम करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल डॉक्टर मार्गदर्शन करतात, ’’परप्रांतात संघाचे कार्य करणे आहे, तरी सर्व परिस्थितीचे निरिक्षण करून माणसे ओळखून चातुर्याने व धिमेपणाने एक एक पाऊल टाकावे. कार्याची घाई करून आपल्या हातून कोणतीही चूक होऊ देऊ नये.’’ पुढे १९३९ साली त्यांना दादाराव परमार्थ यांच्यासोबत मद्रास प्रांतात पाठविण्यात आले. दादाराव परमार्थ व चिंचाळकर यांना उद्देशून २४ मार्च १९३९ ला लिहिलेल्या पत्रात डॉक्टरांनी त्यांना १५ रु. व २५ रु. अशा दोन मनीऑर्डर पाठवल्या, असा उल्लेख आहे पण पुढे लिहिले आहे की, ’’तुमच्या पराक्रम, शील, बुद्धिचातुर्याने तुम्ही आपली तेथील सर्व व्यवस्था लावून घेऊ शकाल, असा आम्हाला विश्वास आहे. तरीपण जोपर्यंत तशी व्यवस्था होणार नाही तोपर्यंत तुम्हाला लागतील ते पैसे मागवून घेण्यास संकोच करू नये. मात्र पैशाच्या दृष्टीने परप्रांतातील कार्याचा बोजा चांगलाच अंगावर आला यात शंकाच नाही.’’ पत्राच्या शेवटी ओटीसीसाठी माणसे आणावीत, असा सल्लाही दिला आहे. पुन्हा ३१ ऑगस्ट १९३९ च्या पत्रात देखील पैशासंबंधी असाच उल्लेख दिसतो. डॉक्टरांनी कळवले आहे, पैशाची गरज असल्यास तसे स्पष्ट लिहून कळवावे. एका पत्राने न झाल्यास पुन्हा पत्र लिहावे असे लिहिले आहे. ५० रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे व अशा अभावग्रस्त स्थितीत कार्य करणार्‍याबद्दल मनातील कळकळ व्यक्त करताना शेवटी लिहिले आहे, ’’कोणत्याही कारणाकरिता मनावर उदासीनतेचे पातळ येऊ देऊ नये.’’
 
 
वसंतराव ओक -
वसंतराव ओकांचा जन्म १३ मे १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील नाचण येथे झाला. १९२५ मध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते नागपूरला आल्यावर पू. डॉक्टरांशी त्यांचा संपर्क आला. बाबासाहेब आपटे चालवत असलेल्या टायपिंग क्लासमध्ये वसंतराव येत असत. तिथूनच ते पुढे बाबासाहेबांच्या सोबत महालातील डॉक्टरांच्या घरी होणार्‍या अनौपचारिक बैठकीत जाऊ लागले. तेथूनच त्यांचा संघकार्याचा श्रीगणेशा झाला. डॉक्टरांनी अखिल भारतात संघ पोहोचविण्याच्या योजनेसाठी अनेक तरुणांची तयारी करून घेतली. त्यामध्ये वसंतराव ओकांचा समावेश होता. १९३५ सालच्या पुण्याच्या वर्गात वसंतराव ओक यांना शिक्षक म्हणून डॉक्टरांनी पाठविल्याचा उल्लेख पत्रात आहे. त्याच वर्षी वसंतराव ओक इंटरमिजिएट म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षण सुरू करण्यापूर्वी केवळ संघकार्याकरिता एक वर्ष खर्ची घालावयाचे असे त्यांनी ठरविल्याचा उल्लेख डॉक्टरांच्या पत्रात आहे. डॉक्टरांनी त्यांची नियुक्ती वर्षभरासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक तालुक्यात संघकार्याच्या विस्तारासाठी केल्याचा उल्लेख ११ ऑगस्ट १९३५ च्या भय्यासाहेब तोतडे यांना लिहिलेल्या पत्रात आहे. पुणे येथे जानेवारी १९३६ मध्ये हिंदू महासभेचे अधिवेशन भरणार होते. त्यासाठी डॉक्टर २७ डिसेंबर ते १४ जानेवारी अशा दौर्‍यावर गेले. त्यांच्यासोबत सांगलीचे काशिनाथ पंत लिमये व वसंतराव ओक असल्याचा उल्लेख आहे. १९३६ साली त्यांना पुण्याच्या वर्गात शिक्षक म्हणून पाठवले व जुलै १९३६ मध्ये त्यांची नारायणराव पुराणिक यांच्यासोबत भंडारा जिल्ह्यात योजना केली आहे, पण हिंदू महासभा अधिवेशनासाठी पुण्याला आलेल्या बाबू पद्मराजजी जैन यांच्या आग्रहामुळे १९३६ च्या नोव्हेंबरमध्ये डॉक्टरांनी त्यांना बाबासाहेब आपटे यांच्यासोबत दिल्लीला पाठवले आहे. लगेचच ११ डिसेंबरला त्या दोघांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात दिल्लीत संघकार्य प्रारंभ करण्याबद्दल मार्गदर्शन केले आहे. संघटनेकरिता संघटना हे तत्त्व दिल्लीच्या मंडळींना लगेच लक्षात येणार नाही, याबद्दल डॉक्टर लिहितात की, ’’सर्व ठिकाणची परिस्थिती प्रारंभी अशीच असते. नागपूरलासुद्धा संघाच्या बाहेरच्या लोकांना संघटनेकरिता संघटना हे तत्त्व कुठे समजलेले आहे? मग दिल्लीच्या लोकांना ते इतक्यात कसे उमजावे? कार्याचा प्रत्यक्ष अनुभव व दृश्य पाहिल्याशिवाय कुणालाही हे तत्त्व पटणे शक्य नाही. म्हणून या संबंधाने फिकीर करण्याचे मुळीच कारण नाही. संघकार्य प्रारंभ कसे करावे? याबद्दल मार्गदर्शन करताना डॉक्टर लिहितात, ’’आपले तत्त्व ज्यांना पूर्णपणे आकलन करता येईल अशा एकदोनच श्रेष्ठ प्रतीच्या व्यक्ती दिल्लीस मिळाल्या म्हणजे आपले कार्य झाले. अशा एक दोन व्यक्ती मिळविण्याचा मात्र तुम्हाला अवश्य प्रयत्न केला पाहिजे. बाकी इतर मोठ्या पुढार्‍यांना संघकार्य न कळले तरी चालेल.’’
 
 
दिल्लीसारख्या ठिकाणी एकच शाखा काढून ती उत्तम चालवून दाखविणे अवश्य आहे. फारच फार नव्या दिल्लीत एक व जुन्या दिल्लीत एक अशा दोन शाखा आपण सुरू कराव्या. यापेक्षा जास्त शाखा प्रथमारंभी तुम्ही लोकांनी तेथे सुरू करणे हे हिताचे होणार नाही. जास्तीत जास्त जे महत्त्वाचे ठिकाण असेल व ज्या ठिकाणी दिल्लीतील महत्त्वाची मंडळी एकत्रित होऊ शकेल अशा ठिकाणी ही शाखा असावी. सर्व उत्साह व सर्व शक्ती या एका शाखेवर खर्च करावी. सर्व उत्साही तरुणांना याच एका शाखेत येण्यास भाग पाडावे. तुम्ही निरनिराळ्या ठिकाणी संघशाखा स्थापन केल्यास तुमचा उत्साह विभागला जाईल व तेथील लोकांचीही शक्ती एकाच ठिकाणी केंद्रीभूत न झाल्या कारणाने आवश्यक ती संघटना व आवश्यक ते दृश्य निर्माण होऊ शकणार नाही. एक शाखा अत्यंत सुव्यवस्थित व नमुनेदार चालविता आली म्हणजे त्या शाखेतूनच पुढे अनेक शाखा निर्माण होऊ शकतात.
 
 
दिल्लीत संघाचे कार्य करण्यासाठी हे दोघे पोहोचल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. त्याबद्दल लिहिताना, अशा रीतीने प्रसिद्धी झाली म्हणजे कार्यात प्रथमारंभीच अनेक तर्‍हेची विघ्ने येत असतात. म्हणून आपल्या कार्यारंभीच प्रसिद्धीकरण नको असून, लोकांचे समोर दृश्यस्वरूपात कार्य आले म्हणजे आपोआपच त्याची प्रसिद्धी होते व ती संघटनेला हितकारक असते, ही गोष्ट तिकडील लोकांना समजावून सांगून अशी चूक पुन्हा होऊ न देण्याची काळजी घ्यावी. यातून कार्यकर्त्याची चूक त्याला न दुखावता दाखवून देण्याची डॉक्टरांची विलक्षण हातोटी दिसते. पुढच्या वर्षी १९३७ साली डॉक्टर स्वतः दिल्लीच्या दौर्‍यावर गेले आहेत. तिथून आबाजी हेडगेवार यांना १९ ऑगस्टला लिहिलेल्या पत्रात वसंतराव ओक व त्यांची निवासाची सोय जिथे होती ते हिंदू महासभा भवन याचे वर्णन केले आहे. ’’आम्ही सर्वजण हिंदू महासभा भवनात गेलो. हे भवन म्हणजे अत्यंत सुंदर, उंच व हवेशीर ठिकाणी बांधलेला एक राजप्रासाद होय, असे म्हटले तरच त्याचे योग्य वर्णन केल्यासारखे होईल. अशा सुंदर राजभवनात राजबिंडा वसंत ओक हा कसा शोभत असेल याची आपणच कल्पना करावी.’’ विशेषतः डॉक्टरांची पत्रे नागपूरमधील तरुण कार्यकर्त्यांच्या समूहात सर्वांसमोर वाचली जात हे जर लक्षात घेतले तर या वर्णनाचे मर्म आपल्याला लक्षात येईल. ऑक्टोबर १९३७ ला स्वतः वसंतराव ओक यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात दिल्लीचे काम किती वाढवावे याबद्दल डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहे, ’’दिल्लीच्या कामाची सर्व जबाबदारी तुमच्यावर असल्यामुळे जेवढे काम तुम्हाला झेपेल व आटपता येईल तेवढेच काम अंगावर घ्यावे. आपल्या शक्तिपेक्षा कामाचा व्याप जास्त वाढवू नये. कारण त्यायोगे विनाकारण शारीरिक व मानसिक त्रास भोगावा लागतो.’’
 
 
हिंदू महासभेचे अहमदाबाद येथे अधिवेशन होणार होते. त्या निमित्ताने संघ कार्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने वसंतराव ओक अहमदाबाद दौर्‍यावर जाऊन आल्यावर त्याचा वृतांत डॉक्टरांना कळवला. त्याला उत्तर देताना ५ फेब्रुवारी १९३८ ला वसंतराव ओक, कृष्णराव वडेकर, रामजोशी या तिघांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात डॉक्टर लिहितात, ’’धन्य वसंतराव व धन्य वडेकर असे उद्गार सर्वांच्या तोंडून बाहेर पडले. खरोखरच परमेश्वराने तुम्हाला अत्यंत उत्तमक्षेत्र दिग्विजय करण्याकरिता दिले आहे आणि तुम्ही स्वपराक्रमाने या क्षेत्रात विजयी होणारच, असा सर्वांचा विश्वास आहे.’’ स्वा. सावरकर यांचा १९३८ च्या प्रारंभी दिल्ली येथे दौरा झाला. त्यामुळे निर्माण झालेल्या जागृतीचा लाभ संघ कार्यासाठी कसा करून घेतला याची चौकशी २ एप्रिल १९३८ ला वसंतराव ओकांना लिहिलेल्या पत्रात डॉक्टरांनी केलेली दिसते. पत्रात दिल्ली शाखेचे वृत्त विचारले आहे. त्यात ’’स्वयंसेवकांची संख्या तात्याराव येण्यापूर्वी किती होती व आज किती आहे?’’ असा प्रश्न विचारला आहे. दिल्ली संघचालकाची नियुक्ती झाली का हे विचारून त्याबद्दल बाबारावांना (बाबाराव सावरकर) साहाय्य करायला सांगावे, असे लिहिले आहे. ’’योग्य मनुष्य मिळाल्यासच संघचालकाची योजना करावी. घाईघाईत कुणाची तरी योजना होऊ नये. १९३९ च्या सप्टेंबरमध्ये वसंतरावांनी एम. ए. च्या वर्गात प्रवेश घ्यावा. अभ्यास सांभाळून संघकार्य करावे,’’ असेही डॉक्टरांनी सुचविलेले आहे.
 
 
 
पू. डॉक्टरांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नाचे व गोपाळराव येरकुंटवार, वसंतराव ओक, जनार्दन चिंचाळकर, दादाराव परमार्थ, आबाजी हेडगेवार, बाबासाहेब आपटे इत्यादी संघदूतांच्या अविश्रांत परिश्रमाचे फळ म्हणजे डॉक्टरांनी पाहिलेले हिंदूराष्ट्राचे लघुरूप होय.
 
 
 
- भूषण दामले
@@AUTHORINFO_V1@@