सोशल मीडियावरील माहिती सुवर्णापेक्षाही अनमोल‘जळगाव तरुण भारत’तर्फे आयोजित कार्यक्रमात प्रशांत पोळ यांचे प्रतिपादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
सोशल मीडियावरील माहिती सुवर्णापेक्षाही अनमोल
‘जळगाव तरुण भारत’तर्फे आयोजित कार्यक्रमात प्रशांत पोळ यांचे प्रतिपादन
 
जळगाव, १६ मार्च
फेसबुकने १९ बिलियन यूएस डॉलर्स खर्च करून व्हॉट्सऍप विकत घेतले. फेसबुकने एवढा खर्च का करावा? असा प्रश्‍न आजही अनेकांना पडतो. पण व्हॉट्सऍपवर माहितीचा (डेटा) जो अतिप्रचंड स्त्रोत उपलब्ध आहे त्याचे हे मूल्य आहे. जगात १० ते १५ वर्षांपूर्वी तेल आणि सोन्याला जे महत्त्व होते तेच आज माहितीला आहे. त्यामुळे ज्याच्याजवळ ही माहिती आहे त्याच्याकडे जगाची किल्ली आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील वेब भारतीचे संचालक आणि माध्यम तज्ज्ञ प्रशांत पोळ यांनी केले.
 
 
माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित ‘जळगाव तरुण भारत’तर्फे शुक्रवारी हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे ‘बिझीनेस ऽ डिजिटल एज’ या विषयावर प्रशांत पोळ यांचा निमंत्रितांसाठी मार्गदर्शनपर संवाद आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर केशवस्मृती सेवासंस्था समुहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, रावेर येथील श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सोनी ट्रेडर्स व लॅण्डमार्क डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक नंदलाल आडवाणी, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा उपस्थित होते.
 
 
सोशल मीडिया आणि व्यवसायातील यश यावर बोलताना प्रशांत पोळ यांनी सुरुवातीला सोशल मीडियाचा जनमानसावर कसा प्रभाव आहे हे सोदाहरण स्पष्ट केले. आजच्या जमान्यात ज्याच्याकडे अचूक आणि विश्‍वासार्ह माहिती (डेटा) उपलब्ध आहे, त्याच्याकडे जगाची किल्ली आहे. या माहितीचे विश्‍लेषण करून समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला जातो. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला विजय हे याचेच उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. ट्रम्प निवडणूक जिंकणार नाहीत असेच सर्वांना वाटत होते. मात्र, त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत विजय मिळवत सर्वांचे अंदाज चुकवले.
 
 
आज व्यवसाय करण्यासाठी, त्यात यशस्वी होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. त्याला क्रिएटीव्हिटीची-नाविन्याची जोड हवी. सोशल मीडियाच्या सहाय्याने कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो ही जमेची बाजू आहे मात्र, या व्यासपीठाचा योग्य वापर न केल्यास आपण गुंतवलेला पैसा पाण्यात जाऊ शकतो हा धोकाही असल्याचे पोळ यांनी सांगितले. उत्पादनानुसार योग्य ग्राहक निवडून त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता येते याची अनेक व्यावसायिक उदाहरणे त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सचिव स्वप्नील चौधरी, सूत्रसंचालन निलेश वाणी यांनी केले. आभार माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष राजीव बियाणी यांनी मानले.
 
 
‘बी टू बी’ व्यवसायाला चांगल्या संधी
उपस्थितांच्या शंकांचे निरसन करताना प्रशांत पोळ म्हणाले की, सोशल मीडियावरील आपला डेटा सुरक्षित नाही हे सत्य असले तरी तो सहजासहजी पळविताही येऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या सहाय्याने व्यवसाय करायचा असेल तर सतत माहितीचे विश्‍लेषण (अटेंटीव्ह) केले पाहिजे. त्यातून अनेक गोष्टी मिळू शकतात हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. सोशल मीडियावर ‘बी टू बी’ व्यवसायाला चांगल्या संधी आहेत. त्याचाही उद्योजकांनी वापर करून घेतला पाहिजे. सोशल मीडियात सध्या वेब सीरिजचा ट्रेंड आहे. त्यांना मिळणार्‍या ‘लाईक्स’वर मोठी कमाई होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
 
 
नवतंत्रज्ञानाची अशीही किमया
प्रशांत पोळ यांनी अमेरिकेतील एका पालकाचे उदाहरण देत सांगितले की, त्यांच्या मुलीने मॉलमध्ये पाहिलेल्या आणि खरेदी केलेल्या गोष्टींवरून ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले होते. तिच्या खरेदीचे सीसीटीव्ही फुटेज पाहून तिच्या गरोदरपणाचा निष्कर्ष तंत्रज्ञानाने काढला आणि तशी माहिती मार्केटिंग एजन्सीला कळविली गेली. त्यामुळे गरोदरपणा आणि त्याच्याशी संबंधित काळजीबाबतची पत्रके त्यांच्या घरी टाकली जाऊ लागली.
@@AUTHORINFO_V1@@