रिक्षा - टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी शासनाची हेल्पलाईन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |




टोल फ्री क्रमांक गाड्यांमध्ये लावणे बंधनकारक


मुंबई : परिवहन विभागातर्फे रिक्षा-टॅक्सी चालकांची तक्रार करण्यासाठी १८००२२०११० हा टोल फ्री क्रमांक वाहनात लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच ६२४२६६६६ या हेल्पलाईन क्रमांकाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.

दिवसेंदिवस रिक्षा-टॅक्सी चालकांची मुजोरी वाढत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त असून परिवहन विभागाने यावर लक्ष घालावे विधानपरिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. यावर उत्तर देताना रावते बोलत होते. रिक्षा आणि टॅक्सीवाले यांच्या मुजोरीबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक हा टॅक्सी आणि रिक्षामध्ये लावणे अनिवार्य करण्यात येणार असून या टोल फ्री नंबरची जास्तीत जास्त जाहीरात करण्यात येणार असल्याचे रावते म्हणालें


६८ लाखांचे तडजोड शुल्क वसूल

एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत १४,७८८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४३२८ वाहन दोषी आढळले आहेत. त्यापैकी १२९४ चालक परवाने निलंबित केले असून १०२४ वाहनांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच दोषी चालकांकडून ६८.७२ लाख तडजोड शुल्क व १५.६२ लाखांचा न्यायालयीन दंड वसूल केला असल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली.



ग्रामीण भागातील रिक्षा अधिकृत करणार

ग्रामीण भागात पांढर्‍या नंबरवर चालणार्‍या ४ लाख बेकायदेशीर रिक्षा व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर अचानक बंदी आणली तर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच मार्च २०१८ पर्यंत काही शुल्क भरून त्यांना अधिकृत केले जाईल. मार्चनंतर मात्र शुल्क न भरणाऱ्या रिक्षांना बेकायदेशीर ठरवले जाईल अशी माहितीही रावते यांनी दिली.



ओला - उबेरला सीएनजी सक्तीचे
प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजीवर चालणार्‍या रिक्षांना परवानगी यापूर्वी देण्यात आली होती. आता त्याचप्रमाणे ओला-उबेरलाही सिटी टॅक्सीच्या दर्जा देऊन सीएनजी सक्तीचे करणार त्यांनी सांगितले.


ट्रॅफिक नियंत्रणासाठी होमगार्ड
रिक्षा-टॅक्सी चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्यास होमगार्डची मदत घेता येईल का यावर गृहविभागाशी चर्चा करुन होमगार्ड बद्दल निर्णय घेतला असे आश्वासन रावते आ. हेमंत टकले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.


@@AUTHORINFO_V1@@