वळवाच्या पावसाचा आनंद आणि दु:ख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |


हत्तीची सारी ताकद पायामध्ये अशी एक म्हण आहे. भाजपची सारी ताकद सध्या अमित शाह यांच्याकडे आहे. आता प्रश्न असा की, ते जिथे लक्ष देतात त्या निवडणुका जिंकल्या जातात. ते जिथे नाही तिथे संदिग्धता असतेच. हे योग्य की अयोग्य हे काळ ठरवेल मात्र यावरून २०१९ चे ठोकताळे बांधणे म्हणजे वळवाच्या पावसाचा आनंद किंवा दु:ख व्यक्त करण्यासारखे आहे.

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन त्यांच्या राजकीय सभांमध्ये व्यासपीठावर राजकीय नेत्यांची गर्दी झाली असली की, एक हातखंडा नेहमी वापरायचे. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांची नावे घेण्याचा वेळ वाचायचा ते म्हणायचे, ‘हाथी की सब ताकद उसके पॉंव मे’ आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वोच्च नेत्याचे नाव घेऊन ते भाषणाला सुरुवात करायचे. गोरखपूर, फुलपूरमधल्या विरोधकांचा विजय हा समजून घेण्यासाठी तितकाच सोपा, पण पचवायला तितकाच कठीण आहे. देशभरात जिथे जिथे राज्यांच्या निवडणुका येतात तिथे तिथे भाजप जिंकते आणि जिथे जिथे पोटनिवडणुका येतात तिथे तिथे भाजपचा पराजय होतो. यामागचे कारण सोपे आहे. ज्या निवडणुकांमध्ये अमित शाह व त्यांची टीम लक्ष घालते, त्या ठिकाणी त्या निवडणुका दणदणीत मताधिक्याने जिंकता येतात आणि जिथे लक्ष देणे आवश्यक वाटत नाही तिथल्या निवडणुका हातातून जातात. गोरखपूर, फुलपूरसारख्या लहान मोठ्या जागा खरे तर राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने काहीच महत्त्वाच्या नसतात. या जागा स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या तरी सर्वोच्च स्तरावरून विचार करणारा नेता याचा कसा विचार करतो यावर सारी दारोमदार असते. एक निवडणूक झाली की दुसर्‍या निवडणुकीच्या तयारीला पक्ष आणि पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व लागलेले असते. आता ओडिशाच्या निवडणुका कुठेही चर्चेच्या केंद्रस्थानी नाहीत. वर्षभरात या निवडणुका लागतील. मात्र, भाजपच्या कोअर टीमने त्याचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. ज्याप्रकारे त्रिपुराची निवडणूक लढली गेली आणि ज्या प्रकारचे दैदीप्यमान यश भाजपला तिथे मिळाले त्याची तयारी त्रिपुरात घडणार्‍या घटनांचा मागमूसही मुख्य प्रवाहातील माध्यमांना लागला नसताना सुरू झाली होती. माध्यमे, मतदार आणि काहीवेळा सहानुभूतदारांना काय वाटते यापेक्षा विजय मिळविण्याची जबाबदारी घेण्यासाठी ज्यांनी कंबर कसली आहे, त्यांचे म्हणणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्या विचारातून ही मंडळी आज राजकारणात आली आहेत, ज्या विचारांचा वारसा ते सांगतात त्यात अशा व्यक्तिकेंद्रित विचारपद्धतीला नक्कीच स्थान नाही. मात्र, निवडणुका या नेहमी व्यक्तिकेंद्रितच असतात. वाजपेयींनंतर अडवाणींना पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पेश करण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. दुर्दैवाने तो यशस्वी झाला नाही. मात्र, मोदींचा पर्याय लोकांनी स्वीकारला.



गोरखपूर, फुलपूरमध्ये जे घडले त्यामुळे २०१९ ला मोदी पराभूत होतील, असे अद्याप तरी कोणी म्हटले नाही. मात्र, मोदींच्या हितचिंतकांना चिंता वाटते आणि विरोधकांना यात आशेचे किरण दिसतात. ज्या उत्तर प्रदेशच्या निकालावरून आता ठोकताळे बांधले जात आहेत, तो उत्तर प्रदेश इतक्या मोठमोठ्या लोकांना कात्रजचा घाट दाखवितो की त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. उत्तर प्रदेशात फारसे काही न करता आणि कॉंग्रेसचे संघटन पूर्णपणे कोलमडले असताना राहुल गांधी अमेठीतून निवडून येतात. अनेकांना तो घराण्याचा प्रभाव वाटतो. मात्र, गेल्या दोन निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात उभे राहिलेेले उमेदवार पाहिले तर यातली मेख लक्षात येईल. २०१४ ला स्मृती इराणींनी राहुल गांधींच्या विरोधात कडवी लढत दिली. मात्र, अन्य पक्षाचे उमेदवार इतके कमकुवत होते की, त्यांनी फारशी मतेही मिळविली नाही. सपा, बसपाने तर योजना करून काही वेळा उमेदवारच दिलेला नाही. आता एवढ्या भांडवलावर २०१९ चा निष्कर्श लावणे अधिक धाडसाचे ठरेल.


गोरखपूर, फुलपूरच्या निकालांनी भाजपला चिंतन करायला लावले असेल यात काही शंका नाही. या देशातले निवडणुकीचे राजकारण अत्यंत योग्य प्रकारे समजलेले व त्याचे सर्वाधिक चटके सहन केलेली दोन माणसे सध्या भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. विरोधकांना आता तिसर्‍या चौथ्या आणि अन्य कुठल्या आघाडीची स्वप्ने पडायला लागली असली तरी त्यांच्याकडे मतदारांकडे जाण्यासाठी लागणारा कुठलाही अजेंडा नाही. परवा दिल्लीत सोनिया गांधींनी भोजनावळ मांडली होती. अशा भोजनावळी मांडून मोदींना पराभूत करता येत असते तर निवडणुका लढविण्याची कोणतीच गरज लागली नसती. उत्तर प्रदेशातील विजयासाठी मायावती आणि अखिलेश या दोन अही-नकुलांनी युती केली. आपल्यातले सगळे मतभेद बाजूला ठेऊन ‘बबुआ’ आणि ‘बुवा’ एकत्र आले. कॉंग्र्रेसनेही आपल्या तिळमात्र मतांचा आधार या ‘सायकल’वर स्वार झालेल्या ‘हत्ती’ला लावला. या स्थानमहात्म्याचा म्हणून जो काही परिणामव्हायचा तो झालाच, पण त्यामुळे राष्ट्रीय ठोकताळे बांधणे चुकीचे आहे. ज्या प्रकारची समीकरणे आता जुळत आहेत ती पाहाता नव्या राजकीय समीकरणांचा उदय होईल यात शंका नाही. मात्र, ती समीकरणे मोदींच्या पराभवासाठी पुरेशी ठरतील, असे म्हणणे चुकीचे ठरेल.


प्रश्नांचे राजकारण मात्र नक्की आहे. आज सर्वच प्रकारच्या प्रश्नांमधून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याचे परिवर्तन योग्य प्रकारच्या आंदोलनात करण्यात आलेले विरोधकांचे अपयश हाही मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण केलेले प्रश्न तीन-चार वर्षांत हे सरकार सोडवू शकते, अशा अपेक्षा ठेवणे सर्वथा चुकीचे आहे. महाराष्ट्रात गेली तीन वर्षे सतत कुठल्या ना कुठल्या घटना अनुक्रमाने घडतच आहेत. नुकताच झालेला भूमिहीन शेतकर्‍यांचा मोर्चा हा देखील असाच विरोधकांना दिलासा देणारा ठरला. डाव्यांनी सुरू केलेला हा मोर्चा नंतर अन्य विरोधकांनी ताब्यात घेतला. राज ठाकरेंसारख्या संपल्यात जमा असलेल्या नेत्याने तर या व्यासपीठावर चढून सत्ता मागायलाही मागेपुढे पाहिले नाही. मराठा मोर्चाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहे, अशी जोरदार हवा निर्माण केली गेली होती. मात्र, नंतर झालेल्या कुठल्याही निवडणुकीत अशी काही लक्षणे दिसली नाहीत. उलट या सगळ्या परिस्थितीचा फायदा भाजपलाच झाला. कारण इतक्या सगळ्या गोंधळाच्या वातावरणात ‘नेता’ म्हणून समोर येणारा एक माणूस ठामदिसायला लागतो. मतदारांचा कौल नेहमी जबाबदारी घेऊन ठामपणे दिसणार्‍या नेत्याकडेच असतो. धुरळा कितीही उडाला तरीही नेता सक्षमदिसत असला तरी लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच्यामागे उभे राहातात. लोकशाही व्यवस्थेत नरेंद्र मोदी पराभूत होऊ शकतात का? तर या प्रश्नाचे उत्तर नक्कीच ‘होय’ आहे. पण, लगेचच येणार्‍या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. प्रश्न आहे, ‘कोण करणार?’



@@AUTHORINFO_V1@@