डॉक्टरांच्या जीवनात लोकमान्य टिळकांचा कर्मयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |





लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहून गीतेतील कर्मयोगाचा पुरस्कार केला. डॉ. हेडगेवार यांनी लो. टिळकांनी सांगितलेला कर्मयोग प्रत्यक्ष आपल्या जीवनात स्वीकारला, अंगीकारला आणि रा. स्व. संघाच्या स्थापनेतून, संघकार्यातून, संघ स्वयंसेवकांच्या आचरणातून आपल्याला या कर्मयोगाचे रूप पाहायला मिळते.



लोकमान्य टिळक यांचा भारतीय तत्त्वज्ञानातील महनीय सिद्धांत-गीतारहस्य अर्थात कर्मयोग शास्त्र याचे प्रत्यक्ष आविष्कारात्मक प्रत्यंतर म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामहेडगेवार (१ एप्रिल १८८९-२१ जून १९४०) यांचे समग्र जीवन होय. या भूमिकेतून पाहिले तर डॉ. हेडगेवार साक्षात श्रीमद्भगवदगीताच जगले, असे म्हटले तर योग्य होईल.



टिळकांनी गीतारहस्याची त्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेदरम्यान, मंडाले कारागृहातील वास्तव्यात १९०८ ते १९१४ या काळात ४०० हून अधिक पाने पेन्सिलीने चार महिन्यांपेक्षा कमी काळात लिहून काढली आहेत. हाच एक मोठा चमत्कार मानला जातो, परंतु हा ग्रंथ मंडालेहून पुण्यात परतल्यानंतर १९१५ मध्ये प्रकाशित झाला.



गीतेवर अनेक श्रेष्ठ तत्त्ववेत्यांनी भाष्ये लिहिली आहेत. आचार्य शंकराचार्यांचा ज्ञानयोग, ज्ञानेश्वरांचा भक्तियोग व टिळकांचा कर्मयोग ही तीन सर्वमान्य श्रेष्ठ भाष्ये मानली जातात. ही तिन्ही निरुपणे तत्त्वज्ञानातील उत्तुंग शिखरे आहेत. आचार्यांनी विशद केलेला ज्ञानयोग, विश्वातील ज्ञानमार्गी समाजासाठी मुख्यत्वेकरून आहे. ज्ञानेश्वरांनी समाजातील भक्तीमार्गांकित घटकांसाठी प्राकृत भाषेत भक्तियोग पुरस्कारिला आहे तर टिळकांनी सर्वसामान्य जनांसाठी जीवन जगण्यासाठी उपयुक्त असे गीतेतील शास्त्रसार कर्मयोगशास्त्र पुरस्कारिले आहे. या तिन्ही महापुरुषांना भगवद्गीतेत जे सार भावले ते त्यांचे भाष्य होय. रणांगणावर युद्धारंभीच संभ्रमावस्थेतील मतिकुंठीत अर्जुनास जीवनातील त्या युद्धमय संघर्षक्षणी युद्ध करून दुर्जनांचा विनाश करणे हेच श्रेष्ठ कर्म आहे व हेच श्रेष्ठ समाजधर्म कर्तव्य आहे, असा उपदेश भगवान श्रीकृष्णाने केवळ अर्जुनासच केला असे नाही तर हा उपदेश विश्वातील प्रत्येकासाठी आहे, असे टिळकांचे प्रतिपादन आहे. हेच गीतेचे सार आहे, असा टिळकांचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत म्हणजे भक्ती परंपरा व ज्ञान स्रोत या दोहोंची सांगड घालून तत्त्वज्ञान आणि व्यक्ती तथा समाजजीवन यात प्रत्येक व्यक्तीस जीवनव्यवहारातील मार्गदर्शनाचा दीपस्तंभ ठरावा, असा अद्वितीय स्फूर्तिदायी संगमच होय. उपसंहार, प्रकरण १५, गीतारहस्य खंड २ (प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर, नोव्हेंबर, २०१३) मध्ये टिळकांनी गीतेचे सार सांगितले आहे. टिळक प्रतिपादन करतात की, ’’ज्ञानभक्तीयुक्त कर्मयोग हेच गीतेचे खरे तात्पर्य आहे असे सिद्ध होते. सर्व योगामध्ये कर्मयोग हाच सर्वश्रेष्ठ आहे,’’ असे टिळक आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात. समाजजीवनात संसारत्यागापेक्षा कर्तव्यपूर्ती अधिक महत्त्वाची आहे, असे टिळक मानतात.



श्रीमद्भगवद्गीतेचा विश्वातील अनेक महापुरुषांवर प्रभाव पडलेला आढळतो. योगी अरविंदांच्या मते ध्येयवादास आवश्यक असलेल्या मानवी श्रम, जीवन व कर्म यांच्या महत्तेची जाणीव आपल्या अधिकारवाणीने देऊन खर्‍या अध्यात्माचा सनातन संदेश गीता सांगत आहे. हा त्यांचा अभिप्राय ’गीतारहस्य’ ग्रंथाच्या पुरस्कारात नमूद केला आहे. भारतीय अध्यात्माचे सुमधुर फळ असे योगी अरविंदांनी त्याचे वर्णन केले आहे. महात्मा गांधी यांना गीतेचा सारांश सत्य व अहिंसा तत्त्वात सापडतो. गांधीजींनी गीतेचा अभ्यास त्यांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात सर एडविन आर्नोल्ड यांनी केलेल्या गीतेच्या इंग्लिश भाषांतरावरून केला. नंतरच्या काळात गांधीजींनी गीतेचे गुजराती भाषेत रूपांतर केले. योगी अरविंदांना त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी साक्षात्कार झाला व गीतेत निष्कामकर्मयोग प्रतिपादन केला आहे, असे उमगले. मात्र गांधीजींच्या गीतेतील या अहिंसावादी प्रतिपादनास टिळक किंवा योगी अरविंद यांचा दुजोरा नव्हता. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला हा गुन्हा होता काय, असा सवाल टिळकांनी उपस्थित केला होता. अर्थात टिळक हिंसावादी किंवा हिंसेचे समर्थक नव्हते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अर्थात ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सेडिशन कमिटी (१९०८) चे अध्यक्ष जस्टिस एस. ए. टी. रौलेट यांनी मात्र गीता-संदेश हिंसेस व देशद्रोहास फूस लावते, असे मानले आहे. पराक्रमी पण संभ्रमित अर्जुनास कर्मसिद्धांत समजावून सांगण्यासाठी श्रीकृष्णास १८ अध्यायाद्वारे संपूर्ण विवेचन करावे लागले. गीतारहस्यास असलेली टिळकांची स्वतःची प्रस्तावना खंड १ यात त्यांनी स्वतःच्या कर्मयोग सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अतिशय महत्त्वपूर्ण जे संदर्भ दिले आहेत ते त्यांच्या संशोधन वृत्तीची साक्ष देतात. थेओसोफिस्तमि. बूक्स, डॉ. एस. राधाकृष्णन यांचे गीतेवरील भाष्य तसेच पंडित सीतानाथ तत्त्वभूषण यांनी लिहिलेला ‘कृष्ण आणि गीता’ या इंग्रजी ग्रंथाचा संदर्भ हादेखील महत्त्वाचा आहे.



अर्जुनाची संभ्रमावस्था दूर करण्याकरिता श्रीकृष्णाने निरूपणासाठी अंगिकारलेल्या विषयानुक्रमणिकेची रचना पुढीलप्रमाणे आहे - क्रमशः अर्जुनविशाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यास योग, संन्यास योग, ध्यान योग, ज्ञानविज्ञान योग, अक्षरब्रह्म योग, राजविद्या-राजगुह्य योग, विभूती योग, विश्वरूपदर्शन योग, भक्ती योग, क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग, गुणत्रयविभागयोग, पुरुषोत्तमयोग, दैवासुरसम्पद्वीभागयोग, श्रद्धात्रयविभाग योग आणि मोक्षसंन्यास योग. व्यक्ती जीवन, राष्ट्रजीवन तसेच समाज जीवन यात विविध प्रकारचे प्रसंग वारंवार उद्भवत असतात. अनेक वेळा नैराश्याचे, आनंदाचे, भयग्रस्ततेचे, क्रोधाचे, तटस्थतेचे काळ येतात व जातातही. या प्रसंगामध्ये कोणालाही कर्म चुकत नाही, ते टाळता येत नाही. परिणाममाहीत असतानादेखील कठीण प्रसंगात धैर्याने कर्तव्य पूर्ण करतो, त्यास कर्मयोगी म्हणता येईल. संकटाची चाहूल लागलेली असताना धैर्याने नियोजनपूर्वक संकटांचा सामना जो करतो तो कर्मयोगी. निःस्वार्थ बुद्धीने, निरपेक्षपणे गरजूंची जो सेवा करतो, पीडितांना जो आधार देतो व त्यांना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सावरण्यास साह्य करतो तो कर्मयोगी होय. गीतारहस्य, खंड १, प्रकरण ३, कर्मयोगशास्त्र (रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर) मध्ये टिळक लिहितात की, ’’मनुष्य जे जे काही करतो त्याचे खाणेपिणे, खेळणे, बसणे, उठणे, राहणे, श्वासोच्छ्‌वास करणे, हसणे, रडणे, वास घेणे, पाहणे, बोलणे, ऐकणे, चालणे, देणे, घेणे, निजणे, जागे राहणे, मारणे, लढाई करणे, मनन अगर ध्यान करणे, अज्ञ किंवा निषेध करणे, दान करणे किंवा यज्ञयाग करणे, शेती किंवा व्यापारधंदे करणे, निश्चय करणे, गप्प बसणे, इ. सर्वांचा कर्म या शब्दात, भगवद्गीतेत समावेश झालेला आहे. मग ती कर्मे कायिक असोत, वाचिक असोत, वा मानसिक असोत (गी. ५. ८,९ ) किंबहुना देहाचे जिवंत राहणे आणि मरणे हीसुद्धा कर्मेच आहेत. याच खंडातील गीताध्याय संगती या १४ व्या प्रकरणात, समारोप करताना टिळक लिहितात की, ब्रह्मज्ञान व भक्ती यांची जोड घालून अखेर तद्द्वारा कर्मयोगाचे समर्थन करणे हाच गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे, असा आम्ही वर सांगितल्याप्रमाणे सिद्धांत केला. पूर्ण व्यापकदृष्ट्या तत्त्वज्ञानाशी भक्तीचा व कर्मयोगाचा मेळ घालून देण्याच्या गीतेतील अलौकिक चातुर्याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. पुढे ते असे म्हणतात की, गीताग्रंथ संन्यास मार्गाचा किंवा दुसरा कोणत्याही निवृत्तीपर पंथाचा नाही इतकेच नव्हे, तर ज्ञानोत्तरही कर्मसंन्यास करू नये, याचे ब्रह्मज्ञानदृष्ट्या संयुक्तिक उत्तर देण्यासाठी गीतेची प्रवृत्ती झालेली आहे.


टिळकांचा ब्रिटिशांकित भारतीय काळ पाहता तत्कालीन काळ हा संभ्रमित अर्जुनासारखा होता, असे त्यांना सतत वाटत असावे. गीतारहस्यातील या तात्त्विक पैलूचा त्यांनी अतिशय समर्थपणे राष्ट्रकारणासाठी संदर्भ घेतला. ते ज्याप्रमाणे समर्थ संस्कृत अभ्यासक होते, तसेच ते श्रेष्ठ राष्ट्रभक्त होते. संपूर्ण राष्ट्राला समर्थ कर्मयोगी म्हणून उद्युक्त करणे हेच त्यांच्या राजकारण व राष्ट्रकारण यांचे उद्दिष्ट होते. समर्थ राष्ट्रकारणाचा भक्कमपाया टिळकांनी रोवला, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. डॉ. हेडगेवार यांनीही हाच कित्ता आपल्या सार्वजनिक कार्यात यशस्वीपणे गिरवला आहे. नंतरच्या काळातील झालेली संघाची स्थापना हे त्याचे प्रत्यंतर आहे.



 १९२० मध्ये टिळकांच्या देहावसानंतर २७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामहेडगेवार यांच्या जीवनाचे ध्येयदेखील हेच होते, असे लक्षात येते. व्यक्तीजीवन व समाजजीवन यांना डॉक्टरांनी आकार व अर्थ दिला.


रा. स्व. संघाची स्थापना ही भारताच्या आधुनिक इतिहासातील एक विलक्षण प्रारंभिक दूरगामी घटना आहे. भारतीय समाजाची संभ्रमावस्था दूर करून बलशाली, उन्नत व वैभवसंपन्न भारतराष्ट्राचे पुनर्निर्माण करणे हे डॉ.हेडगेवारांचे जीवनध्येय होते. विद्यासंपन्न डॉ. हेडगेवारांनी आपले पूर्ण आयुष्य या ध्येयसिद्धीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत व्यतीत केले. लोकमान्य टिळक व त्यांनी गीतारहस्यात प्रतिपादित केलेला कर्मयोग सिद्धांत यांचा डॉ. हेडगेवारांच्या जीवनावर दूरगामी परिणाम झालेला दिसतो. (डॉ. हेडगेवार ना. ह. पालकर, पान ४९०, प्रकाशक : भारतीय विचार साधना, पुणे, ७ वी आवृत्ती, मे २००८).


अभ्यासकांनी बारकाईने अवलोकन केले तर लक्षात येईल की, वर उल्लेखलेली गीतेतील विषयानुक्रमणिकेची रचना, अर्जुनाची संभ्रमावस्था व त्यानुसार केलेले विवेचन, परिणाम, मार्गक्रमण, कार्यप्रवणता व अंतिमयश या सार्‍या बाबींची अर्वाचीन भारतीय समाजाची व तद्नुषंगाने असलेल्या भारतवर्षाची स्थिती सारखीच न दिसती तरच नवल! डॉ. हेडगेवारांची कार्य व अनुमानपद्धती गीतेतील १८ अध्याय-विषयानुरूप आढळते. डॉ. हेडगेवारांना राष्ट्र्‌जीवनातदेखील ही साम्यस्थळे आढळली. हे १८ अध्याय म्हणजे डॉ.हेडगेवारांसाठी राष्ट्र्‌जीवनातील कार्यसिद्धीसाठी संदर्भ मुद्दे होते. व्यक्तीप्रमाणेच राष्ट्रजीवनातही असे अनेक संकटमय प्रसंग उद्भवतात. या मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी उपाय योजना करणे व भारतवर्षास कोणत्या पद्धतीने पुनर्गौरवित करणे याचा सतत विचार त्यांच्या अंतःकरणात होता. रा. स्व. संघाची स्थापना हा त्या वैचारिक प्रक्रियेचा परिपाक होता.


डॉ. हेडगेवार हे अतिशय टिळकाभिमानी होते. वानगीदाखल एक प्रसंग. कोलकाता येथे नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना एका सार्वजनिक सभेत एक वक्ता ’वंदे मातरम्’विषयी तसेच लोकमान्य टिळकांविषयी काही अभद्र बोलू लागला. ते ऐकल्यावर तत्काळ डॉ. हेडगेवार व्यासपीठावर गेले व त्या वक्त्यास चोपून काढले. तेथे उपस्थित असलेल्या मौलवी लियाकत हुसेन यांना डॉ. हेडगेवारांचे खूप कौतुक वाटले व ते पटकन म्हणाले, ’आफरीन है! आफरीन है! भारत के लाल (शाब्बास!).’


गोळवलकर गुरुजी (१९ फेब्रुवारी १९०६ - ५ जून १९७३) देखील हा समाज आत्मविस्मृत झालेला समाज आहे. त्यास जागृत करणे आवश्यक आहे, असे म्हणत असत. समाज व राष्ट्र चैतन्यमय करणे हे राष्ट्रीय धोरण असले पाहिजे, असे सर्व महापुरुष आग्रहाने प्रतिपादन करतात. रा. स्व. संघाचेही हेच धोरण असते. चैतन्य हे कर्मप्रवण असते, ते तसे असले पाहिजे. गीतेमुळे आपले राष्ट्र चैतन्यदायी होईल, असा दृढविश्वास डॉ. हेडगेवारांना होता. राष्ट्रनिर्माण ही एक चेतना आहे व याचे मूर्त स्वरूप रा. स्व. संघाच्या आकृतीबंधातून प्रकट होईल, असा दृढ विश्वास त्यांनी उराशी बाळगला होता. ज्याप्रमाणे संभ्रमित अर्जुन व श्रीकृष्ण या दोहोत कर्माग्रही संवाद चालू होता, त्याप्रमाणे संभ्रमित समाज व संघ या दोहोंतही सतत गेली नऊ दशके राष्ट्रोन्नतावस्थेसाठी कर्माग्रही संवाद सुरू आहे. समाजजीवनात किंवा राष्ट्र्‌जीवनात नऊ दशके हा अल्पकाळ आहे. त्यामुळे पिढ्यान्‌पिढ्या चालणारा हा प्रवास आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.


डॉ. हेडगेवारांनी, निःस्वार्थ बुद्धीने व निर्हेतुकपणे झालेली हिंसा ही हिंसाच नव्हे, असे गीतेतच श्रीकृष्णाने प्रतिपादन केले असल्याचे नमूद केले आहे. १९२१ नंतर भारतात अनेक ठिकाणी असहकार चळवळ, मलबारमधील मोपल्यांचे बंड व खिलाफत चळवळ या घडामोडींदरम्यान मुस्लिमांचे दंगे झाले. हिंदू समाजाचा असंघटितपणा या सर्व प्रकारात प्रकर्षाने प्रत्ययास आला. डॉ. हेडगेवारांना तो जाणवला. हिंदू समाजाचा कमकुवतपणा दूर करावयाचा असेल तर हिंदूंचे संघटन झाल्याशिवाय समाजाचे सामर्थ्य वृद्धिंगत होणार नाही, असे त्यांच्या मनात पक्के झाले. हिंदू दुर्बल आहेत म्हणून मुसलमानांचे दंगे होतात, हे त्यांच्या मनात बिंबले. समाजाचे संघटन हे कोणत्याही धर्मीयांच्या विरुद्ध नाही तर ते कोणत्याही समाजाच्या अरेरावीविरुद्ध असले पाहिजे, हे त्यांचे ब्रीद होते.


‘‘होय! मी म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे,’’ डॉ. हेडगेवारांचे हे आत्मविश्वासपूर्वक केलेले विधान कित्येक शतकानंतर भारतीय समाज संघटित होत असल्याचे लक्षण आहे. अर्जुनाच्या विषादयोगाचा जणू काही समारोप होऊन ब्रिटिश भारतातच एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला, असेच काहीसे म्हणावे लागेल. डॉ. हेडगेवारांची ही उद्घोषणा टिळकांच्या सिद्धांताचा मूर्तिमंत आविष्कार म्हटली पाहिजे. संघाचे ध्येय व त्यांची कार्यपद्धती हाच या कर्मयोग सिद्धांताच्या आकृतीबंधाचा प्रकट आविष्कार आहे.



डॉ. हेडगेवारांचे जीवनचरित्र हादेखील एका कर्मयोग्याचा राष्ट्रासाठी केलेला यज्ञ होता. हिंदुत्वासच डॉ. हेडगेवार राष्ट्रीयत्व म्हणत असत. येथील राष्ट्रीयत्व जपण्याची मुख्य जबाबदारी हिंदू समाजाचीच आहे, असे ते म्हणत असत. ही त्यांची वैचारिक प्रगल्भता होती. त्यांचा तो विशाल व सर्वसमावेशक दृष्टिकोन होता. अन्यधर्मीयांना कोणताही इशारा किंवा धमकी नव्हती. जणू काही एखाद्या एकत्र कुटुंबातील थोरल्या भावाची भूमिका होती. ऐतिहासिकदृष्ट्या ही भूमिका तर्कसंगत, स्वाभाविक, योग्य व आवश्यक होती. आपल्या या मातृभूमीत वसति करताना अशा परिस्थितीत योग्य प्रतिसाद देऊन जमवून घेण्याची जबाबदारी अन्य सर्व अ-हिंदूंची नाही का?, असा प्रश्न कोणी उपस्थित केला तर तो अयोग्य होणार नाही. भारतात अनेक धर्म-पंथ सध्या आहेत. शतकानुशतके आहेत, पण एक ऐतिहासिक सत्यदेखील नजरेआड करून चालणार नाही. ख्रिश्चन किंवा इस्लामधर्म भौगोलिकदृष्ट्या भारताबाहेर उगमपावलेले आहेत. कालौघात धर्मविस्तारासाठी त्यांच्या राजेरजवाड्यांच्या सैन्याने जेव्हा जेव्हा भारतावर निरनिराळ्या कारणांसाठी आक्रमणे केलीत तेव्हा तेव्हा एतद्देशीय प्रजेला मोठ्या प्रमाणावर बाटवले गेले, येथील स्त्रियांना बंधक बनवून आक्रमकांनी त्यांच्या त्यांच्या देशात नेले किंवा येथेच राहून जबरदस्तीने लग्ने केलीत व नवी मुसलमान किंवा ख्रिश्चनधर्मीय प्रजा वाढवली. यास अपवाद होता तो झोराष्ट्रीयन (पारशी) व ज्यूंचा, हेदेखील नजरेआड करून चालणार नाही. जगाचा इतिहास अभ्यासताना या घटना अपरिहार्य असतात. काही आक्रमक सेनानी परत गेले, तर काहींनी भारत भूमीतच वसती करणे पसंत केले. मोगल आक्रमकानंतर ब्रिटिश आक्रमक ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपात आले. त्यांच्या समवेत आलेल्या ख्रिश्चन धर्मप्रचारकांनी आरोग्य, सेवा, शिक्षण, उद्योगधंदे, कायदा-व्यवस्थापन, राज्यव्यवहार, इ.च्या नावाखाली ख्रिश्चन प्रभाव वाढवला. अर्थात हेही प्रांजळपणे मान्य केले पाहिजे की, ख्रिश्चन व इस्लामयांच्या सान्निध्यामुळे येथील व्यक्ती व समाजजीवन व्यवस्थेवरही परिणामझालेला दिसतो. या काही ऐतिहासिक गोष्टी नाकारून चालणार नाही. अर्थात, यापैकी कोणत्याही बाबींचा येथील राष्ट्रीयत्वावर प्रतिकूल परिणाम होणार नाही. येथील राष्ट्रीयत्व कायम भक्कम राहणार आहे. येथील सर्व मुसलमान किंवा ख्रिश्चन देशद्रोही होते किंवा असतात, असे मानण्याचे मुळीच कारण नाही पण त्यातील काही जण अराष्ट्रीय धर्मांध होते. ते अशिक्षित होते. या सर्व दुरवस्थेतून राष्ट्रास ’सबका साथ सबका विकास’ या न्यायाने उन्नत वळण लावणे आवश्यक होते.


परकीय राजसत्तांधांची भारतावरील सततची आक्रमणे हे भारतातील समाजव्यवस्थेवर आघात होते. येथील शांतीप्रिय व्यवस्थेवर आघात होते. समाजमानस गोंधळून गेले होते. भयभीत झाले होते. समाजाचे संघटन आवश्यक होते. सुसंस्कृत भारतीय समाजाची फेररचना करून ब्रिटिश धर्तीवरील अतिशय मर्यादित स्वरूपाची लोकशाही राज्यव्यवस्था १८५७ नंतर आकार घेत होती. काही अपवाद वगळता अनेक सुशिक्षित भारतीय अभिमानपूर्वक मेकॉलेचे पूजक व पुरस्कर्ते होते. याच पार्श्वभूमीवर १८८५ मध्ये कॉंग्रेसची स्थापना झाली होती. पक्षीय मतभेदांचे राजकारण सुरू झाले होते. १९०६ मध्ये मुस्लीमलीगची ढाका (सध्याचा बांगलादेश) येथे स्थापना झाली होती. १९१५ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी अखिल भारतीय हिंदू महासभा स्थापन केली होती. १९२५ (काही जणांच्या मते १९२०) मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली होती. मानवेंद्र नाथ रॉय, डांगे, इ.टी.रॉय, अबानी मुखर्जी, रोझा फितीन्गोफ, मोहम्मद अली, मोहम्मद सिद्दिकी, रफीक अहमद इत्यादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते. या सर्व राजकीय बुद्धीभेदी व स्वाभिमानशून्य उलाढालीत राष्ट्रनिर्माणाकडे लक्ष द्यायला कोणाही आत्मकेंद्री विचारवंतांना वेळ नव्हता. भ्रामक व्यक्तिवादी पाश्चिमात्यानुनयी उदार मतवादास जणू ऊत आला होता. येथील ऐहिक मागासलेपणावर सतत शरसंधान करण्यात विचारवंतांना प्रागतिकता वाटत असे. पाश्चिमात्त्यांची वैचारिक भलावण करण्यात विद्वत्ता वाटत असे. डॉ. हेडगेवारांचा जन्मव रा. स्व. संघाची स्थापना हीच आधुनिक काळातील एका राष्ट्रीय कर्मयोगयज्ञाची उद्घोषणा आहे. २७ सप्टेंबर १९२५ च्या विजयादशमीस नागपूर येथे डॉ. हेडगेवारांच्या घरी १५०० तरुणांच्या मेळाव्यात रा. स्व. संघाच्या स्थापनेच्या दृष्टीने चर्चा झाली. नव्या संघटनेचे नाव काय असावे याविषयी चर्चा झाली. तीन नावे विचारासाठी होती : (१) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, (२) जरीपटका मंडळ, (३) भारतोद्धारक मंडळ. सर्वांशीच चर्चेअंती सर्वसमावेशक असे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हेचं नाव नक्की झाले. हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांनी अन्यधर्मीयांचा सम्यक विचार करून सर्वांना समाविष्ट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अशी व्यापक भावार्थी संज्ञा स्वीकारली, ही अतिशय महत्त्वाची उदारमतवादी भूमिका आहे, ही राष्ट्रवादी विवेकपूर्ण बाब सर्व पुरोगामी विचारवंतांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे. डॉ. हेडगेवार व संघ यांचा हाच सर्वधर्मसमभाव आहे. राष्ट्रनिर्माणाच्या कर्मयोगयज्ञात प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे, असे हे आवाहन आहे. सर्वप्रथमहिंदूंनी संघटित व शिस्तबद्ध व्हावे, ही राष्ट्रनिर्माणाची पहिली पायरी होती. सर्वत्र गोंधळ-घिसाडघाई करून अव्यवस्था होऊ नये, हा कदाचित हेतू असावा. हिंदू समाजातील अंतर्गत दोष अगोदर दूर करण्याचा हा एक भव्य शांततापूर्ण प्रयत्न होता. रा. स्व. संघ हाच एक रचनात्मक व विधायक असा दीर्घकालिक कार्यक्रम होता.


श्री गोळवलकर गुरुजींनी डॉ. हेडगेवारांच्या चरित्राचे लेखक ना. ह. पालकर यांनी लिहिलेल्या डॉ. हेडगेवार या चरित्र पुस्तकास लिहिलेल्या प्रस्तावनेत असे नमूद केले आहे-स्वार्थशून्य, ध्येयशरण जीवनच विशुद्ध, पवित्र व चारित्र्यसंपन्न असू शकते आणि परमपूजनीय डॉक्टर म्हणजे अंतर्बाह्य शुचितेची साक्षात मूर्तीच होते, हे स्वाभाविकच आहे. शुचिता जणू मानवरूप धरून वावरत होती, असे त्यांच्याकडे पाहून वाटत असे. सार्वजनिक कार्य करणार्‍यात चारित्र्याची जोपासना करण्यासंबंधी उदासीनताच केवळ नव्हे, चारित्र्य आदींविषयी अवहेलना करण्याची सवय असल्यासारखे जे चोहीकडे दिसते, त्या पृष्ठभूमीवर हे धगधगीत पावित्र्याच्या तेजाने तळपत असलेले जीवन अधिकच उठावदार दिसून आपली मने आकृष्ट करण्यात समर्थ व आपल्यातही स्वतःचे जीवन शुचिता व मांगल्ययुक्त करण्याची प्रेरणा आणि विश्वास निर्माण करणारे ठरते.


याच प्रस्तावनेत श्रीगुरुजी डॉ. हेडगेवार यांच्याविषयी असे नमूद करतात, सर्वप्रथमउल्लेखनीय गुण म्हणजे त्यांच्या ठिकाणी वसत असलेली राष्ट्र्‌विमोचनाची, राष्ट्रोन्नतीची तळमळ... ही राष्ट्रभक्ती त्यांच्या ठिकाणी केवळ बाह्य परिस्थितीमुळे उत्पन्न झालेली नव्हती, तर ती त्यांचा अभिजात स्थायी स्वभावच होती... पुढे ते असेही नमूद करतात, लोकमान्यांच्या काळी राजकारण की समाजकारण या वादात लोकमान्यांनी असंदिग्धपणे राजकारणाचाच स्वीकार व पुरस्कार केला होता... आणि याच विचारातून परमपूजनीय डॉक्टरही म्हणत असत की, परतंत्र राष्ट्राला स्वातंत्र्यार्थ झटण्याव्यातिरिक्त अन्य कोणतेच राजकारण असू शकत नाही.


ना. ह. पालकर आपल्या चरित्र पुस्तकात म्हणतात, लोकसंग्रह हा डॉक्टरांचा स्वभाव होता... ज्या हिंदू समाजात चार जणांची तोंडे एका दिशेला झाली तर ती अंत्ययात्रेच्याचवेळी काय ती होतात, असे म्हणण्याची पाळी आली होती, त्याच समाजात सहस्रावधी तरुणांची हिंदुराष्ट्रोत्थानासाठी एक देशव्यापी संघटना डॉक्टरांनी पंधरा वर्षात साकार करून दाखवली, हे त्यांचे असामान्यत्वच होय! या प्रचंड ताकदीच्या कार्यासाठी किती कष्ट, वेळ देणे, प्रवास करणे, दूरदूरच्या नवख्या प्रदेशात, भिन्न भिन्न भाषा बोलणारी माणसे यांच्याशी अत्यंत आपुलकीचे नाते जोडून हे सर्व संबंध कायमठेवणे व सतत वृद्धिंगत करणे, त्यांना प्रेरित करून सर्वत्र देशभर मोठमोठ्या सार्वजनिक उत्सव-कार्यक्रमाचे ध्येयपूर्तीसाठी नियोजन करणे, देशाच्या कानाकोपर्‍यात एकाच प्रकारचे कार्यक्रमएकाच वेळी, ठरलेल्या वेळी बिनचूकपणे अतिशय शिस्तबद्ध रीतीने घडवून आणणे, एक सारखा, एकच विचार विश्वासपूर्वक मांडणे, संघाने निश्चित केलेले वर्षभरातील सर्व सहा सामाजिक व राष्ट्रीय उत्सव देशभर स्थानिक पातळीवरील सर्व विरोधावर मात करून दशकानुदशके साजरे करणे ही जणू परेश्वराचीच इच्छा आहे, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. लोकमान्य टिळकांनी देशभर राष्ट्राभिमानाची चळवळ उभी केली. त्यास डॉ.हेडगेवारांनी चिरस्थायी असे राष्ट्रि्‌नर्माण प्रक्रियेचे स्वरूप दिले असे लक्षात येईल.


डॉ. हेडगेवार चरित्रास लिहिलेल्या हृद्गतात ना. ह. पालकर लिहितात... जे संघाच्या प्रयत्नातील सामर्थ्य आहे ते सर्व परमपूजनीय डॉक्टरांनी स्वतःच्या जीवनातून प्रभावित केलेल्या हिंदुराष्ट्राच्या पुनरुत्थानाच्या आकांक्षेचे व संघशाखेच्या रूपाने प्रचलित केलेल्या अचूक कार्यपद्धतीचे सामर्थ्य आहे. डॉक्टरांची आकांक्षा आज लक्षावधी तरुणांच्या अंत:करणातून धगधगत आहे व संघशाखांच्या वाढत्या प्रसाराने उत्तरोत्तर ती आकांक्षा विस्तारत-विस्तारत देशव्यापी होण्याच्या मार्गावर आहे. ते पुढे असे नमूद करतात, देशभक्तीने प्रेरित होऊन निःस्वार्थपणे कामकरताना कधी चंदनाप्रमाणे झिजण्याचे, तर कधी कापराप्रमाणे क्षणात जळून जाण्याचेही वाट्याला येईल; पण यापैकी परिस्थितीनुसार जे वाट्याला येईल त्याला धिटाईने तोंड देत असतानाही मनाची वृत्ती आनंदी नि विजयाकांक्षीच असली पाहिजे, हे त्यांचे जीवनसूत्र होते.


दिल्ली येथील इंडिया पॉलिसी फाऊंडेशनचे मानद संचालक व दिल्ली विद्यापीठातील एक राज्यशास्त्र प्राध्यापक विचारवंत डॉ. राकेश सिन्हा यांच्याही मते डॉ.हेडगेवारांनी संघटना, समाज, संस्कृती व राष्ट्र यांचा एकसंध व सुसूत्र असा आग्रहपूर्वक विचार मांडला आहे. या चारही मुद्द्यांसाठी डॉ. हेडगेवारांनी आपले सर्व आयुष्य वेचले होते.


डॉ. हेडगेवार अविवाहित होते. नागपूर येथे आपल्या बंधूंच्या घरी ते रहात असत. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची होती. ते स्वतः डॉक्टर होते, वैद्यकीय व्यवसाय करून कुटुंबवत्सल होऊन गडगंज पैसा मिळवू शकले असते. पण राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या या तरुणाने समाजाचे रोगनिदान करून त्या समाजास पुनरुज्जीवित करण्याचे ठरविले. आपल्या स्वतःच्या सर्व आयुष्याचा अविश्रांतपणे धगधगता होमकेला. अविश्वसनीय असे शारीरिक काबाडकष्ट उपसून, स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता देशभर संचार केला, कोणत्याही परिणामाची पर्वा केली नाही किंवा कोणत्याही सुखाची, शाबासकी अथवा सत्काराची अपेक्षा बाळगली नाही. त्यांनी एक क्रांतिकारक असे अभूतपूर्व, प्रचंड, सामाजिक व राष्ट्रीय अध्यात्मावर आधारलेले ईश्वरी कार्य उभे केले. हे सहज शक्य झाले याचे एक कारण म्हणजे ते स्वतः टिळकानुनयी असे एक महान कर्मयोगी होते. संघाचा प्रत्येक कार्यकर्ता कर्मयोगी असावा ही त्यांची भूमिका होती. डॉक्टरांच्या मनाच्या विशालतेचे वर्णन करताना श्रीगुरुजी नमूद करतात, युधिष्ठिराइतकी विश्वसनीय व दुर्योधनालाही सुयोधन म्हणण्याइतकी मधुरता डॉक्टरांच्या वाणीत होती, डॉक्टरांच्या मनाने अशीच समुद्रासारखी मानापमानाची सारख्याच अलिप्तपणे साठवण केली होती, यात संदेह नाही. (संदर्भ : डॉ. हेडगेवार, ना. ह. पालकर). डॉ.हेडगेवार यांच्या ५१ वर्षाच्या अल्पशा आयुष्यात त्यांनी ज्याप्रकारे जीवन व्यतीत केले, जे श्रमसोसले, व्यक्ती-व्यक्ती जोडली, कायमचीआपलीशी करून टाकली, सामान्यातील असामान्यत्व शोधून काढले व स्वतः मागे राहून कित्येकांना डोंगराएवढे महान केले व अविरतपणे राष्ट्रोन्नतीच्या यज्ञात गुंफले, तो एक महान कर्मयज्ञच आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. डॉ. हेडगेवारांनी सुरु केलेल्या या कर्मयोग यज्ञासाठी देशभरात सर्व प्रांतातून ५६ हजारांच्यावर दैनंदिन शाखा पसरल्या आहेत. या सर्व शाखांवर रोज सकाळ संध्याकाळ राष्ट्रोन्नतीसाठी आत्मविश्वासपूर्वक स्मरण केले जाते.


डॉ. हेडगेवारांनी देशातील गेल्या काही शतकांपासून आलेली मरगळ झटकून टाकून या देशातील स्वकीयांनीच केलेल्या आक्रमक बुद्धीभेदांमुळे हरवलेल्या सांस्कृतिक एकात्मराष्ट्रवादाचा शोध घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अहोरात्र परिश्रमकेले व देशाला नवा चेहरा दिला आहे. हाच डॉक्टरांचा कर्मयोगयज्ञ. त्यासाठी डॉ. हेडगेवारांच्या जीवनाचे बारकाव्याने निरीक्षण व अध्ययन केलेतर त्या महान टिळकानुनयी कर्मयोग्याचे अनुकरणीय जीवनकार्य उमजेल.


- डॉ. शरद खरे
@@AUTHORINFO_V1@@