स्वामी विवेकानंदांचा वेदान्त प्रत्यक्ष डॉक्टरांच्या कार्यपद्धतीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |



स्वामी विवेकानंदांनी आपल्या आयुष्यात वेदान्ताचा उपदेश केला. वेदान्त म्हणजे कर्मप्रवणता, उन्नतीची अपेक्षा हे होय. डॉक्टरांनी स्वामी विवेकानंदांचे वेदान्त तत्त्वज्ञान आपल्या कार्यपद्धतीत प्रत्यक्ष कसे आणले, वेदान्त तत्त्वज्ञानाचा संघस्थापनेतील वाटा नेमका काय होता, याचा उहापोह करणारा लेख.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समाजशास्त्रातील अद्भुत आविष्कार आहे, असे माझे मत आहे. विज्ञानाची विद्यार्थिनी आणि संशोधक असल्याने माझे हे मत ठोस आहे. या आविष्काराचे शास्त्रज्ञ - प्रणेते डॉ. हेडगेवार आहेत म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार. कोणताही आविष्कार प्रदीर्घ पृष्ठभूमी असल्याशिवाय पटलावर निर्मित होत नाही. विज्ञानाचे आविष्काराच्या अनेक प्रकारांपैकी दोन प्रकार असे आहेत. १) समस्यांचे निराकरण करणारा आविष्कार आणि २) समस्या निर्माण झाल्या म्हणून जाणीवपूर्वक करावा लागणारा आविष्कार.



डॉक्टरांचा आविष्कार हा या दोन्ही प्रकाराला उत्तर देणारा आविष्कार होय. संशोधन आणि शोध याचे संयुग असणारे हे उत्तर आहे. कुठलाही सामाजिक शोध ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये केवळ समस्यांचे आकलन होऊन चालत नाही तर त्या शोधाचे निराकरण करणारी, एक दीर्घकाळ टिकणारी, सर्व कसोट्यांवर उतरणारी आणि सर्वसंमत अशी पद्धती द्यावी लागते. डॉक्टरांनी नेमके हेच केले. त्याअर्थाने डॉक्टर एक द्रष्टा शास्त्रज्ञ ठरतात. आपल्याला देशात काय चालले आहे ? ते असे कशामुळे चालले आहे? याचे अचूक ज्ञान आणि विश्लेषण डॉक्टरांनी केले. हे विश्लेषण काया-वाचा-मने-बुद्धी-दृष्टी-अनुभूती यांच्या आधारावरचे विश्लेषण आहे. समस्यांचे विश्लेषण केल्यानंतर त्याचे अनेक बाजूने, अनेक अंगाने, अनेकांकडून तपासून घेतले व तद्नंतर एका वाक्यात त्याचे उत्तर दिले ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.’ सामाजिक समस्यांना केवळ वैचारिक स्तरावर उत्तर देऊन भागत नसते तर त्या सोडवणुकीच्या पद्धती द्याव्या लागतात. ती पद्धती म्हणजे संघ शाखा. संघ शाखा ही खुल्या मैदानरूपी प्रयोगशाळेत केलेला प्रयोग आहे. या प्रयोगाला लागणारी रसायने, उपकरणे, वातावरण इ. अनेक गोष्टी म्हणजे माणूस आहे. या प्रयोगाचा कर्ताकरविता लाभार्थी माणूसच आहे. हा माणूस या प्रयोगशाळेत तयार होऊन आपल्याला उद्दिष्टपूर्तीसाठी स्वयंप्रेरणेने सर्वस्व देण्यासाठी जेव्हा सजग होतो, तेव्हा त्याला स्वयंसेवक म्हटले जाते. ही दीर्घ प्रक्रिया आहे, ही सातत्याची प्रक्रिया आहे. या स्वयंसेवकरूपी माणसांच्या पुढील उद्दिष्टे मात्र समान आहेत, सारखीच आहेत. ती म्हणजे १. समग्र हिंदूंचे संघटन २. मम् दिक्षा हिंदू रक्षा. हे हिंदूपण राष्ट्राला जोडून आलेले हिंदूपण आहे. ते जात- धर्म-पंथ या संकुचित परिमाणातले हिंदूपण नाही. म्हणूनच जेव्हा मी हिंदू आहे, असे म्हणण्याची सोय नव्हती, भीती होती, भारत हिंदूंचा आहे, असे उच्चारणे तर सोडाच कल्पना करणेसुद्धा शक्य नव्हते तेव्हा हेच डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी ठासून जाहीर केले, ‘होय मी म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे.’ ’भारत हा हिंदूराष्ट्र आहे,’ हा झाला संकल्प, संकल्पना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अनुभूती आणि विचारमंथनातून तयार झालेले संयुग आहे. ही अनुभूती कोणती होती? त्यातून कोणते मंथन झाले? इतिहासात असे विचारमंथन कुणी केले होते? त्या पथावर डॉक्टरांचा संघ कसा वाटचाल करतो आहे, हा माझ्या या लेखाचा विषय आहे. शब्दमर्यादेमध्ये राहून मागोवा घेण्याचा प्रयत्न यात असणार आहे.


संघाचा संकल्प हा स्वातंत्र्य व तेही संपूर्ण स्वातंत्र्य या प्रतिपादनातील विशेषता होती. म्हणूनच १९२३ च्या मध्यावर डॉ. हेडगेवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून काढलेल्या दैनिकाचे नाव होते ‘स्वातंत्र्य‘. हे दैनिक आर्थिक विवंचनेमुळे जेमतेम वर्षभर चालले. डॉक्टरांची नागपूर नॅशनल युनियन ही संस्था मात्र संपूर्ण स्वातंत्र्याचे प्रतिपादन ठिकठिकाणी करीत होती. ’स्वातंत्र्य’ दैनिकाच्या व्यापातून डॉक्टर जसजसे मोकळे होऊ लागले, तसतसे तरुणांशी संबंध वाढवून त्यांच्यातून संघटन उभे करण्याची कल्पना डॉक्टरांच्या मनात बळाऊ लागली. १९२३-२४ मध्ये एका राष्ट्रप्रेमचर्चामंडळात डॉक्टरांनी शुद्ध राष्ट्रवाद कसा असतो याचे मार्मिक विश्लेषण केले. यातून हिंदू हळूहळू सावध होऊ लागला होता. त्याचाच प्रत्यय म्हणून १९२४ मध्ये दिंडी सत्याग्रहाच्यावेळी मुसलमानांनी जी दंगल केली त्याला प्रत्युत्तर देण्याचे बळ हिंदूंमध्ये आले. १२-१३ जुलै १९२४ ईद व आषाढी एकादशी एकत्र आली, नेहमीप्रमाणे मुसलमानांच्या आक्रमणशीलतेने डोके वर काढण्याचा प्रयत्न केला होता, पण यावेळी डॉक्टरांनी जागा केलेला हिंदू सावध होता. त्यामुळे २५-३० मुसलमानांना पट्‌ट्या गुंडाळून रुग्णालयात पडावे लागले होते. मुसलमान वस्तीतील हिंदूंना वेळीच राजवाड्यात हलविण्याची दक्षता डॉ. मुंजे व डॉक्टरांनी घेतली होती. मुसलमानांच्या व्यापारावर कडक रीतीने बहिष्कार घालण्याची घटना इतिहासात पहिल्यादांच घडत होती. हे सर्व नागपुरात घडत होते. आपल्या चांगुलपणाच्या हाकेला सौजन्याचा प्रतिसाद मिळत नाही, असा कटु अनुभव लोकांना येऊन चुकला होता. बहिष्कार आंदोलनाची तीव्रता इतकी होती की, या काळात मुसलमान खाटिकाच्या जागी हिंदू खाटिक मिळाले नाही तर ‘मी स्वतः खाटिक बनेन’ अशी घोषणा डॉ. मुंजे यांनी केली.


नागपूरमागोमाग देशात इतरत्रही हिंदू-मुसलमान ऐक्याचे साबणी फुगे फुटू लागले होते व बहुतेक सर्वत्र हिंदू पुढार्‍यांना परिस्थितीचा पुनर्विचार करण्यास भाग पडले होते. कोहाटमध्ये ९-१० सप्टेंबर १९२४ ला झालेल्या दंगलीत १५५ जण मृत्युमुुखी पडले व नऊ लक्ष रुपयांची मालमत्ता नष्ट करून मुसलमानांनी लाखो रुपयांची लूट केली. सरोजिनी नायडू यांनी म. गांधींना पत्र लिहिले ‘‘शांतीवरील भाषणे व प्रवचने आता पुरेत.’’ म. गांधीही अत्यंत अस्वस्थ झाले व त्यांनी दिल्लीत मौलाना महंमद अलींच्या घरात डॉ. अन्सारी व डॉ. अब्दुल रहमान यांच्या देखरेखीखाली एक दिवसाचा उपवास घोषित केला. उपवास चालू असताना गांधींनी म्हटले, ’’आवश्यक तर माझ्या रक्ताने या दोघांचा सांधा जुळवून आणण्याचा माझा मानस आहे.’’ या उपवासाने शांतता परिषदांना जन्मदिला व पुन्हा एकदा प्रेमाचा पुळका आल्याप्रमाणे मुसलमानी ऐक्याच्या घोषणा केल्या. या परिषदांतून फलित काय निघाले होते यासंबंधी डॉ. आंबेडकर लिहितात की,’’ ऐक्य परिषदांतून केवळ गोंडस ठराव होत व घोषित होताक्षणीच मोडले जात.’’


मुसलमानांचा अमानुषतेचा नंगानाच दिसत होता. तरीही म. गांधींचे हिंदूंना सांगणे होते की,‘‘तुम्ही मरा, पण मारू नका.’’ या सर्व घटनांनी डॉक्टर अत्यंत व्यथित झाले असतील. या धगधगीच्या काळात डॉक्टरांप्रमाणेच अन्य अनेकांच्या मनात हिंदुत्व जागृत होऊ लागले होते. स्वामी श्रद्धानंद यांनी तर शुद्धी व संघटन यांचा ध्यास घेतला होता. त्यांनी कायदाभंग चौकशी समितीसमोर असे स्पष्ट सांगून टाकले होते की, एकूण एक प्रांतात हिंदू-मुसलमान या दोन्ही जाती परस्परांविषयी संशयग्रस्त झाल्या आहेत, याचे एक कारण असे की, मुसलमान व शीख हे समाज जितके सुसंघटित आहेत, तितका हिंदू समाज नाही. तो अजून विस्कळीत आहे. त्यावर एकच उपाय आणि तो हा की हिंदू पुढार्‍यांनी आपला समाज संघटित करावा. १९२४ च्या शेवटी बेळगावच्या हिंदू महासभेच्या वार्षिक अधिवेशनात पं. मदनमोहन मालवीय यांनीही स्वामी श्रद्धानंदजींच्या वक्तव्याला पुष्टी देणारे विचार मांडले. ते म्हणाले की, ’’हिंदूंच्या अंगी भ्याडपणा दुर्बलता नसती तर हिंदू-मुसलमानातील दंग्यांपैकी पुष्कळ दंगे टळले असते. या दंग्यामुळे राष्ट्रास विघातक अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तिला बर्‍याच अंशी कारणीभूत झालेली हिंदूंची दुर्बलता घालविणे प्राप्त आहे. पुण्याच्या एका प्रकटसभेत स्वामी श्रद्धानंदानी मांडलेले विचारही तत्कालीन पुढार्‍यांच्या मनःस्थितीवर प्रकाश टाकणारे ठरले. ते म्हणाले,’’सिंहगडासारख्या अवघड जागी ज्या महाराष्ट्रीयांनी भगवा झेंडा रोवला, ते अत्यंत निर्भय असेच होते. आज आपण आपला भगवा झेंडा सोडून भलल्याच झेंड्याखाली जमू लागलो आहोत. ही भूल दूर करून पुन्हा आपली खरी ओळख करून घ्या आणि खर्‍या वैदिक धर्माचे व आर्य संस्कृतीचे रक्षण करा.’’


डॉक्टरांच्या मनात असलेल्या हिंदू संघटनेचा वैचारिक ढाचा अशा पद्धतीने तयार होत असताना दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये राहून हिंदू समाजापुरता विचार करून हिंदू हिताचा विचार जिव्हाळ्याने मांडणे, हे शुद्ध जातीयतेचे निदर्शक म्हणून त्याज्यच ठरण्याची शक्यता अधिक होती. १९२५ च्या जानेवारीमध्ये डॉक्टरांचा प्रदेश कॉंगे्रस समितीचा दौरा स्वामी सत्यदेव यांच्यासमवेत झाला होता. अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टरच असत. वर्धा येथे झालेल्या कार्यक्रमात स्वामी सत्यदेवांनी मांडलेल्या विचारांनी हिंदू संघटनेच्या विचारांची बैठक पक्की झाली. ते म्हणाले होते, ’’हिंदू संघटन हे मुसलमानांच्या विरुद्ध आहे, ही कल्पना चुकीची आहे. बदमाश लोकांशी ठोकाठोकी करण्यासाठी हिंदू संघटन करण्यात येत आहे, हा महात्मा गांधींचा समजही चुकीचा आहे. हिंदुस्थान हाच आमचा प्राण, हेच आमचे सर्वस्व अशी हिंदूंची जशी निष्ठा आहे, तशी मुसलमानांची नाही. तशी निष्ठा ठेवण्याविषयी त्यांची समजूत घालावयास हवी तर ते समजतात की, हिंदू लोक आम्हाला घाबरतात, हा त्यांचा अपसमज दूर होण्यासाठी हिंदू संघटन अवश्य केले पाहिजे.


या काळात डॉक्टर निरनिराळ्या कल्पना ऐकून घेत होते व त्यानंतर ते आपल्याही कल्पना विचारार्थ सर्वांसमोर मांडत. त्यात ते म्हणत, ’’हिंदू मुसलमानांची एकी हा भ्रमआहे.’’ हिंदू समाजातील तरुण पिढीला हाती धरण्याचा व तिच्यावर संस्कार करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे हिंदुस्थानच्या हितसंबंधांशी ज्याचे सारे हितसंबंध निगडित आहेत, तो या देशाकडे भारतमाता या पवित्र दृष्टीने पाहतो व ज्याला या देशाबाहेर कोणताही आधार नाही, असा थोर धर्मसंस्कृतीने विनटलेला हिंदू समाज हाच राष्ट्रीय समाज असून तो जागृत व सुसंघटित केला पाहिजे, हे त्यांच्या प्रतिपादनाचे दुसरे सूत्र असे. या राष्ट्रीय संघटनेची उभारणी करताना ती पक्षीय राजकारणाच्या संपूर्ण अतीत ठेवली पहिजे. मात्र कोणत्याही राजकीय पक्षातील व्यक्तीला आपली राजकीय मते कायमठेऊन या संघटनेचे कामकरता आले पाहिजे, असे मते डॉक्टर मांडत. हिंदुस्थानला तत्कालीन स्थिती का आली याचे अचूक निदान डॉक्टरांनी केले होते. ते असे होते, ’’हिंदुस्थानला देशपण आणून देण्यास ज्या हिंदू समाजाने भगीरथ प्रयत्न केले, त्या हिंदू समाजाचा हा देश आहे. त्याचा र्‍हास हा मुसलमान व इंग्रज यांच्या आक्रमणामुळे झाला, हे खरे नसून राष्ट्रीय भावना शिथिल झाल्याने व्यक्ती व समष्टी यांचे वास्तविक असणारे संबंध विस्कटले व अशा विसंघटित स्थितीमुळे पूर्वी दिग्विजयांच्या नौबती झडविणारा समाज शेकडो वर्षे परक्यांच्या पाशवी सत्तेखाली चिरडला गेला. आपल्या समाजात मनुष्यबळ होते. पैसा होता, शस्त्रेही होती पण राष्ट्राचा मी घटक आहे व त्यासाठी मी माझे जीवन व्यतीत केले पाहिजे, ही कर्तव्याची जाणीव बुजल्याने सार्‍या शक्ती असूनही समाज पराभूत झाला. यासाठी समाजाच्या नसानसात ही राष्ट्रीयतेची भावना खेळवावी व त्या भावनेने सारा समाज अनुशासित व संजीवित करून त्याला दिग्विजयी राष्ट्ररूपात उभे करावे, असा महन्मंगल संकल्प डॉक्टरांनी सोडला. तो संकल्प म्हणजे ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, जो शिवरायांच्या कल्पनेतील भगव्या ध्वजाखाली संघटित करण्याची दुर्दम्य इच्छा बाळगणार्‍या समग्र हिंदू समाजाचे संघटन म्हणजे ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.’


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे संघटन केवळ माणसांचा समूह नाही. भारताचा मूळ स्वभाव, भारताचे मूळ समाजमन आणि समाजभान हे वैदिक धर्मावर आधारित व्यवहारात आहे. भारतावर झालेल्या अनेक बाह्य सांस्कृतिक आक्रमणामुळे भारतीय समाज मूळ स्वभाव सोडून/ विसरून संभ्रमित अवस्थेत आला होता. समाजव्यवस्था विस्कळीत झाली होती. खरेतर भारतीय माणसाचा आत्मा वैदिक आहे, परंतु बाह्य सांस्कृतिक अनुकरणामुळे तो मुळापासून दूर गेलेल्या, भरकटलेल्या पक्ष्याप्रमाणे भारतीय समाजाची अवस्था झाली होती. संघापुढे सगळ्यात मोठे आव्हान हेच होते. हे सगळे निस्तारून भारतीयांचे विस्मृतीत गेलेले वैदिक धर्ममन जागे करून आत्मभान जागृत करण्याचे आव्हान संघापुढे होते. सर्व विस्कटलेली घडी नीट करायचे शिवधनुष्य पेलायचे कार्य संघापुढे होते.


स्वामी विवेकानंदांनी व्यावहारिक वेदान्त यावर खूप भाष्य केलेले आहे आणि त्यांनी त्यांच्या हयातीत रामकृष्ण मिशनसारखी संस्था संघटन उभी करून वेदांतिक व्यवहाराचे माध्यमकामे लोकांसमोर ठेवली आहेत. स्वामी विवेकानंदांची शिकवण ही भारतीय मानस शक्ती जाणून केलेली शिकवण आहे. भारत विश्वगुरू होता व भविष्यातही असेल, त्यासाठी भारताचा मूळ स्वभाव जागा केला पाहिजे. व्यापक हिंदूंचे संघटन करून वेदांतिक व्यवहार हा इथल्या माणसाचा सहजभाव झाला पाहिजे, हा स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीचा वस्तुपाठ डॉक्टरांपुढे होता.


संघाच्या कार्यपद्धतीचा ढाचा, कार्य, उपक्रमपाहिले तर लक्षात येते की, विवेकानंदांच्या विषय पत्रिकेवरच संघ कामकरतो आहे.
वेदांत आपल्यासमोर विश्र्वबंधुत्व मांडत नाही, तर वैश्विक एकात्मता मांडतो. चांगला-वाईट, कसाही, कोणीही मनुष्य किंवा कोणीही पशू व मी एकच आहोत हा दृढविश्र्वास म्हणजे वैश्विक एकात्मता.


भारतीयांच्या धार्मिकतेत भारताचा आत्मा आहे, असे सांगत असताना स्वामीजी म्हणत, ’’ज्या देशाने आत्म्याच्या अमरत्वाचा संदेश सर्व जगाला दिला, त्या देशातील लोक भयभीत आहेत, संभ्रमित आहेत. परकीय आक्रमणांचा विरोध करण्याची शक्ती गमावून बसले होते. ज्या देशाने एकत्वाचा संदेश दिला होता, तोच देश-समाज वर्ण, जात, पंथ, संप्रदाय या भेदांमुळे एकमेकांशी भांडत होता. विघटित झाला होता. रुढी-संप्रदाय वादात खरा धर्म झाकून गेला होता.’’


ही सर्व जळमटे दूर करण्यासाठीचा एकच उपाय स्वामीजींना दिसत होता. तो म्हणजे वेदांतदर्शन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. हे उद्दिष्ट ठेवून स्वामीजींनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याचे ब्रीदवाक्य आहे. ‘आत्ममोक्षार्थ जगद् हितायच!’ म्हणजे स्वत:च्या मुक्तीचा मार्ग जनसेवेच्या साधनेतून शोधावा. स्वामीजी पुढे म्हणत, ’’स्वत:च्या मुक्तीचा मार्ग जनसेवेच्या साधनेतून शोधावा. तुम्ही परमेश्र्वरास मंदिरात, मशिदीत किंवा गिरिजाघरात कशाला शोधता? हा विराट जनताजनार्दन तुमच्यासमोर आहे. त्याची सेवा करा. जनसेवा हिच ईश्र्वरसेवा. मुक्तीचा हाच खरा मार्ग आहे.! वेदांत तत्त्वाचा प्रचार-प्रसार आणि व्यवहार करणारे, ती जीवनमूल्ये जगणारे लाखो तरुण-तरुणी या देशात दिसावेत असे स्वामीजींचे स्वप्न होते.


डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेच स्वप्न ध्येय म्हणून उरी बाळगून आपली वाटचाल केली आणि हेच ध्येय लाखो स्वयंसेवकांसमोर कार्यप्रवण होण्यासाठी ठेवले. संघाने सर्वात जास्त भर दिला आहे, तो संस्कारक्षमचारित्र्यसंपन्न व्यक्ती निर्माणाकडे. त्याचे कारण परकीय आक्रमणांच्या काळात शिक्षणाच्या मूळ हेतूलाच तिलांजली दिली गेली. व्यक्तीला सच्छिल, निःस्वार्थी, चारित्र्यसंपन्न, संस्कारक्षमबनविणे हे शिक्षणाचे मूळ कार्य. ब्राह्मणकाळ सर्वश्रेष्ठ काळ होता असे यामुळेच समजले जाते. या काळात प्रचलित झालेली तत्त्वे, विकासाची तत्त्वे, जगामध्ये धर्मतत्त्वे म्हणून स्वीकारली गेली. भारताला ‘देवभूमी’ समजले गेले असावे, ते यासाठीच. समाजधारणेच्या संकल्पना इथल्या भूमीत अधोरेखित झाल्या. त्या सर्व सनातन तत्त्वाच्या होत्या. त्यासाठी ऋषिपरंपरेने प्रचंड मेहनत, तपस्या, अनंत निरीक्षणे, त्रिकालाबाधित तत्त्वे लोकांसाठी, लोकांसमोर ठेवली. मानवी मनाचा, बौद्धिकतेचा जसा एक सातत्याचा विकास प्रवाह आहे, तसा भौतिकवादाचाही जलदगतीने जाणारा प्रवास आहे. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मानव सुविधायुक्त होत गेला व सुधारित दिशेने वाटचाल करू लागला. जो मानव वा मानवसमूह या सुधारणेकडे जलदगतीने वाटचाल करू लागला, सर्व साधनसुचितेचे पालन करून या सर्व भौतिकतेचा अनुभव घेऊ लागला, तशा त्याच्या अपेक्षाही वाढत राहिल्या. नंतरचा काळ असाच येत गेला. या अनुभूती, सुविधा मिळविण्यासाठी चढाओढी सुरू झाल्या. सर्वच कालावधीत लोकसमूहामध्ये ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांची संख्या होती. या दोहोंमध्ये परस्पर स्पर्धा होत राहिल्या असतील. एकमेकांवर कुरघोडी करून चढाओढीने या विकासाच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करत असल्या पाहिजेत. धर्मगुरूंचा काळ (ब्राह्मणकाळ) क्षत्रिय काळ, वैश्यांचा काळ या सर्वच कालावधीत मोठा समूह दुर्लक्षित राहिला, अलिप्त राहिला तो म्हणजे कष्टकरी समूह, सेवा देणारा, सेवा पुरविणारा समूह, प्रत्यक्ष उत्पादन करणारा समूह. तथाकथित ध्यान, धारणा, अभ्यास, तपस्या या शिकवणीच्या बाहेर राहिलेला, जनसेवा हीच ईश्र्वरसेवा समजणारा हा समूह असावा. तथाकथित सुधारणेच्या मार्गावर न आल्याने वरील तिन्ही वर्गाने नाकारल्याने वंचित राहिलेला समूह म्हणजेच मागास समूह यालाच क्षुद्रांचा समूह म्हणावे लागेल. वरील तिन्ही वर्गाकडून दबला गेलेला, दाबला गेलेला समूह कधी ना कधी त्याच्या नैसर्गिक उर्जेने उफाळून उठणारच, याची अनेक द्रष्ट्यांना जाणीव होती. याच जाणीवांना कार्यप्रवण करीत साकार रूप देण्याचे बौद्धिक हे त्याचे प्रारूप म्हणावे लागेल. संघाच्या या शिक्षणपद्धतीत कट्टर राष्ट्रवादी माणूस निर्माण करण्याचे कामकेले जाते. प्रत्येक राष्ट्राचा नागरिक हा राष्ट्रीय विचारसरणीने कट्टरच असला पाहिजे. आपल्या राष्ट्रीय तत्त्वांचा, मूल्यांचा आणि राष्ट्रीय प्रणालीचा त्याला अभिमान असला पाहिजे. राष्ट्रवादी मन असे आपोआप तयार होत नसते. त्याला जाणीवपूर्वक राष्ट्रवादी निर्माणाच्या प्रक्रियेतून जाऊ द्यावे लागते. हे प्रशिक्षण व्यक्तीश: झाले तरच त्याचा परिणामखोलवर आणि दीर्घकाळ राहू शकतो. तात्कालिक पूर्तता करणारे शिक्षण दीर्घकाळ टिकत नाही आणि अशा शिक्षण पद्धतीने राष्ट्रवादी मन निर्माण करणे अवघड असते. भारतासाठी जगणारा, भारतीयत्वाचा अभिमान बाळगणारा आणि भारतमातेच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणारा माणूस /व्यक्ती निर्माणाचे कामडॉक्टरांचा संघ करतो.


संघ विचारांना मानणारा, संघाला विरोध करणारा आणि संघ विचाराला न मानणारा असा समाज भारतात आजही मोठ्या प्रमाणात आहे आणि वरील तिन्ही प्रकारांत न येणारा मोठा समूह समाजात आहे. आजच्या समाजाचे वर्णनच करायचे झाले तर असे करता येईल. कात्रीच्या दोन पात्यांमध्ये सापडलेली आपल्यासारखी संवेदनशील मने भयानक अस्वस्थ मानसिकतेमधून गांगरून गेली आहेत. उपायांचा कुठला मार्ग सापडतो का? याच्या शोधात असणारे अनेक सच्छील लोक समाजात आहेत. ज्या अराजकाचा, संवेदनहीनतेचा, पापी, आक्रमणकारी प्रवृत्तीचा, हिंसक प्रवृत्तीचा प्रभाव समाजात वाढतो आहे त्यातून सुटका कधी होणार? धर्मज्ञान देणारे अप्रामाणिक झाले, शासनकर्ताच समाजाचा शोषणकर्ता झाला. गरिबीच्या, मागासलेपणाच्या नावाने आळशी, कामचोर, कर्मक्षीण, कर्महीन मार्गाने वाटचाल करणारा बहुसंख्य समाज भौतिक भोगवाद, भोगविलास, लैंगिकता यामध्ये गुरफटलेला तरुणवर्ग, माणूसपणाच्या सर्व मर्यादा सोडलेला परंतु स्वत:ला उच्चवर्ग समजणारा पांढरपेशा समाज. मनोरंजनाच्या नावाखाली बिभित्सता पुढे आणणारा आणि त्यालाच समाजवास्तवाच्या नावाखाली लोकांसमोार सादर करणारा बनला. या बिभित्सतेचा बाजार मांडणारा वर्गही याच समाजातला आहे. सांस्कृतिक, धार्मिक, अध:पतनाकडे समाज खूप वेगाने वाटचाल करताना अनुभवास येत आहे. अनेकांच्या मनात ही अस्वस्थता आहे. आपला समाज एका अभिसरणाच्या प्रक्रियेतून चालला आहे. खर्‍या अर्थाने सामाजिक समुद्रमंथनच चालले आहे. या मंथनातून जसे विष बाहेर येईल तसे रत्नेपण बाहेर येतील. याच रत्नासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण ताकदीने या मंथनात सहभागी आहे. या मंथनातून अमृत प्राप्त होईल. हे राष्ट्रवादाचे अमृतसिंचन झाले की, डॉक्टरांचे स्वप्न, स्वामी विवेकानंदांचे उद्दिष्ट, एकात्ममानवतेसाठी भारतानेच नेतृत्व करावे. ते त्यालाच करावे लागेल, असा आदेशच विवेकानंद- परमहंस देऊन गेलेत आणि म्हणूनच संघात स्वयंसेवकांना सांगणे असते, ‘चरेवैति-चरेवैति| यही तो मंत्र है अपना, नहीं रुकना, नहीं थकना सतत चलना, सतत चलना|’


आजच्या घडीला भारतीय जीवनाच्या, समाजाच्या सर्व अंगांमध्ये, सर्व स्तरांमध्ये संघ काम करतो आहे. राष्ट्राला बाधक, राष्ट्राला हानीकारक असलेली कोणतीही म्हणजे ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित समस्या असो स्वयंसेवक निर्भय-निःस्वार्थीपणे कार्यमग्न असतो. नाही रे वर्गासाठी स्वामी विवेकानंदांच्या व्यावहारिक वेदांच्या तत्त्वाप्रमाणे ‘शिवेभावे जीव सेवा’ , दरिद्री नारायणाची सेवा, हीच ईश्र्वर सेवा हा मंत्र घेऊन चालणारी देशभरामध्ये १ लाख ७४ हजार (एक लाख चौर्‍याहत्तर हजार) सेवाकार्य स्वयंसेवक समाजाच्या आधारावर समाजासाठी चालवित आहेत. धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, वैचारिक, साहित्यिक, आरोग्य, वनवासी, ग्रामवासी, गिरीवासी,पुरीवासी, नगरवासी, राजकीय, क्रीडा इत्यादी सर्व क्षेत्रांत अन्य-अन्य संघटनांच्या माध्यमातून चालणारी संघाची कामे राष्ट्रीय जीवन स्वतंत्र ठसा निर्माण करणारी अशीच आहेत. समाजाचा आशावाद संघाच्या प्रति खूप जास्त आहे. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. डॉक्टरांचे स्वप्न, डॉक्टरांच्या संघ स्थापनेमागचे उद्दिष्ट अजून खूप दूर आहे, याची जाणीव सर्व स्वयंसेवकांना आहे आणि म्हणूनच तो अविरत कार्यमग्न आहे. वरील विवेचन वाचून कुणाला असे वाटू शकते की, हे अंधश्रद्धेने लिहिले गेले आहे. मी स्पष्ट करू इच्छिते की, वाद-विवाद करणे, हा विज्ञाननिष्ठ विचार करणार्‍या माणसाचा स्वभाव असतो. तसा माझा स्वभाव आहे. मी डॉक्टरांना पाहिले नाही, दुरूनही अनुभवण्याचे कारण नाही. परंतु मला माझ्या रोजच्या जीवनात डॉक्टरांच्या व विवेकानंदांच्या विचारांचा आधार मिळत जातो. डॉक्टर जन्माला आले. अन्य अनेकजण करतात, तशी एक संघटना स्थापन केली. त्यांच्या जाण्याने संघटन संपले वा थांबले असे झाले नाही. केवळ १५ वर्षांचा कार्यकाळ डॉक्टरांना रा. स्व. संघ स्थापनेनंतर मिळाला. एक-एक व्यक्ती संस्कारित करून डॉक्टरांनी स्वयंसेवक म्हणजे आपले प्रतिरूपच आहे, असे निश्चित करून संघाची कार्यपद्धती अशा पद्धतीने विकसित केली की,आज लाखो स्वयंंसेवकांचा संघ त्याच धैर्य-उद्दिष्टाने कार्यरत आहे. हे सर्वसामान्यांचे कामनव्हे. त्यापाठीमागे खूप मोठी दैवी प्रेरणा कामकरीत असते. म्हणूनच स्वयंसेवक त्याच्याकडे आलेले कामहे केवळ संघाचे कामम्हणून बघत नाही तर हे ईश्र्वरीय कार्य आहे असेच त्याची भावना असते. त्यातून जी शुद्धता, पारदर्शकता त्याच्या कामात येते हीच ती डॉक्टरांची कार्यपद्धती. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, डॉ. हेडगेवार यांच्या कार्याचे जीवनाचे वर्णन याप्रमाणे करता येऊ शकते, ते म्हणजे त्यांनी अखिल भारत आणि अखिल जग यांच्यासमोर स्वत:च्या शिकवणीतून आणि स्वत:च्या प्रत्यक्ष जीवनांनी आधुनिक युगाला उपयोगी असा नवभारत, नवजगाची, नवमानवाची संकेतरेखा ठरेल, असा आदर्श ठेवला आहे. स्त्रियांना -पुरुषांना, गृहस्थांना-संन्याशांना, पौरस्तांना आणि पाश्र्चात्त्यांनादेखील तो आपआपल्या जीवनात उतरविण्यासाठी प्रचंड उद्यम करण्याची स्वत:च्या सफळ- सुफळ, जिवंत-जाज्ज्वल्य उदाहरणाने प्रेरणा देऊन आधुनिक भारताला, आधुनिक जगाला, आधुनिक मानवाला त्यांच्या या साफल्य- शांतीचा महन्मंगल मार्ग दर्शवून ठेवला आहे.


मानवतेच्या रक्षणासाठी भारताला विश्र्वाच्या परिप्रेक्ष्यात खूप भूमिका निभवावी लागणार आहे किंबहुना भारतालाच या परिवर्तनाचे नेतृत्व करावे लागणार आहे. हा रामकृष्ण परमहंस-विवेकानंदांचा दृष्टांत आहे. तसा डॉ. हेडगेवारांचा संघ नावाचा कृतिरुप ढाचा आहे आणि याच उद्दिष्टासाठी स्वयंसेवक डॉक्टरांच्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्यमग्न आहे आणि त्याला ते राहावे लागणार आहे. ‘इदं मम’!


- सुवर्णा रावळ
@@AUTHORINFO_V1@@