पेपर आर्ट्‌सची क्वीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |
 
 
लहानपणापासूनच उत्तम निरीक्षण शक्ती, सृजनशीलता, नवनवीन प्रयोग आपल्या कलाकृतीमध्ये उतरविण्याची उर्मी एखाद्या निसर्गप्रेमी व्यक्तीला कागदाच्या छोट्या तुकड्यांतूनही उत्तम कला सादर करण्याची प्रेरणा देऊ शकते.
 
लहानपणापासूनच उत्तम निरीक्षणशक्ती, सृजनशीलता, नवनवीन प्रयोग आपल्या कलाकृतीमध्ये उतरविण्याची उर्मी आणि निसर्गप्रेमी असलेली ‘टायनी कटिंग पेपर आर्ट्‌स’ची क्वीन अर्थात मुंबईमध्ये राहणार्‍या महालक्ष्मी वानखडेकर यांच्यामध्ये एक कलाकार आणि शास्त्रज्ञ असा दुर्मिळ योग बघायला मिळतो. त्यांच्या या अद्वितीय आणि अंगभूत कलेमुळे त्यांनी या कलेतून साकारलेल्या हुबेहूब गरुडाच्या कलाकृतीमुळे त्यांचे नाव ’लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्येही नोंदवले गेले आहे.
 
महालक्ष्मी यांना अतिशय नाविन्यपूर्ण अशी कला जोपासायची होती. अतिसूक्ष्म असा पेपर कापणे आणि त्याला टोकदार असा योग्य आकार आणत असताना, आणि हुबेहूब तो रंगवून त्यात जिवंतपणा आणताना त्यांना अतिशय आनंद व्हायचा. मग त्या कागदाला अतिसूक्ष्मपद्धतीने कापून त्यातून छोट्या-छोट्या पक्ष्याचा शरीराचे बारकावे साकारणे फारच अवघड असायचे. त्यात प्रत्येक कागदाची किनार ही केसाच्या जाडीपेक्षाही बारीक आणि नाजूक असते. पेपर्सच्या कलाकृती साकारत असताना त्या कधीही उगीच ओढूनताणून काम करत नसत. कागदाचा निसर्गत: एक आकार असतो, त्यामध्येही जीव आणि एकप्रकारची शक्ती असते, जी त्यांच्या कलाकृतींतून मूर्त स्वरूपाने प्रकट होते. १ सेमी बाय १ इंच इतक्या आकाराचा लहान पेपर ७५ वेळा कापून त्यातूनही त्यांनी कलाकृती साकारली आहे.
 
टायनी कटिंग पेपर आर्ट्‌सद्वारे कागदाला कापून व नैसर्गिक आकार देऊन तो रंगवणे व त्यातून हुबेहूब पक्षी, पाने, फुलांचा आकार देऊन योग्य कलाकृती तयार करण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. कारण, पक्ष्यांची कलाकृती ही तयार करणे हे खूपच कठीण असते, कारण प्रत्येक पक्ष्याचे पंख हे वेगवेगळ्या रंगाचे असतात. प्राणी तयार करण्यापेक्षा पक्षी तयार करणे खूपच कठीण असते. एका पक्ष्याचा अभ्यास करायला किमान १ महिना लागतो. त्या एका पक्षात १ हजार इमेजेस बघतात, तर टायनी कटिंग पेपर आर्टपासून एक पेन्टिंग तयार करायला त्यांना किमान १ महिना ते १ वर्षांचा कालावधी लागतो. या कलेच्या माध्यमातून तयार केलेल्या कलाकृती जपून घरात ठेवायच्या आणि संसार सांभाळून साकार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवायला त्यांनी सुरुवात केली. सर्वात लहान कलाकृती ८ बाय १० सेमीची असून सर्वात मोठी कलाकृती ७० बाय १२० सेमीची आहे. २००५ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्येही त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. २००७ मध्ये चायना इंटरनॅशनल वर्ल्ड एक्स्पोमध्ये प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलेली. ज्यासाठी एअर इंडियाने सहकार्य केलेले.
 
२०१६ मध्ये त्यांच्या कलेची दाखल घेत त्यांचे नाव ’लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदविण्यात आले होते. त्यांच्या कलाकृती नावाजलेल्या कंपन्यांनी विकत घेतल्या आहेत. ही कला आपल्यापर्यंत मर्यादित न राहता याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्या कार्यशाळाही घेतात. आपल्या चित्रकार वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन आपल्यासारखेच अनेक कलाकार बनावेत, असा त्यांचा मनोदय आहे.
 
 
 
- तन्मय टिल्लू
 
 
@@AUTHORINFO_V1@@