पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक घोटाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

 

मुंबई : सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पंजाब नॅशनल बँकमध्ये आणखी एक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. नीरव मोदी याच्या १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर मुंबईतील आणखीन एका शाखेमधून ९ कोटी रुपयांचा अवैध व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यासंबंधी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याविषयी चौकशी करत आहेत.


पोलिसांच्या माहितीनुसार चंद्री पेपर आणि अलायन्स प्रॉडक्ट प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला आहे. या कंपनीला बँकेकडून एकूण ९ कोटी ९ लाख रुपयांचे कर्ज अनधिकृतपणे देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे नीरव मोदी याच्या कंपनीप्रमाणेच या कंपनीला देखील कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे या घोटाळ्यामागे देखील बँकेतीलच काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिस सध्या बँक कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत.


गेल्या ९ तारखेला या संबंधी पीएनबीकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु पीएनबीच्या यापूर्वीच्या घोटाळ्याचे देशभरात पडसाद उमटत असल्यामुळे ही घटना लोकांसमोर आली नव्हती. परंतु आज पोलिसांनी याविषयी बँक अधिकाऱ्यांची चौकशी करत असल्यामुळे ही बाब पुढे आली आहे. त्यामुळे सोशल मिडियावर या घटनेसंदर्भात पुन्हा मोठी चर्चा सुरु झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@