राजकारणापेक्षा विकासावर चर्चा होणे गरजेचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

अर्थसंकल्पावरील चर्चेच्या उत्तरात वित्तमंत्र्यांचे आवाहन
 
विरोधकांच्या टीकेचा घेतला खरपूस समाचार
 
शिवसेना-भाजप युती होणारच असल्याचा दावा
 

 

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पावर राजकारण न करता आपण सर्वांनी एकत्र येऊन राज्याच्या हिताच्या दृष्टीने विकासावर व महसूल वाढीवर चर्चा करणे गरजेचे असल्याचे आवाहन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आज विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी केलेल्या सुमारे पावणेदोन तासांच्या भाषणात त्यांनी राज्याच्या विकासाची दिशा स्पष्ट केली. तसेच, कृषी, जलसिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य, अल्पसंख्याक विकास, सामाजिक न्याय या क्षेत्रामध्ये भरीव तरतूद केल्याने राज्याचा विकासदर वाढण्यास मदत होईल, असे सांगतानाच भांडवली गुंतवणूक अन्य राज्यांच्या तुलनेत वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
 
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी विधानसभा सदस्यांकडून अर्थसंकल्पावर मांडल्या गेलेल्या मतांचे व सूचनांचे स्वागत केले. तसेच, विरोधकांनी केलेल्या राजकीय टीकेचा खरपूस समाचारही घेतला. यावेळी म्हणाले की, राज्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही योग्य काम करीत आहोत. ते म्हणाले की, यावर्षी केंद्र शासनाने आर्थिक वितरणाची पद्धत बदलली. त्यामुळे केंद्र शासनाकडून राज्याला ४३ हजार ५१४ कोटी रुपये मिळाले आहेत. शेतकरी आत्महत्या हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. कृषी क्षेत्रात बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात एक पीक पद्धतीमुळे देशात अन्य राज्यांच्या तुलनेत आपली उत्पादकता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या असून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट समोर ठेऊन या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. जलसिंचनाचे वर्षानुवर्षे अपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
यावर्षीच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले, राज्याची वित्तीय तूट वाढली असली तरी करांमध्ये वाढ केलेली नाही. योजना आणि योजनेतर असे स्वरूप बदलले असले तरी कुठल्याही विभागाची आर्थिक तरतूद कमी केली नाही. राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी निधीची तरतूद करतानाच महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी यावर्षी ५७६ कोटी रूपये देण्यात आले आहेत. भविष्यात या योजनेकरिता एक रुपयाही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. राज्य कर्जबाजारी झाले आहे असा भ्रम निर्माण केला जात आहे. त्यात तथ्य नसून अर्थसंकल्पावर राजकारण न करता त्यापलीकडे जाऊन राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकत्र येऊन महसूल वाढ आणि विकासाच्या दृष्टीने चर्चा करणे आवश्यक आहे. त्यातूनच महाराष्ट्र संपन्न करुया, असे आवाहन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या भाषणाच्या समारोपाच्या वेळी केले.
 
शिवस्मारकावरील टीकेवरून विरोधकांचा खरपूस समाचार
मुंबई जवळ अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारल्या जाणाऱ्या स्मारकाबाबत बोलताना विरोधकांनी सरकारवर केलेल्या टीकेचा वित्तमंत्र्यांनी खरपूस समाचार घेतला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या काळात या स्मारकाची घोषणा होऊन किती व कसा विलंब झाला, हे मुनगंटीवार यांनी अनेक दाखले देत निदर्शनास आणून दिले. छत्रपतींनी अफझलखानाच्या केलेल्या वधाचे पोस्टर आघाडी सरकारच्या काळात काढायला लावले असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. तसेच यांच्या कामाची गती पाहून कासवही आत्महत्या करेल असा टोला त्यांनी लगावला. तसेच, नोबेल पुरस्काराप्रमाणे ‘गोबेल्स पुरस्कार’ कुठे असेल तर तो यांना मिळायला हवा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची फिरकी घेतली.
 
शिवसेना-भाजपची युती होणारच !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे उद्घाटन शिवसेना-भाजपचे एकत्रित सरकार करेल. तसेच, निवडणूकही शिवसेना-भाजप एकत्रितपणे लढवेल, असा दावाही सुधीर मुनगंटीवार यांनी या भाषणात केला. आमचे काय ते आम्ही पाहून घेऊ, तुम्ही ‘सामना’ वाचून तुमची मते बनवत जाऊ नका, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आम्ही एकत्र आहोतच, पण पराभवाच्या भीतीने आता तुम्ही एकत्र येऊ लागला असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला टोला लगावला.
 
@@AUTHORINFO_V1@@