टोलनाक्यांवर एमएसआरडीसीचे कर्मचारी तैनात करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

 

 
 
 
मुंबई : राज्यातील सर्व टोलनाक्यांवर यापुढे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.
 
राज्यातील प्रत्येक टोलनाक्यांवर यापुढे राज्य रस्ते विकास महामंडळाचे ५ कर्मचारी तसेच माजी वाहतूक पोलीस अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली दक्षता पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी टोलनाक्यांवर पिवळ्या पट्टयाबाहेर वाहन उभे असल्यास वाहनधारकांकडून टोल घेता येणार नाही, अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. असे असतानाही या ठिकाणी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे सामान्य लोकांना बेकायदेशीर टोलवसुलीचा सामना करावा लागत असल्याचा प्रश्न भाई गिरकर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिंदे बोलत होते.
 
शासनाची कार्यवाही सुरू
या प्रकरणी पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर उभ्या असणाऱ्या वाहनांकडून टोलवसूली न करण्यासाठी, त्याचे केंद्र शासनाचे नियम व निकष, करारनाम्यातील तरतूदी, कायदेशीर व तांत्रिक बाबी तपासण्याची शासनाची कार्यवाही सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच टोलनाक्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
अहवालानंतर टोलबंदीची कार्यवाही
ज्या टोलनाक्यांची वसुली पूर्ण झाली आहे असे राज्यातील टोलनाके बंद करणार का असा विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. त्यावर वाहतूक तज्ज्ञ, अधिकारी तसेच परिवहन व न्याय विभागाचे अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच या टोल नाक्यांबाबत अहवाल मागवण्यात येणार असून अहवाल प्राप्तीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@