जानकर, मेटे, सदाभाऊंच्या भाजप सदस्यत्वावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

स्वतंत्र पक्षाचे आमदार असताना भाजपची आमदारकी कशी? विरोधकांचा सवाल

 

 
 
 
मुंबई : नारायण राणेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून निर्माण झालेले वादळ आता विधानभवनापर्यंत येऊन पोहोचले आहे. महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांच्या भाजप सदस्यत्वावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सदर सदस्य हे स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांना भाजपतर्फे आमदारकी कशी देण्यात आली असा सवाल विरोधकांनी केला आहे. त्यामुळे राणे यांच्या उमेदवारीचे प्रकरण मित्रपक्षांना चांगलेच शेकले आहे.
 
नारायण राणेंनी भाजपकडून राज्यसभेचा अर्ज भरलाच कसा असा प्रश्न विचारून शिवसेनेने नारायण राणेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर हे प्रकरण विधानभवनापर्यंत येऊन पोहोचले. स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदणी असताना या पक्षाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार कसे होऊ शकतात असा सवाल विरोधकांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. या प्रश्नी विधिमंडळाचे अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. तसेच गरज भासल्यास ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
 
... हा घटनात्मक पेच - जयंत पाटील
 
राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी निवडणूक अर्ज भरला. याच पार्श्वभूमीवर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला आणि हा घटनात्मक पेच असून त्यावर सभागृहाने निर्णय घेण्याची मागणी केली.
 
भाजपचे आमदार म्हणून हजेरी कशी- मुंडे
 
पशु व मत्स्यसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असून कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते, तर विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आहेत. हे असे असताना सभागृहात हे सदस्य भाजपचे आमदार म्हणून कसे हजर राहतात असा सवाल विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. एका पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांना दुसऱ्या पक्षाचे आमदार किंवा सदस्य म्हणून राहता कसे येऊ शकते असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, हा प्रश्न घटनात्मक असून त्यावर चर्चा करणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@