तहान – एक लागणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


एका कामानिमित्त सरकारी कार्यालयात गेले होते. अपेक्षेप्रमाणे रांग होतीच. तास - दीड तासाची निश्चिंती. माणसांचे विविध नमुने बघण्यात वेळ घालवत होते. जरा वेळाने थोडीशी तहान लागल्याची जाणीव झाली. रांगेत उभे राहून तासभर होत आला होता. अशा ठिकाणी पाण्याची सोय असेलच असे नाही आणि असली तरी पिण्यायोग्य पाणी असेल याची शाश्वती नसते हा माझा अनुभव. त्यामुळेच माझ्याबरोबर पाण्याची बाटली कायमच असते. सवयी प्रमाणे पाण्याची बाटली काढायला पर्समध्ये हात घातला. बाटली नव्हती. भरलेली बाटली घरीच राहिल्याचे लक्षात आले. आजूबाजूला कुठे पाण्याची सोय आहे कां ते पाहिले पण काहीच सोय नव्हती. रांगेतला नंबर जवळ आला होता त्यामुळे रांग सोडून बाहेर जाता येईना. तेवढ्यात माझा नंबर आला. counter वरच्या माणसाशी बोलायला तोंड उघडलं आणि जीव घाबरा झाला. जीभ कोरडी पडली होती. टाळ्याला चिकटून बसली होती. आत आत ओढली जात होती. तोंडातून शब्द फुटेल की नाही अशी शंका ! कसे बसे त्याला माझे काम सांगितले, विचारलेली माहिती सांगितली आणि बाहेर पडल्यावर पाण्याची बाटली कुठे मिळेल त्याचा शोध घेतला पण जवळपास कुठे दिसेना. तोंडाला पडलेली कोरड हळूहळू शरीरभर पसरत चालली होती. पेशी न् पेशी पाणी मागते आहे असं वाटायला लागलं. ‘ पाणी हा प्रत्येक पेशीचा महत्त्वाचा घटक आहे ’ ह्या विज्ञानात शिकलेल्या वाक्याची प्रचिती अशा प्रकारे येईल अशी कल्पना केली नव्हती कधी! समोर दिसली ती रिक्षा घेऊन घर गाठलं. दार उघडल्या उघडल्या समोरच विसरलेली बाटली दिसली. झाकण काढून भिरकावलं आणि घटा घटा पाणी प्यायले. आजपर्यंत पाण्याची अशी चव कधीच अनुभवली नव्हती. पाणी घशामार्गे, अन्ननलिकेतून पोटात पोचेपर्यंत जणू काही माझ्या सर्व जाणीवा त्या पाण्याबरोबर प्रवास करत होत्या. थोड्या वेळाने ‘ जीवात जीव ’ आला. खरं म्हणजे ‘ जीवात पाणी ’ आलं!



पाण्याला ‘ जीवन ’ का म्हणतात याचा ‘ जिवंत ’ प्रत्यय आला. अशा ‘ जीवघेण्या ’ तहानेचा अनुभव या आधी कधीच नव्हता घेतला. त्यामुळे पाण्याची अशी चवही कधी कळली नव्हती. खऱ्या अर्थाने तेंव्हा तहान ‘ लागणे ’ म्हणजे काय ते अनुभवले. कारण बऱ्याच वेळा तहानेची जाणीव झाल्याबरोबर लगेचच पाणी प्यायले जाते. तहानेची असोशी तिच्या पूर्ण टिपेला जायच्या आतच ती भागवली जाते. त्यामुळे ह्या, एका अर्थाने ‘ जीवघेण्या ‘ अनुभवाला सामोरे गेल्यावर, पोटात गेलेला पाण्याचा पहिला घोट जो काही विलक्षण अवर्णनीय समाधान देतो, तो अनुभवायला असे काही कारणाने पाण्यापासून वंचित राहावे लागेल.

आंघोळीची पण अशीच ‘ तहान ’ लागलेली मला आठवते. बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेज मध्ये असताना, एका आंदोलनाच्या निमित्ताने, रेल्वेचा एक मोठा प्रवास केला होता. खूप मोठा group होता. आरक्षणाचा वगैरे काही सवालच नव्हता. एका मोठ्या डब्यात आम्ही सर्व जण अक्षरशः मेंढरांसारखे कोंबलेले होतो. येता – जाता हीच तऱ्हा होती. मिळेल तेंव्हा, मिळेल ते खात होतो. तरीसुद्धा घरी परत आल्यावर, अन्नापेक्षा आंघोळीची ‘ तहान ’ लागलेली आजही आठवते आहे. दोन दिवसाच्या अंग मोडून टाकणाऱ्या प्रवासात, साधे चेहऱ्यावर पाणी मारणेही दुरापास्त होते. त्या दिवशी, प्रवासाने आंबून गेलेल्या, धुळीने मळलेल्या आणि दोन दिवस पाण्यापासून वंचित राहिलेल्या अंगाला झालेला, ऊन ऊन पाण्याचा स्पर्श, जणूकाही पुनर्जन्मच झाल्याची अनुभूती देऊन गेला. असे वाटत होते की आताच जन्मले आहे आणि पहिली आंघोळ करते आहे. तसा प्रवासही नंतर घडला नाही आणि तशी आंघोळसुद्धा!

साधारणतः पाण्याची ‘ तहान ‘ लागते आणि अन्नाची ‘ भूक ‘ लागते. पण बरेच दिवस बाहेर फिरायला गेल्यावर, बाहेरचे अन्न खाऊन कंटाळा येतो, तेंव्हा घरच्या पिठलं - भाताची जी लागते, तिला ‘ भूक ‘ म्हणण्यापेक्षा ‘ तहानच ‘ म्हणायला हवं माझ्यामते! कारण भूक कशानेही भागू शकते पण तहान फक्त पाण्यानेच भागते, तसंच तेंव्हा कोणी पंचपक्वांन्नही देऊ केली तरी नको असतात. हवा असतो तो फक्त पिठलं – भात.



बऱ्याच दिवसात काही चांगलं वाचलं नसेल, चांगलं ऐकलं नसेल, उत्तम कविता - वाचनाचा अनुभव घेतला नसेल, दर्जेदार कलाकृती, मग ती प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे, पेंटिंग, चित्रपट, नाटक, कोणतीही असो, अनुभवली नसेल, व्यायाम करता आला नसेल, खेळ खेळता आला नसेल, तर ह्या गोष्टींची पण ‘ तहान ‘ लागते. ह्या तहानेची तीव्रता जितकी अधिक, तितका ती तहान भागवणारा अनुभव संस्मरणीय, अतुलनीय आणि दुर्मिळ होऊन जातो. असा अनुभव येण्यासाठी ह्या आवडीच्या गोष्टी, छंद ह्यांना आपल्या आयुष्यात ‘ पाण्या ‘ एवढे महत्त्व असायला हवे. हे ‘ पाणी ‘ आपल्या नेहमीच्या रामरगाड्यात हरवले असेल तर ते शोधायला हवे. आपल्या शरीराचा पाणी हा जसा महत्त्वाचा घटक आहे तसंच आपल्या जीवनाचा, हे छंद आणि आवडीच्या गोष्टी हा महत्त्वाचा घटक आहे. अन्न – वस्त्र – निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या अगतिकतेच्या रखरखाटात, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, असे ‘ पाणी ‘ प्रत्येकाकडे असणे फार गरजेचे आहे. ह्या पाण्याची तहान भागवण्यासाठी केलेली धडपड आणि पूर्तते नंतर मिळणारे समाधान याच्या बळावरच रखरखाटाचा सामना आनंदाने करणे शक्य होते. असे ‘ पाणी ‘ , अशी ‘ तहान ‘ आणि ती भागल्यानंतरचे ‘ समाधान ‘ ही प्रत्येकाने अनुभवण्याचीच गोष्ट आहे. ह्या आनंदाचे वर्णन करायला शब्दसंग्रह अपुराच पडेल!



- शुभांगी पुरोहित 
@@AUTHORINFO_V1@@