उत्तर प्रदेशमध्ये भाजपला धक्का, बिहारमध्येही कमळ कोमेजले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर, फुलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले असून भारतीय जनता पक्षाला या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये चांगलाच दणका बसला आहे. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी घेतली आहे तर बिहारच्या अररिया येथे राष्ट्रीय जनता दलाने बाजी मारली आहे. गोरखपूर हा भाजपचा गड समजला जातो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर हा लोकसभा मतदार संघ असून ते राज्यात मुख्यमंत्री झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक घेण्यात आली होती. त्यामुळेच ही भाजप व सपा-बसपा यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती. मात्र या निवडणूकीत भाजपला हार पत्करावी लागल्यामुळे विरोधी पक्षाच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे.
 
 
गोरखपूर लाकसभा मतदार संघात भाजप उमेदवार उपेंद्र दत्त शुक्ला यांचा समाजवादी पक्षाच्या प्रवीणकुमार निशाद यांनी २१, ८८१ मतांनी पराभव केला. तर फुलपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या नागेंद्र प्रताप सिंह पटेल यांनी भाजपच्या कौशलेंद्र सिंह पटेल यांच्यावर विसाव्या फेरीच्या शेवटी २९,४७४ मतांची आघाडी घेतली होती.
 
 
 
 
 
गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघातील पराभव भारतीय जनता पक्षासाठी खूपच धक्कादायक आहे. या दोन्ही मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य करत असल्याने ही पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात भाजपाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र आता लोकसभा पोटनिवडणुकांच्या निकालाने भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या फुलपूर लोकसभा मतदार संघातही पक्षाला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांच्याही जागा गेल्यामुळे भाजपला हा जबर धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
  
 
 
 
 
बिहारमध्येही अररिया लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. राष्ट्रीय जनता दलाच्या मोहम्मद तस्लिमुद्दीन यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे राजदचे सरफराज आलम व भाजपचे प्रदीप सिंग यांच्यात या जागेसाठी सरळ लढत होती. सरफराज आलम यांना ५,०९,३३४ मते मिळाली तर प्रदीप सिंग यांना ४,४७,३४६ मते मिळाली. त्यामुळे सरफराज आलम यांचा ६१,९८८ मतांच्या फरकाने दणदणीत विजय झाला.
 
 
याच वेळी बिहारमध्ये दोन विधानसभा मतदारसंघांसाठीही पोटनिवडणूका झाल्या होत्या. त्यांचीही मतमोजणी आज करण्यात आली. जेहानाबाद व भाबुआ मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. यामध्ये जेहानाबादमध्ये मतदारसंघात राजदचा तर भाबुआमध्ये भाजपचा विजय झाला आहे.
 
 
आज सकाळी या मतमोजणीला सुरुवात झाली असून सकाळपासून भाजप आणि सपा-बसपा आघाडी यांच्यामध्ये या दोन्ही ठिकाणी कलगीतुरा रंगला होता. मात्र आता शेवटी सपा-बसपा यांच्याकडून निकाल लागला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये यश मिळाल्याने समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी जल्लोष साजरा करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@