ईशान्य भारतातील समस्यांचे मूळ भारताच्या फाळणीत !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

सुनील देवधर यांनी साधला मुंबईतील पत्रकारांशी संवाद
मनाने आजही संघ प्रचारकच असल्याची व्यक्त केली भावना
 

 
 
मुंबई : ईशान्य किंवा पूर्वोत्तर भारतातील आजपर्यंतच्या समस्यांचे मूळ हे भारताच्या फाळणीत असल्याचे मत त्रिपुरा भाजप प्रभारी सुनील देवधर यांनी व्यक्त केले. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ईशान्य भारतात जेवढे झोकून देऊन काम केले, तेवढे इतर कोणत्याही संघटना/राजकीय पक्षाने केले नसल्याचेही देवधर यांनी सांगितले.
 
त्रिपुरामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार मानले जाणारे भाजपचे त्रिपुरा राज्य प्रभारी सुनील देवधर यांनी आज मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्रिपुरातील भाजपचा शून्य जागांपासून बहुमतापर्यंतचा प्रवास उलगडला तसेच ईशान्य भारतातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. देवधर यावेळी म्हणाले की, मी संघ प्रचारकाच्या जबाबदारीतून काही वर्षांपूर्वीच मुक्त झालो असलो तरी, मनाने मी आजही संघ प्रचारकच आहे. त्यामुळे आजही सतत माझ्या मनात संघटनात्मक कामाचाच विचार सुरू असतो. तसेच, त्रिपुरामधील भाजपचे यश हे माझे एकट्याचे यश नसून, पक्षाने घेतलेल्या संघटनात्मक मेहनतीचे फळ असल्याची भावनाही देवधर यांनी व्यक्त केली.
 
भारताची फाळणी हे ईशान्य भारतातील समस्यांचे मूळ असल्याचे मत त्यांनी मांडले. फाळणीमुळे हा प्रदेश 'लँडलॉक्ड' झाला. स्वातंत्र्यानंतर व फाळणीनंतर या प्रदेशाकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज होती, मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी ईशान्य भारताची दखलही घेतली नाही, अशी टीकाही देवधर यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ईशान्य भारतातील कामाबद्दल ते म्हणाले की, संघाच्या स्थापनेनंतर पहिल्या दिवसापासूनच ईशान्य भारत हा संघाच्या चिंतनातील एक मुख्य विषय होता. कोणत्याही संघटनेने वा पक्षाने ईशान्य भारतात एवढे झोकून देऊन काम केले नसेल तितके रा. स्व. संघाने केल्याचे ते म्हणाले.
 
त्रिपुरातील ऐतिहासिक विजयाचा प्रवास उलगडला
सुनील देवधर म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी माझ्याकडे दिली त्यावेळेस त्रिपुरात भाजपचे अस्तित्व शून्य होते. त्यानंतर सलग ६ महिने मी संपूर्ण त्रिपुरा राज्याचा प्रवास करून राज्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. या काळात तिथली परिस्थिती पाहून इथे आपली सत्ता येईल असे वाटत नव्हते. ती येऊ नये म्हणून प्रयत्नही झाले. केवळ १३ महिन्यात भाजपच्या ११ कार्यकर्त्यांची हत्या झाली. एका वर्षात ५५० कार्यकर्त्यांवय गंभीर हल्ले झाले, मालमत्तांचे नुकसान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
ज्या राज्यात कम्युनिस्टांची सत्ता असते, तिथे दोन वर्ग असतात. एक कम्युनिस्ट निष्ठावंत आणि दुसरा कम्युनिस्ट नसणारा. निष्ठावंतांना सर्व सरकारी योजनांचे लाभ दिले जातात तर कम्युनिस्ट नसणाऱ्यांना कोणतेही लाभ मिळत नाहीत, उलट त्यांच्यावर दबाव आणला जातो. कम्युनिस्ट राज्यात बलात्कार हेही एक राजकीय हत्यार म्हणून वापरले जाते. हीच भीषण परिस्थिती त्रिपुरातही होती. कम्युनिस्टांच्या त्रिपुरातील पापांकडे केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसने नेहमीच दुर्लक्ष केले. कारण तिथे काँग्रेस आणि डाव्यांची मैत्री होती. यामुळे त्रिपुरातील जनता हाताश होती. म्हणूनच तेथील जनतेला कम्युनिस्ट सरकार नको होते मात्र विरोधी पक्ष काँग्रेसबद्दलही विश्वास वाटत नव्हता. केंद्रातील भाजपच्या विजयानंतर त्रिपुरात मतपरिवर्तन होण्यास सुरूवात झाली. आसाममधील भाजपच्या विजयाचा मोठा परिणाम त्रिपुरात झाला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाचाही त्रिपुरात सकारात्मक परिणाम झाल्याचे देवधर यांनी नमूद केले.
 
पंतप्रधान मोदी यांनी ईशान्य भारतासाठी केंद्रीय मंत्र्यांकरिता एक नियमावलीच बनवली होती. प्रत्येक केंद्रीय मंत्री दर १५ दिवसांतून एकदा ईशान्य भारताचा दौरा करत ह़ोता. योजना व निधी देत होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात ५२ मंत्र्यांनी त्रिपुरा राज्याचा दौरा केल्याचे देवधर यांनी सांगितले. स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही अनेकवेळा त्रिपुराचा प्रदीर्घ दौरा केला. याउलट इतर पक्षांच्या त्रिपुरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना कधी पाहिलेही नव्हते. या सर्व धोरणाचा फायदा भाजपला झाल्याचे देवधर यावेळी म्हणाले.
 
कम्युनिस्ट प्रभावित राज्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे अत्यंत सूक्ष्म स्तरापर्यंत व्यवस्थापन असते. याला उत्तर म्हणून आम्ही आमचे संघटन वाढवले. बूथ पातळीवर संघटन सक्षम बनवले. आज त्रिपुरा भाजपकडे ३२ हजार युवक, ३० हजार महिला जोडल्या गेल्या असल्याचे ते म्हणाले. याच संघटनात्मक कामामुळे कम्युनिस्टांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या आदिवासींसाठीच्या राखीव २० जागांपैकी १८ जागी भाजप आघाडीने विजय संपादन केला, असे देवधर यांनी नमूद केले. त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष विप्लवकुमार देव यांचेही देवधर यांनी कौतुक केले. देव यांनी प्रचंड मेहनत घेतली, दिवसाचे १८-१८ तास काम केले. राज्यातील युवकांना विप्लव यांच्याबद्दल विश्वास वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले.
 
पत्रकारांच्या हत्यांना माध्यमांनी का प्रसिद्धी दिली नाही?
त्रिपुरामध्ये शांतनू भौमिक व सुदीपदत्त भौमिक या पत्रकारांच्या निर्घृण हत्या झाल्या. सुदीपदत्त कोणत्याही पक्षाचा, विचारधारेचा नव्हता. तो एक प्रामाणिक वार्ताहर होता. शासकीय यंत्रणेतूनच सुदीपदत्तची हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, या हत्यांना माध्यमांनी प्रसिद्धी का दिली नाही, असा सवालही देवधर यांनी उपस्थित केला. विप्लब कुमार देव यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीतच या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही देवधर यांनी स्पष्ट केले.
 
पुतळे पाडण्याच्या बाजूने मी नाही..
मी मुळात पुतळे बांधण्याच्या पक्षातच नाही त्यामुळे पुतळे पाडण्याच्या बाजूने असायचा प्रश्नच येत नसल्याचे देवधर यांनी सांगितले. त्रिपुरात दोन ठिकाणी पुतळे पाडण्याच्या घटना घडल्या. मात्र, त्यावेळी माणिक सरकार हेच काळजीवाहू मुख्यमंत्री होते. विप्लब कुमार देव यांची भाजपच्या नेतेपदीही निवड झाली नव्हती. विप्लव देव यांनी पदग्रहण करताच पहिला फोन या पुतळे पाडण्याच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश देणारा होता, असे त्यांनी सांगितले. याच मुद्द्यावर बोलताना, आम्हाला पुतळ्यांपेक्षा जिवंत माणसांमध्ये अधिक रस असल्याचेही सुनील देवधर यांनी नमूद केले
 
@@AUTHORINFO_V1@@