अंगणवाडीतील इतर भाषिक कर्मचा-यांना मराठीचे ज्ञान अनिवार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

 

 
 
मुंबई : कोणत्याही अंगणवाडीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक इतर भाषिक मुले असल्यास त्या ठिकाणी सदर भाषेचे ज्ञान असलेल्या कर्मचा-यांची नेमणूक करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी नियुक्त करण्यात येणा-या इतर भाषिक कर्मचा-यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.
 
राज्यात उर्दू माध्यमाच्या अंगणवाड्या सुरू करण्यासाठी मांडण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यातील ६२५ अंगणवाड्यांमध्ये हिंदी, उर्दू, माडिया, गोंड, कोकणी, पावरी, कन्नड, तेलगू, भिल्लोरी, बंजारा आदि भाषांचे ज्ञान असलेल्या कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाल्या.
 
कुपोषण रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे अंगणवाड्यांचे प्रमुख काम आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा भाग असला तरी याठिकाणी मुलांच्या पोषण आणि आरोग्याशी निगडीत बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येते. त्यामुळे सध्या उर्दू भाषेच्या कोणत्याही अंगणवाड्या सुरू करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा अधिक इतर भाषिक मुले असतील त्या ठिकाणी संवाद सुलभ होण्यासाठी त्या भाषेचे ज्ञान असलेल्या असलेली अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नेमणूक करण्यात यावी, असा निर्णय १३ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आतापर्यंत नेमणुका करण्यात आल्या असून त्यांना मराठीचे ज्ञानही अनिवार्य करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
 
बालमृत्यू रोखण्यासाठी बाल आरोग्य केंद्र स्थापणार
बालमृत्यू रोखण्यासाठी बाल आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. आदिवासी आणि बिगरआदिवासी जिल्ह्यांमध्ये ही आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसेच या माध्यमातून निरनिराळ्या योजना राबवून बालकांना पोषण आहार देण्यात येत असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.
 
पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांसदर्भात मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुंडे बोलत होत्या. केवळ कुपोषण हे बालमृत्यूचे कारण नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत. बालमृत्यू होणे ही गंभीर बाब असून याबाबत शासन संवेदनशील असल्याचे त्या म्हणाल्या. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी बाल आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार नियमित मानधन देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@