बुणग्यांची पंगत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |
बुणग्यांची पंगत असे वर्णन सोनिया गांधींच्या डिनर डिप्लोमसीचे करावे लागेल. निरनिराळ्या पक्षांचे मालक, सत्तेसाठी हपापलेले असंतुष्ट, तुरुंगांच्या वार्‍या करून आलेले हे लोक जेवढ्या वेळा एकत्र येतील, तेवढाच त्याचा फायदा भाजपला होईल.




    शरद पवार महाराष्ट्रात जे करीत आहेत, तेच आता सोनिया गांधींनी दिल्लीत करायला सुरुवात केली असे म्हणायला वाव आहे. पवार जे काही करीत आहेत ते मुलीसाठी, पुतण्यासाठी की स्वत:साठी? हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. पुण्यात मध्यंतरी जी मुलाखत झाली त्यानंतर ते बाळासाहेबांच्या पुतण्यासाठीदेखील काही करीत आहेत अशीही राजकीय अफवा होती. दिल्लीत मात्र कोणतीही अस्पष्टता नाही. राहुल गांधींना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान केल्यानंतरही सोनिया गांधींनाच हे करावे लागते याचे कारण जगजाहीर आहे. अन्य कुणासाठी नव्हे तर आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सोनियाजी या कामाला लागल्या आहेत. वाजपेयींच्या काळात तिसर्‍या आघाडीची एक टूमनिघायची, जी प्रत्यक्षात कधीच अस्तित्वात आली नाही. मात्र, तिची चर्चा मात्र वारंवार व्हायची. गंमत म्हणजे तिसर्‍या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही चर्चिले जायचे. आता दिवाळखोरीमुळे एनडीएतून बाहेर पडायचे नाटक करणारे चंद्राबाबू नायडूही या यादीत असायचे. सोनियांनी सर्वात जुना पक्ष असल्याचा तोरा सध्या पोटमाळ्यावर टाकून दिला आहे आणि असंतुष्टांना घरी जेवायला बोलावले आहे. २०१४ पासून अनेक अतृप्त आत्मे दिल्लीत घुटमळत आहेत. सत्तेशिवाय ज्यांचा जीव कधीच रमला नाही असे लोक या पंगतीला धावत जाणार हे काही वेगळे सांगायला नको. मात्र, कनिमोळी, राजा यासारखे ताट लागावे म्हणून कुणाच्याही वळचणीला जाऊन उभे राहाणारे लोकही तिथे पोहोचणार आहेत. २०१४ची लोकसभा सुरू झाल्यावर लालूंचा एक किस्सा गाजला होता. लालू यापूर्वी युपीएत होते. केंद्रात पाठिंबा देण्याची पुरेपूर किंमत घटक पक्ष वसूल करतात, तशी लालूंनीही ती केली होती. लालूंच्या पक्षाचे लोकसभेत पानिपत झाल्यानंतर लोकसभेत सोनियांनी त्यांना साधी ओळखही दाखविली नव्हती. यावर लालूंनी त्यांना गावरान भाषेत टोमणा मारला होता ‘‘अभी कामनिकल गया तो पहचानभी नही दिखाती हो,’’ अशी लालूंची वाक्ये होती. कॉंगे्रसचे अजून एक संकटमोचक अमरसिंग सोनियांना नेहमी ‘हिंदुस्तान के राजनीती की महारानी’ असेच संबोधायचे. हे सारे पुन्हा लिहिण्याचे कारण म्हणजे, आज सोनियांनी सर्वात जुन्या पक्षाचा तोरा कितीही बाजूला ठेवला असला तरी त्यांच्या पंगतीला येऊन बसणारे बुणगे हे असेच असणार आहेत. मोदींनी २०१४ ला त्यांना दिलेला दणका इतका जोरदार होता की, यातले काही तर त्यातून अद्याप सावरूच शकलेले नाहीत. आत्मविश्वास गमावलेले हे लोक आता मोदींना पराभूत करण्यासाठी एकत्र येणार आहेत. यात काही मंडळी बैठकीला हजर राहणार नाहीत, पण त्यांचे प्रतिनिधी मात्र नक्कीच पाठवणार आहेत. असे का? या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे. आज भोजनाचे आमंत्रण सोनियांनी दिले असले तरी पुढे जाऊन मात्र त्यांना राहुल गांधींसोबतच कामकरायचे आहे. राहुल गांधी आज या देशातला राष्ट्रीय विनोदाचा विषय होऊन बसले आहे. जबरदस्तीने घोड्यावर बसलेला माणूस जशी रपेट करेल तशी राहुल गांधी करीत असतात आणि देशभरात त्यांची चर्चा होत असते. राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे आपल्याला सत्तेचे ताट मिळेल की नाही, या प्रश्नाचे उत्तर आज तरी या बुणग्यांना ठाऊक नाही. किंबहुना, हे चतुर कोल्हे तिथेही जागा अडविण्यासाठी प्रतिनिधी पाठवत आहेत.


बिगर भाजपवादाची एक नवी संकल्पना रुजविण्याचे अतोनात प्रयत्न माध्यमातले डावे विचारवंत वारंवार करीत आहेत. बिगर कॉंग्रेसवादाचा असा प्रयोगही झाला होता, मात्र तो ज्या पार्श्वभूमीवर झाला आणि जे दिग्गज तो करण्यासाठी सरसावले होते ते सगळेच एकेकाळचे मातब्बर होते. आता जे सोबत आहेत त्यांना पाहिल्यावर हसावे की रडावे तेच कळत नाही. बिगर कॉंग्रेसवाद एका वैचारिक भूमिकेतून निर्माण झाला होता. बिगर भाजपवादाचा जन्मभाजपच्या द्वेषातून झाला आहे. यातले कितीतरी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुरुंगात जाऊन आले आहेत. यातील सगळ्याच पक्षाची मालकी एका कुटुंबाकडे किंवा व्यक्तीकडे आहे. तेलगू देसमच्या चंद्राबाबूंचे झाले ते पाहिल्यानंतर आपापले सवतेसुभे सांभाळून सत्तेचा वाटा मागणार्‍यांसमोर मोठेच प्रश्न निर्माण झाले आहेत. चंद्राबाबूंच्या मागण्या अवास्तव आणि संघराज्यीय घडी बिघडविणार्‍या होत्या. मोदींनी त्यांना जाऊ दिले. अन्य मंडळींनाही यातून जो काय संदेश मिळायचा होता तो मिळाला आहे. मोदींचा अश्वमेध जोरातच आहे. लोकांमध्ये असंतोष असल्याचे सांगत वातावरण ढवळून काढायचे किंवा मोदींच्या विरोधात सर्वांना एकवटण्याचे प्रयत्न अत्यंत तोकडे आणि तुटपुंजे ठरत आहेत. त्यातून काय साध्य होईल ते कोणीही सांगू शकत नाही. पुन्हा जनतेला यांची सत्तेसाठीची तडफड दिसत आहे व त्याचा फायदा भाजपलाच होत आहे. त्यामुळे सोनिया गांधी ज्या बुणग्यांच्या पंगती उठवणार आहेत, त्याचा फायदा भाजपलाच होईल हे वेगळे सांगालयला नको. सोनियांच्या निवासस्थानी निमंत्रणानंतर काही लोक स्वत: पोहोचतील तर काही प्रतिनिधी पाठवतील. भाजपविरोधाचा सूर रोज लावणार्‍या शिवसेनेची याबाबत काय भूमिका असेलस हे पाहणे जरा रंजक ठरेल. सेनेचा प्रतिनिधी भाजपविरोध दाखवायला भोजनाला जाऊ शकतो. मात्र मुख्य शामियान्यात न जेवता वळचणीला बसून जेवण उरकून परतही येऊ शकतो. कारण शेवटी सत्ता महत्त्वाची. इथे काय आणि तिथे काय?

@@AUTHORINFO_V1@@