मनपाच्या मिळकतीवर पैसा कमविणार्‍या संस्थांची पोलखोल होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

९०३ मिळकतधारकांना ’कारणे दाखवा’ नोटीस

 
 
 
 
 
नाशिक : महानगरपालिकेच्या मिळकत सर्वेक्षणाची फाईल आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दणक्यामुळे पुन्हा उघडल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. यातील ९०३ मनपा मिळकतधारकांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून, मनपाच्या मिळकतींचा वापर करून त्यावर पैसा कमविणार्‍या संस्थांची पोलखोल केली जाणार आहे.
 
सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक व सेवाभावी तसेच धर्मादाय संस्थांना मनपाच्या मिळकती अत्यंत अल्प भाडेतत्त्वावर दिल्या जातात परंतु, शहरातील अनेक संस्थांनी सामाजिक हेतूलाच हरताळ फासून मनपाच्या या मिळकतींमधून पैसा कमविण्याचा धंदाच उभा केला आहे. सध्या मनपाच्या मिळकतींमध्ये अभ्यासिका, ग्रंथालय, व्यायामशाळा, विविध प्रशिक्षण, शाळा, विविध प्रकारची कार्यालये थाटण्यात आली आहेत. तसेच, अनेक सभागृहांमध्ये तर लग्न सोहळ्यांपासून अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या संस्था संबंधित कार्यक्रम आयोजकांकडून हजारो रुपयांच्या देणग्या उकळत असतात. त्याबाबत कोणत्याही प्रकारची पावती वा लेखी दिले जात नाही. तसेच, शहरातील मनपाच्या मालकीची क्रीडांगणेदेखील अनेक संस्थांच्या ताब्यात आहेत. या संस्थांकडूनही त्या ठिकाणी आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांच्या बदल्यात हजारो रुपये उकळले जातात. या बदल्यात मनपाला कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही.
 
याउलट संबंधित भाडेकरू संस्थांना अत्यंत अल्प असे शुल्क आकारले जाते. अगदी एक रुपयापासून ते एक हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक शुल्क आकारले जात असल्याने मनपाच्या कोट्यवधींच्या मिळकतीतून मनपाच्या तिजोरीत काहीच महसूल जमा होत नाही. हीच बाब हेरून मनपाच्या या मिळकतींतून चालू बाजारभावाप्रमाणे भाडे आकारल्यास मनपाला चांगला महसूल प्राप्त होऊ शकतो, असे धोरण अवलंबविण्यात येत असून, सध्या मिळकतींवर रेडिरेकनरनुसारच भाडे आकारले जात आहे. तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मनपाच्या मिळकती व गाळ्यांचे तडकाफडकी सर्वेक्षण अनेकांची पोलखोल त्याचवेळी केली होती परंतु, त्यांची बदली झाली आणि ही फाईल लाल फितीत पडली. परंतु, आता तुकाराम मुंढे यांनी पुन्हा गेडाम यांची फाईल हाती घेऊन ९०३ मिळकतधारकांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजावून सात दिवसांच्या आत खुलासा मागितला आहे. मिळकतीचा वापर स्वत:च करतात का?, मनपाबरोबर करारनामा झालेला आहे का?, भाडे थकीत आहे का?मिळकतींचा वापर कशासाठी केला जात आहे? अशा विविध प्रकारची माहिती नोटीसद्वारे विचारण्यात आली आहे.
 
 
जोरदार मोहीम
 
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी घरपट्टी-पाणीपट्टीच्या थकीत करांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडली. दरम्यान, शहरातील विविध भागात व्यापारी संकुल, खोका मार्केटमध्ये सुमारे १९०० गाळे शहरातील बेरोजगारांना लिलाव प्रक्रियेद्वारे भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्यापैकी तब्बल ११०० गाळेधारकांकडे कोट्यवधींची थकबाकी असून त्याचे कारण म्हणजे, रेडीरेकनरनुसार येथील भाडे आकारणी संबंधितांना अमान्य आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी या गाळेधारकांकडून रेडीरेकनर दराने भाडेवसुलीचा निर्णय घेतल्यानंतर मनसेच्या काळात महापौर अशोक मुर्तडक यांनी संबंधित विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक समिती गठित केली होती. मात्र, पुढे त्यात काही होऊ शकले नाही.
@@AUTHORINFO_V1@@