आणि वाट एकटीची सुखावह झाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |

 
 
जग बदललं तसा काळही बदलला. जगण्यासाठी तिने शिक्षणाला सखा बनवले, मात्र तरीही रूढी-परंपरांचा पगडा कायमच राहिला. शिक्षण घेत समाजात व जीवनात होणारे बदल स्त्रियांनी आपसूक आत्मसात केले, पण समाजबदलात रूढींना तिलांजली देणे गरजेचे असते, याकडे मात्र आजही स्त्रीवर्गाचे दुर्लक्ष झाले आहे. महिलांवर होणार्‍या शारीरिक आघातासाठी कायदा सक्षम बनत चालला आहे, पण समाजाच्या खासकरून स्त्रियांकडूनच स्त्रियांवर होणार्‍या मानसिक आघाताबाबत मात्र कुठेच कोणीच बोलत नाहीत. अशा समाजातील एकल महिलांसाठी डोंबिवलीतील भारती मोरे यांची ‘ज्ञानदीप स्त्री जागृती मंच’ ही संस्था काम करीत आहे. अपरिहार्य परिस्थितीमुळे एकट्या राहणार्‍या स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत, याची जाणीव होऊन या संस्थेने सुरू ठेवलेले कार्य एकल स्त्रियांसाठी जगण्याचा आत्मविश्वास मिळवून देणारे आहे.
 
मुंबई दूरदर्शनवरील ’ज्ञानदीप’ कार्यक्रमापासून समाजकार्याची प्रेरणा घेऊन ’आकाशानंद’ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक ’ज्ञानदीप मंडळं’ ८० च्या दशकात कार्यरत होती. त्यापैकी डोंबिवलीत ’अभंग’ आणि ’अद्वैत’ या दोन ज्ञानदीप मंडळांनी एकत्र येऊन ’ज्ञानदीप स्त्री जागृती मंच’ या संस्थेची स्थापना केली. १२ जानेवारी, १९९५ ला याची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्त्री जागृती आणि स्त्रियांचे सक्षमीकरण हे प्रमुख ध्येय समोर ठेवून संस्थेचे स्त्रीविषयक कार्य सुरू झाले. स्त्री शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, स्त्रीविषयक कायदे, अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्त्रियांच्या विविध प्रश्नांबाबत जाणीव जागृती निर्माण करणारे विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आणि हा सिलसिला आजतागायत सुरू आहे. संस्थेची वाटचाल १९९५ ला सुरू झाली. २००० या पाच वर्षांच्या कालावधीत संस्थेने अल्पशिक्षित, कष्टकरी, ग्रामीण महिलांसाठी सावित्री प्रकल्प, शहरातील शिक्षित महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी दृष्टी प्रकल्प, युवतीसाठी दिशा प्रकल्प आदी उपक्रम हाती घेतले २००१ पासून संस्थेने एकल महिलांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. एकल म्हणजे एकट्याने जगणं, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता, प्रौढ अविवाहित महिला अशा स्त्रियांना संघटित करून त्याचे आधारगट सुरू करण्यात आले. या आधारगटांचा आढावा घेता ‘स्वानंद आधारगट’ आणि ‘मैत्रीण आधारगटा’ची निर्मिती करण्यात आली. ‘स्वानंद आधारगट’ या आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या एकल महिलांच्या या गटात मुख्यतः ५० वर्षांपुढील स्त्रिया असून त्यांचे उतारवयातील एकटेपण सुसह्य व्हावे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तळागाळातील कष्टकरी एकल महिलांना कौटुंबिक जबाबदारी एकटीने सांभाळताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. आर्थिक समस्या घराचा प्रश्न, एकेरी पालकत्वाचे आव्हान, अनिष्ट रुढींमुळे होणारा सामाजिक भेदभाव, मानसिक ताणतणाव अशा सर्वच आघाड्यांवर त्यांचा संघर्ष चालू असतो. या महिलांना मैत्रीण आधारगटाच्या रूपाने एक विश्वासाची जागा मिळाली आहे आणि त्यांना स्वाभिमानाने जगणे माहीत होऊ लागले आहे.
 
 
 
 
एकत्र जागून एकजुटीने अनुभवांची देवाणघेवाण करत आपण कोणतेही अवघड काम करू शकतो, हा आत्मविश्वासही महिलांच्या मनात रुजलेला आहे. अल्पशिक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील एकल महिलांना ‘मैत्रीण’ शी जोडून घेण्यासाठी पाथर्ली येथील शांतीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालय आणि एमआयडीसीमधील उदय शिक्षण प्रसारक मंडलाच्या श्री केशव रामभाऊ कोतकर विद्यालय या शाळांच्या सहकार्याने या शाळांमध्ये माता पालकांचे आधारगट संस्थेने सुरू केले आहेत. संस्थेचे कार्याचे स्वरूप पाहता ते इतरांसाठी प्रेरणादायी असे ठरले आहे. शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्याबाबत संस्थेने केलेल्या मार्गदर्शनामुळे विधवा मातांना दरमहा ९०० रुपये मिळू लागले आहेत. संस्थेतर्फे एकल महिला व त्यांच्या मुलींसाठी कार्यशाळा शिबिरांचे आयोजन करण्यात येते. एकल महिलांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या जुन्या अनिष्ट रूढी-परंपरा नष्ट व्हाव्यात, त्यांना सन्मानाने जगता यावे. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना समाविष्ट करून घेतले जावे, यासाठी जनजागृती करणे तसेच त्या महिलांचे प्रश्न व मागण्या शासनासमोर मांडणार्‍या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मंचाला संपूर्ण सहकार्य देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील एकल महिलांच्या मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, स्वतःच्या पायावर उभे राहून उर्वरित आयुष्यात त्यांना स्वाभिमानाने जगता यावे, या हेतूने ‘ज्ञानदा स्त्री शिक्षण प्रकल्प’ २००२ सालापासून हाती घेण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून फक्त माता-पालक कुटुंबातील इयत्ता ८ वी ते १२ मधील मुलींची निवड शाळेच्या मुख्याध्यापकाच्या सहकार्याने केली जाते. योग्य विद्यार्थीनींना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य करण्यात येते. ‘ज्ञानदा प्रकल्पाने’ आतापर्यंत अनेक गरजू व अभ्यासू मुलींना मदतीचा हात दिला आहे. समाजातील दानशूर व्यक्ती देत असलेल्या देणगीतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
 
महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी संस्थेच्या वतीने लोकसंगीताच्या माध्यमातून पारंपरिक चळवळीतील गाणी कलापथकाच्या कार्यक्रमात सादर केली जातात. ही गाणी स्वतः अध्यक्षा भारती मोरे आणि त्यांच्या सहकारी गाऊन महिलांमध्ये प्रबोधनाचे काम करतात. गरीब वस्तीतील मुलींसाठी ’घेऊ उंच भरारी’ व ’वयात येताना..’ अशा कार्यशाळेचे आयोजन केले जाते. तसेच समजात कष्ट करून मुलांचे पोषण करणार्‍या एकट्या आईच्या कष्टाची जाणीव मुलांना होण्यासाठी त्या मायलेकींचा मेळावा तसेच ’माझी आई’ या विषयावर निबंधस्पर्धेचेही आयोजन केले जाते. दरम्यान समाजात एकट्याने स्वतःच्या घराची जबाबदारी स्वीकारत स्वकर्तृत्वावर चालणार्‍या स्त्रिया अनेकदा लैंगिक शोषणाला बळी पडतात. अशा महिलांसाठीही ’ज्ञानदीप स्त्री जागृती मंचा’च्या वतीने काम केले जाते. तसेच बुवाबाजीला बळी पडणार्‍या महिलांसाठीही ही संस्था काम करते.
 
‘‘बदलत्या काळानुसार स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी तसेच त्यांच्या भविष्यासाठी शासनाकडून निरनिराळ्या योजना तसेच कायदे लागू करण्यात आले आहेत, हे कायदे या महिलांना समजावून सांगण्यासाठी सर्वत्र अशा संस्थांनी पुढे येऊन काम करायला हवे,’’ असे मोरे सांगतात. एखाद्या योजनेसाठी या अशिक्षित महिलांना कार्यालयाच्या वारंवार फेर्‍या माराव्या लागतात. शिक्षणाच्या कमतरतेमुळे या कागदपत्रांचे ज्ञान नसल्याने या महिलांना त्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे अशा योजनांबाबत महिलांसाठी काम करणार्‍या संस्थांची मदत शासनाने घ्यावी, अशी इच्छाही मोरे यांनी व्यक्त केली.
अपघातात पतीचा मृत्यू झाला आणि नयनावर अचानक दोन मुलांची जबाबदारी आली. तिला धीर देण्याऐवजी तिने मंगळसूत्र घालावे की नाही यावर चर्चा, सल्ला तिला दिले गेले. व्यसनी नवर्‍याच्या जाचाला कंटाळून माहेरी आलेल्या सुजाताला (ती स्वत: मिळवती असूनसुद्धा) भाऊ-वहिनीला तिची वाटणारी अडचण, त्यामुळे खावी लागणारी बोलणी ऐकावी लागली. अपंग मुलाला जन्म दिला, हा पत्नीचाच दोष आहे, असे सांगून हंसाबेनचा नवरा तिला परित्यक्तेचे जिणे जगायला एकटीला सोडून निघून गेला. जाधवबाईंना आपल्या मुलीला वाढवताना नवर्‍याने टाकलेली (हा शब्द किती अपमानास्पद आहे) ही टोचणी आजूबाजूचे सतत देत होते आणि आतासुद्धा डॉक्टर झालेल्या त्यांच्या मुलीला ’परित्यक्तेची मुलगी’ म्हणून नकार येत आहेत. ही सगळी प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. आधुनिकतेचा पोशाख घातलेल्या आपल्या समाजातील काही मंडळी अजूनही स्त्रियांचे चौकटीतले जगणे, तिचे दुय्यम स्थान या विचारांच्या पुढे जातच नाही. पण जागृती मंचाच्या मैत्रीण गटातील सर्व जणी आता एकमेकींच्या आधाराने खूप आत्मविश्वासाने वावरत आहेत.
 
या सर्व मैत्रिणींची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे त्यांनी एकट्याने मुलांना वाढवणे! त्यातसुद्धा तळागाळातल्या स्त्रियांना, मुलींना शिकवताना खूप अडचणी येतात, पण प्रतिकूल परिस्थितीशी सामना देत शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या मुलींसाठी ’ज्ञानदीप स्त्री जागृती मंचा’चा ’ज्ञानदा स्त्री शिक्षण प्रकल्प’ कार्यरत आहे. सध्याच्या संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा दिढे यांनी या प्रकल्पाची छान ओळख करून दिली.
 
 

 
गेल्या सात-आठ वर्षांत ज्ञानदाने पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले आहे. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या सहकार्याने दरवर्षी दहा मुलींची यासाठी निवड केली जाते. शक्यतो तळागाळातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आणि ज्यांची आई एकटीने कुटुंब चालवत आहे, अशा मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी आमचा प्रयत्न असतो. आठवी ते दहावीमधल्या गरजू, हुशार मुलींना प्रत्येकी रु.५००/- शालेय साहित्यासाठी देण्यात येतात. आम्ही सर्व जणी शाळेत जाऊन या मुलींच्या प्रगतीकडे लक्ष ठेवतच असतो. अर्थात ज्ञानदा हा उपक्रम केवळ देणगीदारांच्या सहकार्यामुळे चालतो. डोंबिवली शहरात एकल महिलांसाठी काम करणारी तसेच स्त्रियांसाठी काम करणार्‍या ’कौटुंबिक सल्ला केंद्र’ तसेच ’स्त्री मुक्ती संघटना’ तयार होण्याची गरज पण शहरात तयार होणार्‍या संस्था आर्थिक मदतीअभावी किंवा जागेअभावी बंद पडत असल्याने अशा संस्थांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मदत करावी, असेही मोरे यांचे मत आहे. काही वर्षांपूर्वी डोंबिवली शहरात कौटुंबिक सल्ला केंद्र सुरू करण्यात आले होते, पण या सल्ला केंद्राचे काम जागेअभावी बंद करण्यात आले तसेच महिलांना एखाद्या प्रसंगी राहण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महिला वसतिगृहही या शहरात असावे, असे त्यांचे मत आहे.
 
या संस्थेची आर्थिक जडणघडण ही देणग्यांमधून केली जाते. या संस्थेत काम करणार्‍या काही ज्येष्ठ महिलांच्या वतीने येणार्‍या देणग्यांतून एकल महिलांच्या मुलींची शाळेची फी भरण्याचे कामही संस्था करते. या संस्थेच्या संस्थापक म्हणून भारती मोरे व कालिंदी तुळपुळे कार्य पाहतात तर उपाध्यक्ष संपदा वाड, कार्यवाह कालिंदी किचबरे सहकार्यवाह सुहासिनी काळवीट, कोषाध्यक्ष अलका आपटे, सहकोषाध्यक्ष मंजुषा मन्द्रे, सदस्य विनया शेलार, वैजयंती मुंगी, गीतांजली गंधे, मेधा गोखले या कार्य पाहात आहे.
 
एकल महिलांना समाजात वावरताना काही रूढी, बंधनेही समाजाने घालून दिली आहेत व त्याचे पालन करावे लागते. विधवा महिलांना सणाच्या वेळेस हळदीकुंकू लावण्याचा हक्क नसतो तसेच त्यांना संक्रांतीचे वाण लुटायचाही हक्क नसतो. यासाठी ’ज्ञानदीप स्त्री जागृती मंचा’च्या वतीने दरवर्षी एकल महिलांसाठी तिळगुळ समारंभ केला जातो. या संस्थेच्या अध्यक्षा भारती मोरे या स्वतः ही तरुणींना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. स्वतःच्या खाजगी आयुष्यात अर्धवट राहिलेले शिक्षण त्यांनी नोकरी सोडून पूर्ण केले. १९८२ साली त्या मुंबई दूरदर्शनवरील ज्ञानदीप कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याची सुरुवात त्यांनी केली. यानंतर ‘अभंग ज्ञानदीप मंडळ’, ‘अश्विनी ज्ञानदीप संघ’, ‘ज्ञानदीप स्त्री जागृत मंचा’चे संस्थापक व अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. तसेच ’ज्योत एक सेवेची’ या ज्ञानदीपच्या मासिक मुखपत्राचे व दूरदर्शनच्या ’ज्ञानदीप’ मासिकाचे संपादनही त्या गेली तीन वर्षे करीत आहेत. याव्यतिरिक्त भारती मोरे यांनी लिहिलेली ’तुझी माझी जोडी’ व स्त्री जीवनाचे वास्तव मांडणारी ’माहेरचा आहेर’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ’अभिनेता विवेक’ या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले आहे. याचबरोबर महिलांसाठी मोरे यांचे चालू असणारे अविरत काम पाहता सौदामिनी पुरस्कार, पुष्पलता बेन पुरस्कार, सखी सन्मान, मातोश्री सरलाबाई म्हात्रे मातृगौरव पुरस्कार, फेसकॉम्च्या वतीने ही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या ठाणे जिल्हा केंद्राकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. मोरे महिलांना कायम समजाविण्याचा प्रयत्न करतात की, ’’तुमच्या हातात स्मार्टफोन आला पण बायांनो तुम्ही स्मार्ट कधी होणार? टेक्नॉलॉजी बदलत चालली पण रुढींची बंधनं काही तुमची सुटेना. शिक्षण घेतले तरी समाजात तुमच्यासाठी बदल होणे गरजेचे, हे तुम्हीच मानेना,’’ असं काहीसं त्यांचं सर्व स्त्रियांना सांगणं असतं. यानंतर संस्थेच्या वतीने पुढील काळात महिलांमध्ये जनजागृती करण्यापेक्षा तरुण किंवा शाळेत शिक्षण घेणार्‍या मुलींमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
 
 
 
 
‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’
विविध पुरस्कारांचा वितरण समारंभ संपन्न
 
‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ संस्कृती, नीती शिक्षणासंदर्भात वर्षभर विविध उपक्रम राबवत असते. त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजनही केले जाते. सातत्याने सुरू असलेल्या स्पर्धांतून अनेक गुणवंत विद्यार्थी आणि नागरिक आपल्या सुप्त कलागुणांना वाव देतात. ’संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या नैतिक शिक्षण उपक्रमाअंतर्गत विशेष प्राविण्य मिळविलेले गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळांचा सत्कार समारंभ घाटकोपर पूर्वेच्या झवेरीबेन पोपटलाल सभागृहात नुकताच संपन्न झाला. सुप्रसिद्ध उद्योजक सुरेश भारवानी यांच्या हस्ते मुलुंडच्या विद्या प्रबोधिनी इंग्रजी शाळेला आदर्श शाळा चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. शिक्षणमहर्षी बाळासाहेब हांडे यांच्या हस्ते सुभदा गोरे, भालेंदुभूषण मिश्रा, प्रियांका शिंदे, सुरेखा साळुखे, तृप्ती दवे, सुनेत्रा सावंत या शिक्षकांना आदर्श शिक्षक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पूर्व उपनगरातील १५९ शाळांमधून भांडूपच्या सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पद्मा जोशी यांनी नैतिक शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि शुद्ध चांदीचे पदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय १४० विद्यार्थ्यांचे बाल श्रीराम आणि बाल सीतामाता पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या योगिता साळवी यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक नागोराव तायडे, प्रतिष्ठानचे विश्‍वस्त मोहन सालेकर, अजित सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
अशाच प्रकारचा पुरस्कार वितरण सोहळा मालाडच्या एन. एल. सभागृहात नुकताच संपन्न झाला. सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. श्याम अग्रवाल, कॅप्टन विनायक कानडे, रा. स्व. संघाचे विलास भागवत, डॉ. गौरी माहुलीकर, सुहास जोशी, रितीका आर्य, ऍड. विजय वैद्य, तुळशीदास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. श्याम अग्रवाल याच्या हस्ते आर.सी. पटेल शाळा समूहाला आदर्श शाळा चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर विद्याभूषण शाळेचे प्राचार्य संजय पाटील यांना आदर्श मुख्याध्यापक मानपत्र आणि चांदीचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कॅप्टन विनायक कानडे यांच्या हस्ते गीता केतकर, सचिन दिवकर, चित्रा हडकर, कविता वाघ, संगीता होळकर, चारुदत्त देशपांडे, अरुण इंगळे आणि श्रद्धा मुसळे या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात कल्पांगण सांस्कृतिक केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या श्रीकृष्णलीला या नृत्यनाटिकेने सर्व रसिकांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन सालेकर यांनी केले तर प्रकाश वाड यांनी कार्यक्रमाचे नेटके संचालन केले.
 
सान्वी सोशल वेल्फेअर आणि सेवा सहयोग फाऊंडेशनचा आगळावेगळा महिला दिन साजरा
 
सान्वी सोशल वेल्फेअर आणि सेवा सहयोग फाऊंडेशनच्या मदतीने ’जागतिक महिला दिना’निमित्त आगळावेगळा महिला दिन साजरा करण्यात आला. पालघर तालुक्यातील बोईसर पूर्व येथील जीवनविकास संचालित आश्रमशाहा खुताड या शाळेतील २२५ वनवासी विद्यार्थिनीसमवेत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महिला दिन साजरा केला. या कार्यक्रमामध्ये होमिओपॅथी फिजिशयन डॉ. प्राची काशीकर यांनी विद्यार्थिनींसोबत मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटरी पॅडसचा वापर आणि त्याची विल्हेवाट यावर संवाद मार्गदर्शन केले. यानंतर मुलींना सॅनिटरी पॅडस तसेच हेल्थ किट प्रदान करण्यात आल्या. या हेल्थ किटमध्ये लहानमोठ्या फण्या, नेलकटर, टूथपेस्ट, टूथब्रश, शॅम्पू सॅशे, हातरूमाल तसेच नॅपकिन्स इत्यादी वस्तूंचा समावेश होता. यावेळी सत्येंद्र काटे यांनी शाळेसाठी लॅपटॉप भेट दिला. या कार्यक्रमाला सान्वी सोशल वेल्फेअर संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्षा इशा नायक, नवनीत कक्कर, सत्येंद्र काटे आणि सेवा सहयोग फाऊंडेशन संस्थेतून मंजिरी परांजपे, भावेश मोरे, विशाल हारके आणि अक्षय वणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
पथनाट्यस्पर्धेत वैभव विद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक
 
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विक्रोळी पश्‍चिमेकडील सिप्ला कंपनीने आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेत वैभव विद्यालय, विक्रेाळी या मान्यताप्राप्त व अनुदानित शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी सादर केलेल्या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन शाळेतील शिक्षिका वर्षा हांडे-यादव यांनी केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे संस्थापक आणि पुर्वउपनगरातील सुपरिचीत समाजसेवक बाळासाहेब हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्याचा सराव केला होता. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव मिळतील असे अनेक उपक्रम राबवले जातात. शाळेच्या यशाबद्दल परिसरात शाळेचे कौतुक होत आहे.
 
पुणे सामाजिक समरसता मंचातर्फे सावित्रीमाई फुले यांना आदरांजली
 
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सारसबागेसमोरील सावित्रीमाईंच्या पुतळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र समरसता गतिविधीप्रमुख मकरंद ढवळे आणि सामाजिक समरसता मंचाचे पुणे महानगर अध्यक्ष नंदकिशोर राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महानगरातील मंचाचे कार्यकर्ते आणि संघस्वयंसेवकांची लक्षणीय उपस्थिती होती.
 
 
 
- रोशनी खोत  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@