चाळीसगावात शिवसेना शहरप्रमुखासह तिघांवर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |
 
 
चाळीसगाव :
पूर्ववैमनस्यातून शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक नानाभाऊ कुमावत यांच्यासह तिघांवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सोमवारी दुपारी धुळे रस्त्यावरील महाविद्यालयासमोर घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, घाट रोड परिसरात तणावाचे वातावरण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे.
 
 
नानाभाऊ वामनराव कुमावत, युवराज कौतिक कुमावत, नीलेश गायके हे धुळे रस्त्यावर वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी गेलेले होते. कार्यक्रम आटोपून ते घराकडे परतत असताना धुळे रस्त्यावरील महाविद्यालयासमोर चार ते पाच जणांनी त्यांचे वाहन अडवून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारे व लाकडी दांड्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात नीलेश गायके यांच्या पोटाला तर युवराज कुमावत यांच्या डोक्याला जबर मार लागला. नानाभाऊ कुमावत यांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नानाभाऊ हल्ला चुकवत असताना त्यांच्या हातावर तीक्ष्ण हत्याराचा वार झाल्याने त्यांच्या हाताचे बोट कापले गेले. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर तिघांना जखमी अवस्थेत चाळीसगाव येथील देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिवसैनिक व नागरिकांनी दवाखान्याकडे धाव घेतली. दरम्यान, नानाभाऊ यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे.
 

हल्ला पूर्ववैमनस्यातून? - मागील १५ ते २० दिवसांपूर्वी घाटरोड परिसरात दोन गटात वाद झाला होता. त्या वादातूनच हा प्रकार घडल्याचा संशय आहे. पोलिसांनी तात्काळ घाटरोड परिसरात बंदोबस्त तैनात केला. हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली.

 
 
@@AUTHORINFO_V1@@