मेहरूण तलावात सोडलेल्या सांडपाण्याचा प्रश्‍न मनपा सोडविणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |

गणेश घाटाखालून होणार भूमिगत गटार


 
जळगाव :
शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात येणारे सांडपाणी येत्या काही महिन्यांत बंद होणार असून, त्यासाठी गणेश घाटाच्या खालून भूमिगत बंदिस्त गटार बांधली जाणार आहे. याद्वारे हे पाणी तलावाच्या सांडव्यापर्यंत नेऊन नाल्यात सोडले जाईल, अशी माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.
 
 
मेहरूण तलाव पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी माजी महापौर नितीन लढ्ढा, विद्यमान महापौर ललित कोल्हे यांनी बरेच प्रयत्न केले आहेत. या कामासाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये मंजूर झाले असले तरी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तलावाचे अस्तित्त्व टिकून राहील का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
 
 
जळगावमधील पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ रविवारी सकाळी मेहरूण तलाव परिसरात पक्षीनिरीक्षण करीत असताना या भागातील सांडपाणी पाईपद्वारे थेट तलावात सोडले जात असल्याचे त्यांना दिसून आले. सांडपाण्यामुळे जलसृष्टी धोक्यात येऊन जलान्न प्रदूषित होते. दूषित पाण्यामुळे मध्यंतरी तलावातील अनेक मासे मेल्याचे आढळून आले होते. तलावापासून २०० मीटर अंतरात कुठेही शोषखड्डे नसावेत, असा नियम आहे. पर्यटनाच्या नावाखाली तलाव खोदण्यात आला. रस्ता रुंदीकारण करण्यासाठी भराव टाकून त्याचे क्षेत्र कमी करण्यात आले असल्याबद्दलही गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत ‘तरुण भारत’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची महापालिकेने दखल घेतली आहे. गणेशघाटाच्या खालून बंदिस्त भूमिगत गटार बांधून याद्वारे हे सांडपाणी तलावाच्या सांडव्यापर्यंत नेऊन गटारीत सोडले जाणार आहे. त्याची निविदाप्रक्रिया लवकरच राबवली जाईल, अशी माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.
 

जळगावच्या वैभव संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच!
पर्यावरणप्रेमींचे आवाहन, चळवळ उभारण्याची व्यक्त केली गरज

जळगाव :
शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाच्या संवर्धनाची जबाबदारी कुणा एकट्याची नसून, त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. यात प्रशासन कुठे चुकत असेल तर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी, त्यांना समस्यांवर उत्तरे सुचविण्यासाठी संघटित झाले पाहिजे, असा सूर पर्यावरप्रेमींनी व्यक्त केला आहे.
सांडपाणी सांडव्याकडे नेले पाहिजे : 
पर्यावरण अभ्यासक राजेंद्र नन्नवरे
दूषित पाण्यामुळे तलावाच्या पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते. त्याचा दुष्परिणाम पक्ष्यांवर होतो. तसेच जैवविविधताही धोक्यात येते. जळगावचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. एक वर्षांपूर्वी तलावात येणार्‍या सांडपाण्याचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. महापालिकेने हे पाणी तलावाच्या सांडव्याकडे नेऊन नाल्यात सोडले पाहिजे. जेणेकरून ही समस्या सुटू शकेल. त्यासाठी महापालिकेवर नागरिकांचा, पर्यावरण अभ्यासकांचा दबाव हवा.
 
 
संघटना पदाधिकार्‍यांची भेट घेतील : वासुदेव वाढे
प्रदूषणाचे प्रमुख कारण तलावात सोडले जाणारे सांडपाणी आहे. या विषयावरून यापूर्वी आंदोलन झाले आहे. हे पाणी प्रक्रिया करून तलावात किंवा थेट सांडव्याकडे सोडायला हवे, अशी आमची सूचना आहे. पण अद्याप त्याची दखल घेतल्याचे दिसत नाही. सांडपाण्यामुळे दूषित पाणी जास्त आणि पावसाचे पाणी कमी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तलाव परिसरात येणार्‍या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. तलावाच्या सुशोभिकरणासाठी शासनाने निधी दिला आहे. सांडपाण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी या निधीचा वापर करावा, यासाठी पर्यावरणप्रेमी संघटना लवकरच पदाधिकार्‍यांची भेट घेतील.
 
रहिवाशांनी कर्तव्य ओळखावे : संजय तांबे
मेहरूण तलाव परिसरातील रहिवाशांनी आपले कर्तव्य ओळखून तलावात सांडपाणी सोडू नये. हा विषय यापूर्वी अनेकदा उपस्थित झाला आहे. सुशोभिकरणाच्या निधीतून या समस्येवर उपाययोजना करता येईल. तलाव परिसरात बांधकाम करण्यावर महापालिकेने निर्बंध घालायला हवेत.
 
जळगावकरांनी चळवळ उभी करावी : प्रा. शेखर सोनाळकर
घरातील वापरातील पाण्यात साबण, रसायने यांचे घातक मिश्रण असते. ते तलावातील जीव, मासे तसेच या भागात येणार्‍या पक्ष्यांसाठी हितकारक नसते. मेहरूण तलाव जळगावचे वैभव आहे. तो पाण्याने, पाण्यातील जीव-जंतू, पक्षी यांनी समृध्द व्हायला हवा. तलाव जपणे मनपा व नागरिकांची जबाबदारी आहे. पण आपणच आपला तलाव अहितकारक करू तर आपल्याइतके आपणच करंटे आहोत. तलाव वाचविण्यासाठी नागरिकांनी चळवळ उभी केली पाहिजे.
 
@@AUTHORINFO_V1@@