मागण्या रास्तच आहेत, पण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |
 

 
 
आज जे कोणी मागण्या मांडायला मोर्चातून पुढे आले होते, त्यांच्या मागण्यांसाठी सहानुभूती असलीच पाहिजे. स्वातंत्र्यानंतरही अशा क्षुल्लक मागण्यांसाठी मोर्चे काढावे लागत असतील तर ती सगळ्यांसाठीच शरमेची बाब आहे. मात्र, त्या मोर्चाच्या निमित्ताने भाजपविरोधी कंडू शमविण्याचा उद्देश लांच्छनास्पद मानावा लागेल.
 
शेतकर्‍यांचा बहुचर्चित मोर्चा मुंबईत येऊन पोहोचला खरा, पण ‘शेतकर्‍यांचा मोर्चा’ म्हणून गेले चार दिवस माध्यमांकडून रंगविला गेलेला मोर्चा खरोखरच शेतकर्‍यांचा होता का? हा प्रश्न नंतर रिकाम्या झालेल्या आझाद मैदानावर रेंगाळतो आहे. सुमारे १५ हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. माध्यमातल्या तमाम डाव्यांनी माध्यमाबाहेरच्या डाव्यांसाठी पुरेशी अशी तजवीज या मोर्चाच्या निमित्ताने करून ठेवली होती. मोर्चाच्या ठिकाणी अनेकांच्या हातात ‘गदर पार्टी’ची मुखपत्रे झळकत होती. ‘बाबरी मशिदीच्या विध्वंसाची २५ वर्षे’ अशा आशयाची मजकूर असलेली मुखपत्रे इथे का वाटली गेली? याचे उत्तर कुणीही दिले नाही. माध्यमातल्या डाव्यांना तर या प्रश्नाची उत्तरे विचारण्यात कोणताही रस नव्हता. शेतकरी म्हणून या ठिकाणी भूमिहीन वनवासी आणले गेले. आपला लाल झेंडा अधिक लाल करण्यासाठी या मंडळींचा पुरेपूर वापर डाव्यांनी केला. शेतकरी म्हणून या ठिकाणी पोहोचलेल्यांपैकी अनेकांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले नाही, यातील कुणीही व्यावसायिक शेतकरी नसल्याने हमीभावाशी त्यांचा काही संबंध नाही. जंगलांच्या आसपास राहणार्‍या अनेकांनी वनजमिनी कसायला सुरुवात केली. वनहक्क कायद्याच्या आधारावर ही मंडळी आता या वनजमिनी मागायला लागली आहेत. त्यांना या जमिनीचे सातबारा त्यांच्या नावावर करून हवे आहे. अनेक ठिकाणी जंगलतोड करून या जमिनी तयार करण्यात आल्या आहेत. वनविभाग आणि असे वनवासी यांच्यात वारंवार संघर्षाचे प्रसंग येत असतात. या जागांबाबतचे गुंतेही कमी नाहीत. अनेक व्यक्तींनी एकाच जागेवर ताबा सांगणे, जातप्रमाणपत्रे नसणे असेच अनेक गुंते यात आहेत. आता या वनवासींना तेच आमिष दाखवून या मोर्चात ओढले गेले. शेती करण्यापेक्षा या जमिनी मागण्याकडेच या मंडळींचा कल आहे. शेती, शेतकरी, आजच्या कृषी व्यवस्थेसमोरचे प्रश्न या सगळ्याचा या मोर्चाशी काहीही संबंध नाही. नाशिकवरून निघताना ज्या मागण्या मोर्चाचे पुढारी मांडत होते, त्या शहापूरकडून पुढे आल्यावर बदलल्या. याचे मुख्य कारण म्हणजे शेतकर्‍यांचा म्हणून सुरू झालेला हा मोर्चा नंतर मोदीद्वेष्ट्यांनी पूर्णपणे ताब्यात घेतला. जमिनीचे दाखले, वनवासी अन्यायाची प्रकरणे यात पूर्णपणे डावा रंग मिसळून सादर केली गेली. दुधाचे भाव, नद्याजोडणी प्रकल्पांसाठी लागणारी गतिमानता, रेशनकार्डाचे प्रश्न या आणि अशा कितीतरी गोष्टी मोर्चात आल्या.
 
मोर्चा मुंबईला पोहोचेपर्यंत हा मोर्चा इतक्या लोकांनी उचलला की, डाव्यांचा रंग पूर्णपणे विरघळून गेला. मोर्चा ठाण्याला येईपर्यंत त्यात जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मिरविण्याची आपली सारी हौस मिरवून घेतली. शरद पवारांनी भाजप सरकार असंवेदनशील असल्याचाही दावा केला आहे. हे कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या. ज्या नाशिक जिल्ह्यातून हा मोर्चा सुरू झाला, तिथे राष्ट्रवादी आणि मनसेचेच लोकप्रतिनिधी होते आणि संवेदनशीलतेचे धडे आता सरकारला शिकविले जात आहे. सगळ्याचा मेरूमणी म्हणजे राज ठाकरे काल थकूनभागून जो मोर्चा आझाद मैदानावर पोहोचला त्याला विश्रांतीची गरज होती. मात्र, त्या ठिकाणी त्यांना राज ठाकरेंचे भाषण ऐकायला मिळाले. ‘‘या सरकारवर विश्वास ठेवू नका, माझ्या हातात सत्ता द्या.’’ थकल्या-भागल्या वनवासींना हे भाषण ऐकायला लागले. सगळ्यात कळस म्हणजे सर्वात शेवटी या मोर्चात झालेले सीताराम येचुरी यांचे भाषण. आता हा मोर्चा राजकीय नव्हता, असा प्रचार चालू आहे. मुळात मोर्चात केल्या गेलेल्या मागण्या कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत मान्यच केल्या पाहिजे. या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारीही घेतली आहे. सरकारवर विश्वास ठेऊनच पुढे जाता येईल.
 
टीआरपीसाठी हपापलेल्या मीडियाने यात कमाल केली. आपण काल केलेली बातमी आज पुन्हा तपासून पाहावी, असे कुणालाही वाटले नाही. एक रिपोर्टर पाय सोलून निघालेल्या मोर्चेकरी महिलेच्या पायांना धरून वार्तांकन करीत होती. सगळ्यांनी आपापली धुणी या मोर्चाच्या निमित्ताने धुऊन घेतली. लोकशाहीत मोर्चे, सभा, मागण्या मांडणे याला महत्त्व नक्कीच आहे. कम्युनिस्ट चळवळीतून ते मांडणेही गैर मानण्याचे कारण नाही. मात्र कम्युनिस्टांचा सारा इतिहास अत्यंत अपयशाने भरलेला आहे. ज्या ज्या समाजगटांचे नेतृत्व कम्युनिस्टांनी केले, त्या त्या मंडळींना कधीही काहीही मिळू शकले नाही. मुंबईतला गिरणी कामगार कम्युनिस्टांमुळे हद्दपार झाला. डाव्यांचे मुंबईत घडणारे संप एकेकाळी माध्यमांच्या दृष्टीने असेच मोठे ‘इव्हेंट’ होते. कामगारांना निरनिराळ्या स्वप्नांची भुरळ घालून डाव्यांनी संप घडवून आणले आणि अखेर यात काय घडले? गिरण्या बंद झाल्या. कामगारांच्या नोकर्‍या गेल्या. त्यांची मुले गुंडांच्या टोळ्यांमध्ये सामील झाली. लालबाग-परळसारख्या सिनेमा आणि कादंबर्‍या अशाच मजकुराने रंगल्या आहेत. काल वाढीव पगारासाठी झिजलेले कामगार, नंतर नोकरीसाठी खस्ता खात होते. आज त्यांच्यावर मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठीच्या घरांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. कामगार आणि शेतकर्‍यांच्या नावाने दावे करणार्‍या डाव्यांना याचे खापर भांडवलदारांच्या माथी मारायला खूप आवडते. आज जे कोणी मागण्या मांडायला मोर्चातून पुढे आले होते. त्यांच्या मागण्यांसाठी सहानुभूती असलीच पाहिजे. स्वातंत्र्यानंतरही अशा क्षुल्लक मागण्यांसाठी मोर्चे काढावे लागत असतील तर ती सगळ्यांसाठीच शरमेची बाब आहे. मात्र, त्या मोर्चाच्या निमित्ताने भाजपविरोधी कंडू शमविण्याचा उद्देश लांच्छनास्पद मानावा लागेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@