मोर्चा नक्की कोणाचा? शेतकर्‍यांचा? वनवासींचा? दुग्ध उत्पादकांचा की आणखी कोणाचा...?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |



 

 
किसान मोर्चातून पुन्हा माओवादाकडे?

शेतकर्‍यांच्या नावाखाली डाव्यांचे मुखवटे

कम्युनिस्ट गदर पार्टी ऑफ इंडियाने वाटली मुखपत्रे

या ठिकाणी नेमके का आलो याचीही अनेकांना माहिती नाही

मुंबई : सुमारे २०० किलोमीटरची पायपीट करून हजारो शेतकर्‍यांचा ताफा सोमवारी सकाळी मुंबईतल्या आझाद मैदानावर दाखल झाला. शेतकर्‍यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांच्या हाती असलेल्या लाल फिती आणि कम्युनिस्टांचे झेंडे यातून पुन्हा शहरी माओवाद डोकावतोय की काय अशी शंका या निमित्ताने उपस्थित झाली. अनेक लाल बावटेधारी शेतकर्‍यांना आपण या ठिकाणी का आलो आहोत, याचीच माहिती नव्हती. त्यामुळे हा मोर्चा नक्की कोणाचा होता याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, वनाधिकार कायद्याचीही अंमलबजावणी करावी, बोंडअळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एकरी ४० हजार रुपये भरपाई द्यावी, वीज बील माफी मिळावी, ऊसाला हमीभाव बंधनकारक करावा, पश्चिमेत नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना देण्यात यावे, नद्याजोड प्रकल्पांचा प्रश्न सोडवावा, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना आदी मागण्यांसाठी शेतकर्‍यांचा हा मोर्चा विधानभवनावर धडक देण्यासाठी आला होता. मात्र याचवेळी सिताराम येचुरींसारखा डाव्या विचारसरणीचा नेता असो किंवा कम्युनिस्ट गदर पार्टीकडून वाटण्यात आलेल्या मुखपत्रांच्या प्रतींमध्ये बाबरी मशिदीसारख्या आक्षेपार्ह मजकुरांचा या मोर्चात कोणता संबंध होता हादेखील यक्ष प्रश्न आहे. शेतकर्‍यांच्या या मोर्चाचे नेतृत्व केले ते म्हणजे जीवा गावित, अशोक ढवळे आणि अजित नवले या त्रिकुटाने. गावित हे नाशिकमधून निवडून आलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार असून विधानसभेत डाव्या पक्षांचे प्रतिनिधीत्व करणारे ते एकमेव नाव आहे. तसेच या मोर्चामध्ये वनवासी बांधवांना संघटित करण्यामागे त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. हा शेतकर्‍यांच्या रास्त मागण्यांसाठी काढण्यात आलेला मोर्चा असला तरी जसजसा हा मोर्चा पुढे सरसावत होता तसतसा याला राजकीय रंग चढताना दिसत होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे किंवा आम आदमी अशा सर्व पक्षांनी एकत्र येत या मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला तर केरळच्या मुख्यमंत्र्यांनीही या मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, शेतकर्‍यांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. सरकारशी चर्चा केली जाईल, मात्र, मागण्यांबाबत तडजोड केली जाणार नाही, शेतकर्‍यांची ही आरपारची लढाई आहे, असे डॉ. नवले यांनी यावेळी स्पष्ट केले.

 
 

मुंबईचा डबेवालाही सरसावला

आपल्या अनेक अपेक्षा आणि मागण्यांचे गाठोडे घेऊन मुंबईत आलेल्या हजारो शेतकर्‍यांसाठी मुंबईचा डबेवाला पुढे सरसावला होता. डबेवाल्यांकडूनही मोर्चेकर्‍यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच दादर ते कुलाबा या परिसरामधून देणगी स्वरूपात खाण्याचे पदार्थ एकत्र करून ते शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे काम देखील डबेवाल्यांकडून करण्यात आले होते. तसेच मुंबईत दाखल झालेल्या मोर्चेकर्‍यांसाठी अनेक ठिकाणी अल्पोपहारगृहे सुरू करण्यात आली होती. तसेच अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले होते.

मुस्लीम, शीख संघटनांची साथ

शेतकर्‍यांच्या या मोर्चाला मुस्लीम आणि शीख संघटनांची देखील साथ मिळाली. उन्हातान्हात उभ्या असलेल्या या शेतकर्‍यांना या संघटनांतर्फे बिस्किटे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले.

 

समस्यांची सोडवणूक करणार

२००६ सालच्या वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मागणी होती, पण या कायद्याची अंमलबजावणी राज्यात आधीपासूनच सुरु आहे. याअंतर्गत दाखल झालेले ५० टक्के दावे निकाली निघाले आहेत. शिवाय जे शेतकरी वनजमीन कसत आहेत, त्यांच्या नावावर ती जमीन करणे, कसत असलेली जमीन आणि ताब्यात असलेली जमीन यातील तफावत दूर करणे, २००५ सालापर्यंतची जागा नावावर व्हावी हे सर्व विषय मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने घेतले असून ६ महिन्यांत या समस्यांची सोडवणूक केली जाईल.

- विष्णू सवरा, आदिवासी विकास मंत्री

 
 

महसूलमंत्र्यांनी मानले शेतकर्‍यांचे आभार

राज्य सरकारच्यावतीने महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आझाद मैदानात शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठावर येऊन शेतकर्‍यांच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्याची घोषणा केली. दरम्यान. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी रात्रभर चालून पहाटे आझाद मैदान गाठले त्याबद्दल त्यांनी शेतकर्‍यांचे आभार मानले.

 
 

खा. पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा विपर्यास

‘‘लोकशाहीत आंदोलने होत असतात, उत्तर महराष्ट्रातून शेतकरी आणि वनवासी मुंबईत आले. त्यांच्या पुढील समस्यांसाठी उत्तर शोधण्यासाठी आमचे सरकार बांधील आहे. मोर्चा शेतकर्‍यांचा होता पण त्यांच्या हाती कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा होता, याचा विचार आपण केला पाहिजे,’’ असे वक्तव्य खासदार पूनम महाजन यांनी केले. यावर एका खाजगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी प्रतिप्रश्न करत ‘‘झेंड्याबद्दल काही आक्षेप आहेत का आणि त्रिपुरात तुम्ही डाव्या पक्षांना हरवलं, त्या विचारांचा पराभव तुम्ही केला,‘‘ असे म्हटले. यावर महाजन म्हणाल्या की, या ‘‘विचारधारेचा पराभव आम्ही नाही जनतेने केला. पण देशभरात शहरी माओवाद वाढत आहे, ‘‘अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. पण काही माध्यमांनी खा. पूनम महाजन यांच्या या विधानाचा ‘मुंबईत आलेल्या शेतकर्‍यांच्या माध्यमातून शहरी माओवाद वाढणारअसा मथळा करत वक्तव्याचा विपर्यास केला.

@@AUTHORINFO_V1@@