शेतकऱ्यांच्या मागण्यांसंबंधी सरकार सकारात्मक : गिरीश महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |

किसान सभेला चर्चेसाठी निमंत्रण




मुंबई :
शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी नाशिकहून सुरु करण्यात आलेला किसान सभेचा मोर्चा आज पहाटे आझाद मैदानवर दाखल झाला असून शेतकऱ्यांच्या मागण्यांसंबंधी राज्य सरकारने देखील आता सकारत्मक भूमिका घेतली आहे. आज दुपारी चर्चेसाठी किसान सभेला चर्चेसाठी सरकारकडून निमंत्रण देण्यात आले असून या चर्चेमध्ये किसान सभेच्या सर्व मागण्यांसंबंधी चर्चा केली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
 
 
किसान सभेचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर आज पहाटे महाजन यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून मोर्चेकरांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी मोर्चेकरांच्या मागण्या ऐकून घेतल्या. तसेच मुख्यमंत्री हे चर्चेसाठी तयार असून सरकार शेतकऱ्यांच्या या मागण्यासाठी अत्यंत सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले. याच बरोबर दुपारी चर्चेसाठी निमंत्रण देऊन काही काळ मोर्चेकरांसह त्यांनी पायी प्रवास देखील केला.
 
 
दरम्यान मोर्चेकरी विद्याविहारमधून आज पहाटेच विधानभवनाकडे रवाना होणार होते. परंतु तब्बल ३० हजार नागरिकांचा मोर्चा रस्त्यावर उतरल्यामुळे सामान्य नागरिक तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थांना कसल्याही प्रकारचा अडथळा वा त्रास होऊ नये, म्हणून काल मध्यरात्री हा मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना झाला होता.




 
मोर्चाच्या पाठीमागून विरोधकांची नवी खेळी

दरम्यान सरकार दरबारी आपली बाजू मांडण्यासाठी निघालेल्या या शेतकरी बांधवांच्या अडून विरोधकांनी आता एक नवीन खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. किसान सभेची कसल्याही प्रकारची पाठिंब्याची मागणी नसताना देखील राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी या मोर्चाला आपला पाठींबा दर्शवत शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मनसे, आपसह सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनी देखील मोर्चाला पाठींबा दर्शवत राज्य सरकारवर हल्लाबोल सुरु केला आहे. मोर्चाचे कारण देत हे सरकार सर्वच आघाड्यांवर फसल्याचे विश्लेषण सध्या सर्वच विरोधी पक्ष करत असल्याचे दिसत आहे.
@@AUTHORINFO_V1@@