मराठी नववर्ष स्वागतासाठी नाशिकमध्ये तयारी सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |
 
 
 
नाशिक : मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे तयारी सुरू झाली आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्ताने स्वागत यात्रा, महावादन, महारांगोळी यासारखे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष राजेंद्र दरगोडे यांनी जनकल्याण रक्तपेढी येथे पत्रकार परिषदेत दिली.
 
नववर्षाच्या स्वागताची तयारी स्वागत समितीच्या माध्यमातून सोमवारी दि. १२ मार्चपासून केली जाणार आहे. यादिवशी रविवार कारंजा यात्रा समितीतर्फे लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शंकराचार्य न्यास येथे ’नाशिक’ या विषयावर लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता २० ढोलपथकांचे एकत्रित महावादन होणार आहे. यात एक हजार वादक सहभागी होणार असून या ढोलवादनातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती रोहित गायधनी यांनी दिली, तर गुरुवारी दि.१५ मार्च रेाजी शहरांतील विविध सात विभागांमध्ये अडीचशे चौरस फुटांच्या रांगोळ्या काढण्यात येणार असून शुक्रवारी दि. १६ मार्च रोजी गोदाघाटावर २५ हजार चौरस फूटाची महारांगोळी काढण्यात येणार आहे.
 
गो-सेवा संकल्पनेवर आधारित या उपक्रमात सुमारे पाचशे महिला सहभागी होणार आहेत. इंदिरानगर परिसरातील मोदकेश्वर मंदिर येथे ग्रामसेवा, कालिका माता मंदिर परिसरात पर्यावरण सेवा, नाशिकरोड मुक्तीधाम येथे संस्कार सेवा, आडगावच्या वीर सावरकर स्मारक येथे राष्ट्रसेवा, सिडको पेठे हायस्कूल परिसरात शिक्षण सेवा, गंगापूररोडच्या श्री गुरुजी रुग्णालय येथे आरोग्य सेवा व पाथर्डी फाटा परिसरात सजीव सेवा विषयावर अडीचशे चौरस फुटाच्या महारांगोळ्या काढण्यात येणार आहेत.
 
स्वागत यात्रेचे स्वरूप
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी पंचवटी विभागातून गुढीपाडव्याला रविवारी दि. १८ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून गुढीपूजन करून ७ वाजता नववर्ष स्वागतयात्रेस प्रारंभ होणार आहे. स्वागतयात्रा गणेशवाडी मार्गे सुरू होऊन ९.३० वाजता पंचवटी भाजी पटांगण येथे स्वागतयात्रेचा समारोप होणार आहे तर रविवार कारंजा विभागाची स्वागतयात्रा रविवारी याच वेळात साक्षी गणपती मंदिरापासून संत गाडगे महाराज पुतळा ते चांदवडकर लेन, दिल्ली दरवाजाकडून पढे भाजी पटांगणावर या यात्रेचा समारोप होणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@