गोदावरी गौरव पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रजांचा कृपाप्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : ’’कुसुमाग्रजांचे शब्द, काव्य ध्रुव तार्‍यासारखे अढळ आहे. समाजाकडे व्यापक दृष्टीने पाहणारे ते महामानव होते. त्यांच्या नावाच्या प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रजांचा दिव्य कृपाप्रसाद आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केले.
 
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणारा गोदावरी पुरस्कार वितरण सोहळा रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी उत्साहात पार पडला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
 
चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर, आदिवासींसाठी कार्य करणारे डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, विख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट, गायक पं. सत्यशील देशपांडे, सुदर्शन शिंदे, महेश साबळे यांना कर्णिक यांच्या हस्ते गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. व्यासपीठावर संजय पाटील, महापौर रंजना भानसी, विनायक रानडे, अरविंद ओढेकर, विनय ठकार, डॉ. कुणाल गुप्ते, गुरुमित बग्गा यांची उपस्थिती होती.
 
यावेळी अभिनेते अमोल पालेकर म्हणाले की, ’’तुम्ही फक्त लढ म्हणा, हे त्यांचे केवळ तीन शब्द मला लढण्यासाठी प्रेरणा देतात.’’ तर ’’गोदावरी गौरव पुरस्काराने मी उपकृत झालो आहे.’’ अशी कृतज्ञता पं. सत्यशील देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केली. जुन्या नव्याची सांगड कशी घालावी, हे कुसुमाग्रजांनी शिकवले.’’ असे भावपूर्ण उद्गार डॉ. स्नेहलता देशमुख यांनी काढले. चित्रकार सुभाष अवचट म्हणाले, ’’चित्रकलेतून अनेक मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला. कुसुमाग्रज त्यापैकी एक महान व्यक्तीत्त्व आहेत.’’तर सुदर्शन शिंदे म्हणाले की,’’ गोदावरी गौरव हा मला मिळाला नसून राज्यातील सर्व पोलीस, अग्निशामक दलात काम करणारे कर्मचारी, होमगार्ड सुरक्षारक्षक यांना मिळालेला पुरस्कार आहे,’’ ’’हा पुरस्कार आणि नाशिककरांचे प्रेम पाहून मला विलक्षण आनंद झाला आहे.’’ असे गौरवोद्गार स्मिता कोल्हे यांनी काढले. यावेळी पुरस्कारार्थींचा परिचय आणि सूत्रसंचालन कवी किशोर पाठक यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@