अहि-नकुलाची अगतिकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |
 

 
योगी सरकारच्या कामगिरीमुळे राज्यातील वातावरण सौहार्दाचे, सौजन्याचे, विश्वासाचे झाल्याने सप-बसपचे अवसान गळाले. कारण ज्यांचे दुकानच जाती आणि धर्मांधर्मातील वैरावर आधारलेले होते, त्यांना भाजपच्या विकासाभिमुख, सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या राजकारणामुळे आपले स्थान डळमळीत झाल्यासारखे वाटले. आता जनतेच्या मनातून उतरलेल्या, पराभवाच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या या लोकांनी एकत्र येत स्वतःचे स्थान पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण ज्यांना जनतेने आधीच नाकारले आहे, त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यांना स्वीकारणार तरी कोण?
 
पूर्वोत्तरांतील राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला मिळालेल्या अफाट यशामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या विरोधकांना जबरदस्त झटका बसला. त्या झटक्यामुळे आतापर्यंत एकमेकांचे कट्टर वैरी समजल्या जाणार्‍या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला एकत्र येण्याची गरज निर्माण झाली. गेस्ट हाऊस कांडानंतर गेल्या २२ वर्षांत या दोन्ही पक्षांची अवस्था अही-नकुलाच्या शत्रुत्वासारखी झाली होती, पण देशभरातून भाजपला मिळत असलेल्या दणदणीत समर्थनामुळे एकमेकांमधून विस्तवही न जाणार्‍या या पक्षांची पराभवाच्या भीतीने गाळण उडाली. याच भीतीने शेवटी मायावती आणि अखिलेश यादव या बुवा-बबुआंना हातमिळवणी करायला अगतिक केले. हा खरे तर भाजपचा, भाजपच्या धोरणांचा, भाजपच्या विचारसरणीचा, राज्यातील जनतेचाच विजय मानला पाहिजे. कारण या जनतेनेच माया-मुलायम-अखिलेश या सत्तांधांना नाकारत भाजपला स्वीकारले होते. आताही या पक्षांनी एकत्र येण्याची घोषणा केली असली तरी जनता पुन्हा मतदानाच्या माध्यमातून त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल, याची खात्री वाटते. ज्यांच्या सत्तेमुळे जनता गांजली होती, ते एकत्र आले तरी जनता त्यांना का स्वीकारेल? या दोन्ही पक्षांची ही हातमिळवणी फक्त पोटनिवडणुकांपुरती असली तरी त्यामागे त्यांची अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड स्पष्टपणे दिसते. कारण आपल्या अस्तित्वावरच घाला घालणारे संकट अगदी गळ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत कोणीही शत्रू एकत्र येऊ शकत नाही. इथेही तसेच झाले. दोन्ही पक्षांना जनतेच्या दरबारातले आपले भयाण भविष्य दिसले आणि त्या धास्तीने मग हत्तीने सायकल पकडली पण जिथे सायकलचे टायरच पंक्चर आहे, तिथे हत्तीला आधार तरी कसा मिळणार?
 
२०१४ सालच्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशातील जनतेने भाजपच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. बसप-सपच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचारी, गुन्हेगारांना संरक्षण देणार्‍या, नव्हे गुन्हेगारांच्या टोळ्यांनाच पक्षसदस्यत्व दिलेल्या, राजरोस अराजक लोकांच्या माथी मारणार्‍या सरकारांना जनता कंटाळली होती. आपणच निवडून दिलेले सरकार आपलीच कामे करत नसल्याचे पाहून, फक्त स्वतःचे आणि हत्तींचे पुतळे उभारण्याच्या महत्कार्यात गर्क असलेल्या बसपच्या मायावती सरकारमुळे जनता पिचली होती. त्याच जनतेने या पुतळासमाज पक्षाला चांगलीच अद्दल घडवली. हे जसे बहुजन समाज पक्षाचे झाले तसेच विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन करणार्‍या पक्षालाही जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजाला अपमानास्पद वागणूक देऊन, त्यांच्या धर्मश्रद्धांची हेटाळणी करत केवळ दाढी कुरवाळण्याचे धोरण अवलंबलेल्या समाजवादी पक्षाला लोक वैतागले होते. त्याचमुळे या लोकांनी संधी मिळताच मुल्लामुलायम-अखिलेशच्या मुस्लीमसमाजवादी पक्षाची अवस्था होत्याची नव्हती करून टाकली. लोकांनी भाजपवर विश्र्वास ठेवत विकासाला मत दिले. धर्माधर्मात-जातीजातीत भांडणे लावणार्‍या आणि त्या भांडणांच्या, वादांच्या, दंगलीच्या जीवावर आपल्या स्वार्थी राजकारणाची पोळी भाजणार्‍या दबंगांना जनतेने थेट झिडकारले आणि भाजपला स्वीकारले.
 
भाजपने सत्तेवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रूपात एक स्वच्छ चारित्र्याचा, जनतेच्या प्रश्नांची-समस्यांची जाण असलेला आणि त्यांची सोडवणूक करण्यास सक्षमअसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कार्यशैलीतून, निर्णयप्रक्रियेतून जनतेच्या मनात सुरक्षिततेची, आपलेपणाची भावना निर्माण केली. कुख्यात गुंडांना, गुन्हेगारांना तुरुंगात टाकले, ज्यांनी शरण यायला नकार दिला, त्यांना यमसदनी धाडले. कोणत्याही समाजाचा दुःस्वास, द्वेष न करता विकासाच्या पथावर आश्वासक वाटचाल करत लोकांचे दुःख-दैन्य मिटवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. राज्यातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले, उद्योगवाढीसाठी जागतिक स्तरावरील दिग्गज कंपन्यांना आमंत्रण दिले, राज्यात दळणवळणाच्या, शिक्षणाच्या सोयीसुविधा उभारण्यासाठी पायाभरणी केली. आधीच्या सरकारांनी प्रवेशास बंदी घातलेल्या हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येत विजयादशमी-दिवाळी हे सण उत्सवांसारखे साजरे केले आणि तेही कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देता पण योगी सरकारच्या कामगिरीमुळे राज्यातील वातावरण सौहार्दाचे, सौजन्याचे, विश्वासाचे झाल्याने सप-बसपचे अवसान मात्र गळाले. कारण ज्यांचे दुकानच जाती आणि धर्मांधर्मातील वैरावर आधारलेले होते, त्यांना भाजपच्या विकासाभिमुख, सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या राजकारणामुळे आपले स्थान डळमळीत झाल्यासारखे वाटले. आता जनतेच्या मनातून उतरलेल्या, पराभवाच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या या लोकांनी एकत्र येत स्वतःचे स्थान पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण ज्यांना जनतेने आधीच नाकारले आहे, त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यांना स्वीकारणार तरी कोण?
 
दुसरीकडे सप आणि बसपची ही हातमिळवणी फक्त गोरखपूर आणि फूलपूर इथल्या लोकसभा पोटनिवडणुकांपुरतीच असल्याचे सांगितले जाते. ही हातमिळवणी कोणत्याही विचारांवर आधारलेली नाही तर मायावतींच्या शब्दांत सांगायचे झाले तर, या हाताने घ्या आणि त्या हाताने द्या, अशा स्वरूपातली आहे. म्हणजेच ज्याचा पायाच अशा स्वार्थाच्या भुसभुशीत जमिनीवर उभारलेला आहे, ते लोक किती काळ एकत्र राहू शकतील हाही सवाल आहेच. शिवाय अशा हातमिळवणीवर जनतेने तरी विश्र्वास का ठेवावा? सप-बसपच्या हातमिळवणीनंतर भाजपचा द्वेष करणार्‍यांना तर तिसर्‍या आघाडीची स्वप्नेही पडू लागलीत पण या तिसर्‍या आघाडीचा नेता कोण असणार? ज्यांची विधानसभा-लोकसभेच्या एकेका जागेवरून भांडणे लागतात, ज्यांना स्वतःशिवाय इतर कोणाचा उत्कर्ष झाल्याचे सहन होत नाही, ज्यांना स्वतःलाच मुख्यमंत्री-पंतप्रधानपदाची स्वप्ने दिवसाढवळ्या पडतात, त्यांना कोणा एकाचे नेतृत्व मान्य होईल का? या सगळ्यात काँग्रेसचे स्थान नेमके काय असणार? विधानसभा निवडणुकीवेळी ‘यूपी को साथ पसंद है,’ अशी जाहिरातबाजी करणार्‍या राहुल गांधींच्या काँग्रेसला तर सप-बसप दोघांपैकी कोणीही विचारत नाही. मायावतींनी रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत सपला दिलेला पाठिंबा धर्मनिरपेक्ष पक्षांना किती ताकद देईल, हे काळच सांगेल, पण बसपने या माध्यमातून कॉंग्रेसवर नैतिक दबावही टाकला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तर बिगरभाजप आणि बिगरकाँग्रेस पक्षांची मोट बांधण्याचीही गोष्ट केली आहे. म्हणजे एका बाजूला विरोधकांमध्ये एकतेचा अभाव दिसत आहे आणि विरोधकांपैकी सर्वात मोठा पक्ष कॉंग्रेसबाबत कोणतीही गोष्ट साफ नाही. त्यामुळे अशा विखुरतेत एकता शोधणार्‍यांचे भवितव्य तरी काय असणार?
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@