राज्यसभा निवडणूक : भाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे इतर पक्ष बुचकळ्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Mar-2018
Total Views |



 
राज्यसभेचे रणमैदान तापले, पडद्यामागील हालचालींना वेग

राणे, मुरलीधरन, केतकर, विजया रहाटकर यांचे अर्ज दाखल



मुंबई, (निमेश वहाळकर) : प्रारंभी सरळसोप्या वाटणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांच्या लढती भाजपने अनपेक्षितरित्या चौथा उमेदवार देत भलत्याच चुरशीच्या बनवल्या असून यामुळे भाजपेतर पक्ष चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत.
आज विधानभवन येथे भाजपचे उमेदवार व केरळ भाजपचे नेते व्ही. मुरलीधरन तसेच भाजप पुरस्कृत उमेदवार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच काँग्रेसचे उमेदवार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही आपला अर्ज दाखल केला. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षांच्या विद्यमान संख्याबळानुसार राज्यसभेच्या या ६ जागांपैकी भाजपचे ३ तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी होऊ शकणार आहेत. मात्र, भाजपने सोमवारी अचानकपणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या रूपाने चौथा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या घटनेनंतर चकीत झालेल्या अनेकांनी रहाटकरांचा अर्ज कदाचित 'डमी अर्ज' म्हणून दाखल केला असेल असा अंदाज वर्तवला तर काहींनी कुमार केतकर यांचे राज्यसभेवर जाणे या उमेदवारीमुळे धोक्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवला.
मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या परस्परविरोधी प्रतिक्रिया
विजया रहाटकर यांच्या उमेदवारीबाबत सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्र्यांनी दै. 'मुंबई तरूण भारत'सोबत केलेल्या अनौपचारिक वार्तालापात त्यांनी हा डमी अर्जच असल्याचे स्पष्ट केले. तसेच, ही निवडणूक बिनविरोध होईल, असेही या मंंत्र्यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका आमदाराने, जर मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले, तर निकाल वेगळे लागू शकतात, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. तर, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना 'विजया रहाटकरांचा अर्ज डमी आहे किंवा नाही हे आधीच कशाला ठरवता, ते योग्य वेळी पाहू. आधी थोडं वातावरण तापू तर द्या !' असे म्हणत पुढील वाटचाल स्पष्ट केली. तसेच, 'आम्ही ३ उमेदवार घोषित केले व त्यांचे अर्ज भरले तर एका उमेदवाराचा नुसता अर्ज भरला' असे सांगत ही निवडणूक वाटते तितकी सोपी राहिली नसल्याचे स्पष्ट केले. भाजपतर्फे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, शिवसेनेतर्फे अनिल देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वंदना चव्हाण यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला असून यांंच्यासह व्ही. मुरलीधरन व नारायण राणे आदी पाच उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित आहे.
कुमार केतकर यांची वाट खडतर?
राज्यसभेच्या एका जागेसाठी विधानसभेतील आमदारांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. विद्यमान पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होणे सहज शक्य होते. मात्र, भाजपने चौथा उमेदवार उतरवला. तसेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाल्याने ते एक मत कमी झाले. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे व कट्टर राणेसमर्थक मानले जाणारे काँग्रेस आमदार कालीदास कोळंबकर हे मनाने केव्हाच काँग्रेसमधून बाहेर पडल्याचे मानले जात असल्याने त्या मतांचीही शाश्वती नाही. तसेच भाजपने यापूर्वी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत व प्रसाद लाड यांच्या विधानपरिषद निवडणुकीत विरोधी पक्षांची डझनाहून अधिक मते फोडत सर्वांना धक्का दिला होता. त्यामुळे, शेकाप, एमआयएम, समाजवादी पक्ष, भारिप-बहुजन महासंघ आदी विरोधी पक्षांच्या मतांची काँग्रेसला शाश्वती देता येत नाही. तसेच, केतकरांना उमेदवारी देताना जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे काँग्रेस अंतर्गतही बरीच नाराजी असल्याचे काँग्रेस आमदारांनी सांगितले. अशा परिस्थितीत, शिवसेनेच्या अतिरिक्त मतांची 'तजवीज' काँग्रेसला करावी लागेल. ही सगळी परिस्थिती पाहता ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची राज्यसभेवर जाण्याची वाटचाल काहीशी खडतर बनल्याचे दिसत आहे.
..तर आम्ही उघडपणे भाजपला मत देऊ !
या निवडणुकीत गुप्त मतदान होणार नसून उघड मतदान होणार आहे. त्यामुळे गरज पडल्यास आम्ही उघडपणे भाजपला मत देऊ असे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी भाजपला सांगितले असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले. मात्र, आम्ही त्यांना तूर्तास तसे न करण्याची सूचना केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, शिवसेनेची अतिरिक्त मते घेऊन कुमार केतकर यांना विजयी करायचे झाल्यास शिवसेना उघडपणे काँग्रेसला मतदान करणार का, असाही प्रश्न या मंत्र्याने उपस्थित केला. ही सगळी परिस्थिती पाहता सुरूवातीला अगदीच सोपी वाटणारी ही निवडणूक सोमवारी घडलेल्या घडामोडींनंतर भलतीच क्लिष्ट बनली आहे. भाजपच्या पुढील डावपेचांचा अंदाज इतर पक्षांना लागत नसून, विजया रहाटकर प्रत्यक्ष निवडणूक लढणार की अर्ज मागे घेणार याबाबतही स्पष्टता आलेली नाही. भाजपच्या विविध नेत्यांनी केलेली वक्तव्ये पाहता निवडणुकीतील नाट्यमयता आणखी वाढली आहे. शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण तसेच भाजपतर्फे प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन व नारायण राणे यांचा विजय निश्चित असला तरी विजया रहाटकर यांच्या उमेदवारीमुळे व काँग्रेसमधील अंतर्गत पडझडीमुळे कुमार केतकर यांची निवडीबाबतची उत्सुकता मात्र थोडी ताणली गेली आहे.
@@AUTHORINFO_V1@@