बोंड अळीने नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : ओखी वादळाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा मदतनिधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. मात्र, नाशिक विभागात बोंडअळीने नुकसान झालेले सुमारे ८ लाख शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मदत देताना ३३ टक्क्याांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच मदत मिळणार आहे.
 
 
बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांच्या नुकसान भरपाईच्या मदतीसाठी सरकारने नुकतीच रक्कम निश्‍चित केली. त्यानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रतीहेक्टरी ६७०० रुपये, तर बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १३५०० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नाशिक विभागात ८ लाख, ९५ हजार ५२९ हेक्टरपैकी ७ लाख, ९३ हजार १४३ हेक्टर क्षेत्रावरील पीक बोंडअळीने फस्त केले. मात्र, अद्यापही शेतकर्‍यांना मदत मिळू शकली नाही. नाशिक जिल्ह्यात ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले गेले. यात जवळपास संपूर्ण क्षेत्र बाधित झाले असून ३३ हजार १०५ हेक्टर जिरायत क्षेत्रावरील तर २८४१.७८ हेक्टर बागायती क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले आहे.
 
 
जिल्ह्यात प्रामुख्याने मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा, सटाणा, निफाड, चांदवड व सिन्नर या तालुक्यात कपाशीची लागवड केली जाते. यातील मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यात सर्वाधिक तर सटाणा, देवळा, चांदवड तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कपाशीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ७१ हजार ९८१ कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे कापसाचे पीक बोंडअळीने नष्ट झाले आहे. मात्र, ५३ हजार ३९३ शेतकर्‍यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी २६ कोटी, ३३ लाख, ४५ हजार, ७८६ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे तर नाशिक विभागात सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यात झाले आहे. विभागातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सुमारे ७५२ कोटी ३६ लाख ४४ हजार रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.
 
 
विभागात असे आहे नुकसान
 
 
नाशिक जिल्ह्यात ०.४६ लाख हे. क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली असून ०.१८ लाख हेक्टर म्हणजे ३९ टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र २.५ टक्के असून १०० टक्के क्षेत्र प्रभावित झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात १.०२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली असून, ०.३६ लाख म्हणजेच ३५ टक्के नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात ४.७६ लाख क्षेत्र लागवडीखाली असून ३.८६ लाख हे. क्षेत्र म्हणजेच ८१ टक्के क्षेत्र बाधित झाले आहे तर अहमदनगर जिल्ह्यात ० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
 
 
मदतीसाठी निकषांची पुर्तता करणे आवश्यक
 
नुकसानीनंतर मदत मिळण्यास सरकारी नियमानुसार ठरवलेले निकष पुर्ण करणे गरजेचे आहे. निकषानुसार आर्थिक मदत दोन हेक्टरपर्यंतच देण्याचा सरकारी निर्णय आहे. परंतु त्यासाठीही शेतकर्‍यांनी अटी शर्थींची पूर्तता करणे आवश्यक आहे. यात पंतप्रधान पीक विमा योजनेत सामाविष्ट असलेले शेतकरी मदतीस पात्र ठरत नाही. २०१२ ते २०१६ या पाच वर्षांतील पीक कापणी प्रयोगानुसार आलेले हेक्टरी उत्पादन आणि २०१७ मधील प्रत्यक्ष सरासरी उत्पादन यांच्यातील घट ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आलेल्या मंडळातील शेतकरीच मदतीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे मदतीस पात्र ठरवूनही शेतकर्‍यांना निकष पूर्ण करावे लागणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@