ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
धडाडीचे आणि झंझावात नेतृत्व असणारा नेता 

 
 
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांचे काल रात्री १० वाजेच्या सुमारास मुंबईत निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. कर्करोगामुळे काल रात्री १० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला तसेच महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
 
 
परखड आणि रोखठोक बोलण्यासाठी परिचित असलेले पतंगराव कदम हे राजकीय क्षेत्रात चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते असलेल्या पतंगराव कदम यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तब्बल २० वर्षाहून अधिक काळ अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. यामध्ये शिक्षण, महसूल, वने, पुनर्वसन व मदत, उद्योग, सहकार, या खात्यांचा समावेश होता.
 
 
 
 
तत्परतेने आणि धाडसी निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्यात छाप होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. पतंगराव कदम यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे, आम्ही एक महान शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक आणि राजकीय नेता गमावला आहे. राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील. अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली.
 
 
 
पतंगराव कदम यांचे पार्थिव आज सकाळी ७ ते ९ वाजेच्या सुमारास पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर भारती विद्यापीठ धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत ठेवण्यात येईल. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वांगी येथील सोनहिरा साखर कारखाना येथे शासकीय इतमामात दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 
@@AUTHORINFO_V1@@