‘मेहरूण’च्या विकासात अडचण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2018
Total Views |

 

पहिल्या टप्प्यात केवळ ५ कोटी मंजूर; प्रस्तावित सुविधांमध्ये कपातीची शक्यता


 
 
जळगाव :
शहरातील मेहरूण तलावाचे सुशोभिकरण करून त्याला जिल्ह्यातील एक मोठे पर्यटनस्थळ करण्याचा महापालिका प्रशासनाचा मनोदय होता. या कामासाठी महापालिकेने सुमारे ३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पर्यावरण विभागाकडून केवळ पाच कोटी रुपये मंजूर झाल्याने प्रस्तावित सुविधांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणासाठी तयार केलेल्या प्रस्तावात तलाव परिसरात अद्ययावत थीम पार्क, ऍम्पी थिएटर, संगीतमय कारंजे व जॉगिंग ट्रॅक यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या सार्‍या बाबींची पूर्तता करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात मूळ प्रस्तावाच्या तुलनेत अत्यंत कमी निधीला मंजुरी मिळाल्याने मेहरूण तलावाच्या विकासात अडचणी येण्याची भीती आहे.
 
 
जळगाव शहरात पर्यटनस्थळ म्हणून किंवा सायंकाळचा विरंगुळा म्हणून कुठलेही ठिकाण नाही. यासाठी शहरातील मेहरूण तलावाचे सुशोभिकरण करून हा परिसर जळगावकरांना एक छोटे पर्यटन केंद्र म्हणून उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यानुसार महापालिकेने मेहरूण तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी वास्तूविशारद शिरीष बर्वे यांच्याकडून ३३ कोटी ७४ लाख ७२ हजार ९२७ रुपयांचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडे मार्च २०१७ मध्ये पाठवला होता.
 
 

५ कोटींना मंजुरी - नुकताच पर्यटन विभागाने मेहरूण तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. सुरेश भोळे यांनी दिली आहे. केवळ ५ कोटीच निधी मंजूर झाल्याने आता जुन्या प्रस्तावातील अनेक सुविधांमध्ये कपात करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेहरूण तलावाच्या संपूर्ण विकासासाठी अजून जळगावकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

असा होता मूळ प्रस्ताव - या तलावाच्या सभोवताली जॉगिंग ट्रॅक होणार आहे. तसेच पूर्ण तलावाला डबर पिंचिंग, पेव्हर ब्लॉक असलेल्या ट्रॅकसह लोकांना बसण्यासाठी पायर्‍या, बेंच, सरबिंग वॉल, आकर्षक वृक्षारोपण, गार्डन, ट्रॅकवर लाईट व्यवस्था, हायमस्ट लॅम्प, सुसज्ज बेट विकसित करून तेथे ब्रीज, अद्ययावत दर्जाचे ऍम्पी थिएटर, योगा व मेडिटेशनसाठी सर्व सुविधांनी सज्ज हॉल, तलाव परिसरात संगीतमय कारंजे, बोटिंगची सुविधा, फूड प्लाझा, सुरक्षेसाठी पोलीस चौकी, सुरक्षा रक्षकांसाठी चौकी, अशा बाबींचा मूळ प्रस्तावात समावेश होता.

 
@@AUTHORINFO_V1@@