विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करू : शिक्षणमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2018
Total Views |





मुंबई :
एखादी शाळा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारत असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच, ज्या शाळा आरटीईअंतर्गत येतात मात्र, विद्यार्थ्यांना प्रवेश न देता जागा रिक्त ठेवतात अशा शाळांवर कारवाई करून सदर शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा राज्याचे शालेय, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत बोलताना दिला.


यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी १५४.२० कोटी रूपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, उर्वरित १४८ कोटी रुपये येत्या अर्थसंकल्पात उपलब्ध करण्यात येणार आहेत. मुंबईसह राज्यातील खासगी विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव कोट्यातून दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत शिवसेना आमदार सुनील प्रभु यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना तावडे यांनी ही माहिती दिली. २०१२-१३ पासून शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली आहे. २०१७-१८ पर्यंत त्याअंतर्गत २ लाख ३८ हजार ३३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मुंबईच्या ३३४ शाळांमधील ८,५९३ जागांपैकी ३,१८१ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थी ‘आरटीई’ अंतर्गत येणा-या इतर शाळांत प्रवेश घेण्यास इच्छुक नसल्याचे आढळून आले आहे. तसेच, अल्पसंख्याक शाळा आरटीई अंतर्गत येत नाहीत तेथे २५ टक्के राखीव जागा नसतात. ज्या शाळेत आरटीई लागू आहे अशा काही शाळांमध्ये प्रवेश घेण्यास पालक इच्छुक नसल्यामुळे संबंधित शाळांतील जागा रिक्त असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

आता सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने, शाळांनी प्रवेश का नाकारला, त्याबाबतची कागदपत्रे विद्यार्थ्यांनी दिली आहेत की नाही याची याची कारणे तात्काळ समजू शकतात. यामुळे पुढील कारवाई करणे सोपे झाले असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात समस्या उद्भवणार नाहीत. यापूर्वी खोटे दाखले सादर करून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असल्यास शाळांनी नवीन कागदपत्रे मागवून त्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशा सूचना करण्यात आल्या असल्याची माहितीही विनोद तावडे यांनी यावेळी दिली.

@@AUTHORINFO_V1@@