सुरेश भटांच्या शिष्यांची नव्या पिढीवर दहशत : कटककर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2018
Total Views |

 
 
 
पुणे : सुरेश भट साहेबांचे शिष्यत्व पत्करलेल्या गझलेतील दुसऱ्या पिढीने सुरेश भटांनंतर तिसऱ्या पिढीला सतत दहशतीत ठेवले. सुरेश भट आणि माझी भेट झाली नाही. नाहीतर मी पण त्यांच्या दहशतीत गेलो असतो. आज गझलकार म्हणून उभा राहिलो नसतो. गझलेवर इस्लाह होणे तंत्राच्या दृष्टीने योग्य आहे. असे परखड मत गझलकार भूषण कटककर आणि सुप्रिया जाधव यांनी व्यक्त केले. 'एक कवयित्री एक कवी' या मसापने आयोजित केलेल्या मैफिलीत ते बोलत होते. प्रसिद्ध कवी उद्धव कानडे आणि ऍड. प्रमोद आडकर यांनी या दोघांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपल्या गझलांचे सादरीकरण केले. उपस्थित रसिकांनी त्यांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
 
 
मराठी गझलकारांनी माझ्या गझलेची पिसे पाडली. मला दहशतीत ठेवले. पंकज उदास यांच्या गझला ऐकून मी उर्दूचा अभ्यास केला. मग मराठीत गझल लिहिली. शास्त्रशुद्ध गझल महत्वाची असते. ज्यांना गझल येत नाही ते कवितेचा द्वेष करतात. काही गझलकार स्वतःला सुरेश भटांचे वारस समजतात. प्रकाशकांना पैसे मोजल्याशिवाय संग्रह प्रकाशित होत नाहीत. हा प्रकार थांबला पाहिजे असे कटककर यावेळी म्हणाले.
 
 
गझलेची कार्यशाळा आवश्यक असते. स्त्री गझलकारा म्हणून अनेक अनुभव पचवावे लागले. स्त्रीचा आणि गझलेचा संबंध काय असे विचारणारे लोकही भेटले असे सुप्रिया जाधव म्हणाल्या. कविता कराव्यात, भाकरी भाजाव्यात, गप्प बसावं असे सल्ले आपल्याला लोकांनी दिल्याचे जाधव यांनी सांगितले. टिकाकार भेटतात म्हणून सुधारणा होते. पुस्तकापेक्षा गझलेच्या सादरीकरणातून जास्त लोकप्रियता मिळते. गझलेतले शेर वेगवेगळ्या विषयांवर असतात. त्यात आशय भरलेला असतो. अनेकांनी खच्चीकरण केले पण मी गझल लेखन सोडले नाही. चुकातूनच मी शिकले. गझलेचे तंत्र अवगत झाले. ई-बुक्सच्या माध्यमातून लोकप्रियता वाढली. आता गझल हीच श्वास आणि ध्यास बनली आहे. तसे प्रत्येकात एक मूल दडलेले असते. अनुभवातूनच ते मोठे होते असे जाधव यावेळी म्हणाल्या.
@@AUTHORINFO_V1@@