बदलापूरजवळ चामटोलीजवळ बिबट्याचा संचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Feb-2018
Total Views |

मादीसह दोन बछडे असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा

 

 
 
 
बदलापूर : बदलापूरपासून जवळच असलेल्या चामटोली गावाच्या हद्दीत बिबट्याचा संचार असून त्याने चार बकर्‍या फस्त केल्या आहेत तर एका बकरीला पंजा मारून तिला जखमी केले आहे. यामुळे चामटोली परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बदलापूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल चंद्रकांत शेळके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी चामटोलीमध्ये तळ ठोकला असून बिबट्याच्या पायाचे ठसे वनविभागाला आढळून आल्याने वनविभागातर्फे खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. बदलापूर आणि वांगणीदरम्यान चंदेरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तान वाडी आणि चामटोली गावाच्या हद्दीत बिबट्या अनेकांना दिसल्याची चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षदर्शी समोर येत नसल्याने याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. दोन दिवसांपूर्वी चामटोली गावाजवळील योगेश इरमाळी यांच्या जंगलात चरण्यासाठी गेलेल्या बकर्‍या परत न आल्याने ते बकर्‍यांचा शोध घेण्यासाठी घरामागील माळरानावर बॅटरी घेऊन गेले असता त्यांना बिबट्या बकरी खाताना दिसला. इरमाळी यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यावर त्याच जागेवर सकाळी बकरी मृतावस्थेत वनविभागाला आढळून आली.
 
मात्र पायाचे ठसे न मिळाल्याने वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते. त्यांनी केलेल्या पाहणीत त्यांना या भागात ठसे आढळून आले. गुरुवारी सकाळी तान येथे शेतात जाण्यासाठी निघालेल्या शालिक खाकरे यांना एक बिबट्या आणि त्याचे दोन बछडे हे पाणी पिऊन परत येत असल्याच्या ठिकाणी बघितले. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांनी सांगितली. त्यानुसार वनविभागाने या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे घेण्यासाठी मोहीम हाती घेतल्यावर या ठिकाणी एक मोठा बिबट्या आणि दोन बछड्यांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे या भागात बिबट्याचे अस्तित्व असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वनक्षेत्रपाल चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.
 
हे बिबटे भिमाशंकरच्या जंगलातून या परिसरात प्रजननासाठी आली असल्याचा अंदाज शेळके यांनी व्यक्त केला असून या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी आणि मुबलक प्रमाणात प्राणी उपलब्ध आहे. तसेच बारमाही पाणवठे असल्याने त्यांनी या भागात आश्रय घेतला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून नागरिाकांना यापासून कोणताही धोका नसून त्याबाबत वनविभागाकडून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे शेळके म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@