स्वारगेट’कोंडीवर ‘इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट हब’चा उपाय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |

महामेट्रो आणि एसटी संयुक्तपणे उभारणी करणार

 

 
मुंबई : एसटी महामंडळाचे तसेच पीएमपीएमएल बसस्थानक, तसेच सोलापूर, साताऱ्याच्या दिशेने जाणारे महामार्ग आणि शहरात जाणारे अनेक मार्ग यामुळे पुण्यातील वाहतूक केंद्र असलेले स्वारगेट हे ठिकाण सध्या वाहतूक कोंडीचे केंद्र बनले आहे. सध्या वेगाने उभारणी सुरु असलेल्या पुणे मेट्रो मार्गातील स्वारगेट मेट्रो स्थानकाचीही यात भर पडणार आहे. यामुळे भविष्यात पुणेकरांना स्वारगेट येथे न भूतो न भविष्यती अशा भयंकर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची शक्यता असून यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ‘इंटिग्रेटेड मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ची कल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या दोन्ही यंत्रणा मिळून संयुक्तपणे या प्रकल्पाची उभारणी करणार आहेत. या प्रस्तावित ‘इंटिग्रेटेड मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’च्या आराखड्याचे सादरीकरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला ‘कामाला लागण्याचे’ आदेश दिले असून महामेट्रो आणि एसटी महामंडळाने या प्रकल्प आराखड्याच्या कामाचे एकत्र नियोजन करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे समजते.
 
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत दोन टप्प्यात होणाऱ्या कामात पहिल्या टप्प्यात मेट्रो स्थानक व पीएमपीएमएल बस स्थानक विकसित करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात एसटी बस स्थानक विकसित करण्यात येणार आहे. बस टर्मिनल, भुयारी पादचारी मार्ग, थिएटर, कार्यालये व वाणिज्यिक वापरासाठीची इमारत, रिक्षा व टॅक्सी स्टँड आदींची सुविधा असणार आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे. अद्याप या निर्णयाबाबत पुरेशी स्पष्टता नसून, हा प्रकल्प कधी सुरू होणार व केव्हा पूर्ण होणार याबाबत ठोस माहिती सरकारतर्फे देण्यात आलेली नाही. आगामी काळात लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास आज बजबजपुरी बनलेल्या ‘स्वारगेट’चा चेहरामोहरा बदलणार असून ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित होणाऱ्या पुण्यासाठी ही एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@