स्वच्छता पंधरवड्यांतर्गत महिलांसाठी विशेष 'सेफ पीरीयड्स' अभियान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली :  मासिक पाळी संदर्भात आजही आपल्या समाजात बोलणे म्हणजे एक कठीण काम आहे. अशा परिस्थितीत अनेक महिला आहेत, ज्यांच्यापर्यंत मासिक पाळीच्या वेळी घेतल्या जाणाऱ्या काळजी विषयी किंवा मासिक पाळीविषयी सामान्य महत्वाची माहिती किंवा जागरुकता पोहोचलेली नाही. मात्र स्वच्छता पंधरवड्यांतर्गत केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी 'सेफ पीरीयड्स' अभियान राबविण्यात येत आहे.
 
 
 
 
 
यामध्ये विविध शाळांमधील मुलींना तसेच गरीब महिलांना याविषयी माहिती दिली जात आहे, तसेच 'सॅनिटरी पॅड्स' चा वाटप करण्यात येत आहे. मासिक पाळीवेळी स्वच्छतेची कशाप्रकारे काळजी घेतली गेली पाहीजे, ही काळजी घेणे का आवश्यक आहे, याविषयी केंद्र सरकारच्या सीएसई विभागतर्फे गावोगावी जावून माहिती देण्यात येत आहे.
 
 
 
 
याबद्दल केंद्रीय माहिती आणि सूचना प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. तेलंगणा, बिहार, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आदी ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये स्त्रियांना, मुलींना मार्गदर्शन केले जाते, सोबतच सॅनिटरी पॅड्सचे विनामूल्य वितरण देखील करण्यात येत आहे.
 
 
 
 
या विषयावर उद्या अक्षय कुमार अभिनीत पॅडमॅन हा चित्रपट देखील प्रद्शित करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज अभिनेते आणि सामान्य नागरिक 'पॅडमॅन चॅलेंज'च्या माध्यमातून जागरुकता पसरविण्याचे कार्य करत आहेत. यामध्ये ते हातात सॅनिटरी पॅड्स असलेला फोटो समाज माध्यमांवर पोस्ट करत आहेत, तसेच हे अत्यंत नैसर्गिक आहे, याबद्दल लाज वाटण्याची आवश्यकता नाही, असे या फोटोत म्हणण्यात आले आहे.
 
 

 
 
 
आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, आमिर खान, अक्षय कुमार, सोनम कपूर, करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित नेने, राजकुमार राव आणि अनिल कपूर अशा अनेक दिग्गज लोकांनी या चॅलेंज मध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे मासिक पाळी हा विषय आता समाजासाठी 'हाताची घडी तोंडावर बोट' असा विषय न राहता, जागरुकतेचा आणि बदलाचा एक मार्ग म्हणून पुढे आला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@