३६ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |

शेवटच्या दिवशी महाराष्ट्राला १२ सुवर्ण


 
 
नवी दिल्ली : केंद्रीय युवक क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या’ पहिल्याच आयोजनात महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत ३६ सुवर्ण पदकांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. आज या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने १२ सुवर्ण पदक पटकावली यात मुष्टियुद्धात तब्बल ७ सुवर्ण पदके मिळाली आहेत.
 
 
 
 
 
मुष्टियुद्धात महाराष्ट्राला ७ सुवर्ण
 
या स्पर्धेत आज महाराष्ट्रातील बहुंताश खेळाडूंचे अंतिम सामने होते. मुष्टियुद्धात महाराष्ट्राने तब्बल ७ सुवर्ण पदके मिळवून चमकदार कामगिरी केली. मुलांच्या विविध वजनी गटात ५ सुवर्ण पदके राज्याने मिळवली. विशेष म्हणजे पुणे येथील बॉइज स्पोर्ट कंपनीच्या ४ खेळाडुंनी सुवर्ण कामगिरी केली, ८० किलो वजनी गटात सतींदर, ६३ किलो वजनी गटात विजयदीप, ५० किलो वजनी गटात नवबा सिंह आणि ४८ किलो वजनी गटात अनिल या सर्वांनी सुवर्ण पदके जिंकली. याशिवाय पुणे येथील बॉइज स्पोर्ट स्कूल आर्मी स्पोर्ट इन्स्टिटयूटच्या भावेश कट्टीमनी याने ५२ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले. मुलांप्रमाणेच मुलींनीही बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकाविली यात, नागपूर येथील सेंट विन्सेट पल्लुटी स्कूलची अल्फिया तरन्नूम हीने ८० किलो वजनी गटात सुवर्ण तर ६६ किलो वजनी गटात मुंबईच्या निर्मला मेमोरियल फाऊंडेशन वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या मितीका गुणेले हीने सुवर्ण पदक पटकाविले.
 
 
 
जिम्नॅस्टीक मध्ये २ तर ज्युडो, बॅडमिंटन आणि धनुर्विद्येत प्रत्येकी १ सुवर्ण
 
जिम्नॅस्टीकमध्ये मुलींनी सुवर्ण पदकांची कमाई केली. बॉल रिदमिक जिम्नॅस्टीक प्रकारात मुंबईच्या प्रभादेवी येथील कॉनव्हेंट गर्ल्स हायस्कुलच्या क्रिशा छेडा हीने तर हुप रिदमिक जिम्नॅस्टीक प्रकारात ठाणे येथील बिल बाँग हाय इंटरनॅशनल स्कुलच्या अनन्या सोमण हीने सुवर्ण पदक पटकविले.
 
ज्युडो क्रीडा प्रकारात ९० किलो वजनी गटात मुंबई वांद्रे येथील सेंट ॲड्रूस महाविद्यालयाचा अदनान शेख याने सुवर्ण पदक पटकवले. धनुर्विद्येत कम्पाउंड वैयक्तिक प्रकारात रत्नागिरी येथील एसव्हीजेसीटी इंग्लिश स्कूलच्या ईशा पवार हीने सुवर्ण पदकावर नाव कोरले. 
 
 
नागपूर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची मालवीका बनसोड हीने मुलींच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत २१-१२ आणि २१-१० असा दणदणीत विजय मिळवत सुवर्ण पदक पटकवले.
 
 
 
६ रजत पदकांची कमाई
 
मुलींच्या जिम्नॅस्टीक क्लॅब रिदमीक व हुप रिदमीक जिम्नॅस्टीक प्रकारात दादर, मुंबई येथील बालमोहन विद्यामंदिरच्या श्रिया कुलकर्णीने २ रजत पदकांची कमाई केली. धनुर्विद्येच्या रिकर्व वैयक्तिक प्रकारात अमरावती जिल्हयातील परतवाडा येथील गुरुकुल पब्लिक स्कूलच्या सुमेध मोहोड याने रजत पदक पटकवले. मुलींच्या ज्युडो क्रीडा प्रकारात ७० किलो वजनी गटात नवापाडा, ठाणे येथील सरस्वती माध्यमिक शाळेच्या अपूर्वा पाटील हीने रजत पदक पटकवले. मुलांच्या बॉक्सिंगमध्ये ६६ किलो वजनी गटात पुणे येथील सेंट पॅट्रीक हायस्कूलच्या केशव हंस याने रजत पदक जिंकले. मुलींच्या बॉल रिदमीक जिम्नॅस्टीक प्रकारात ठाणे येथील हिरानंदानी फाउंडेशन स्कुलची प्रियंका आचार्य हीने रजत पदक मिळवले. तर एकूण ९ कास्य पदकांची कमाई महाराष्ट्राने या स्पर्धेत केली.
 
 
 
अंतिम पदकतालिकेत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर
 
आज स्पर्धेच्या ९ व्या व अंतिम दिवशी महाराष्ट्र ३६ सुवर्ण पदक मिळवून पदतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. याशिवाय ३२ रजत आणि ४३ कांस्य पदकांसह महाराष्ट्राने एकूण १११ पदके पटकविली आहेत. तर हरियाणा ३८ सुवर्ण पदके, २५ रजत आणि ३८ कांस्य पदकांसह एकूण १०२ पदकांची कमाई करणाऱ्या हरियाणाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर २५ सुवर्ण पदकांसह एकूण ९४ पदके मिळवत यजमान दिल्ली तिस-या क्रमांकावर राहीला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@