मनपा प्रभाग १३ ची पोटनिवडणूक एप्रिलमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018
Total Views |

बिनविरोध निवडीची शक्यता कमी

 

 
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर एप्रिल २०१८ मध्ये पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने घोषित केले आहे. आयोगाने त्याअनुषंगाने मतदार यादी तयार करण्याचाही कार्यक्रम जाहीर केला असून ८ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
 
दरम्यान, आयोगाने एप्रिलमध्ये पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित केल्याने इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग १३ मधील सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुरेखा भोसले यांनी मनसेकडून उमेदवारी केली होती. भोसले यांनी भाजपच्या कीर्ती प्रतीक शुक्ल यांचा पराभव केला होता. दरम्यान, १९ डिसेंबर २०१७ रोजी सुरेखा भोसले यांचे निधन झाले. त्यामुळे सदरची जागा रिक्त झालेली आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने रिक्त जागेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. नियमाप्रमाणे, सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे अपेक्षित असते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने रिक्त झालेल्या जागेवर एप्रिल २०१८ मध्ये पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे.
 
याशिवाय, भारत निवडणूक आयोगाकडून दि. १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. त्याबाबतचा कार्यक्रमही आयोगाने घोषित केलेला आहे. दि. १७ फेब्रुवारी रोजी प्रभागाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर दि. १७ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. दि. २७ फेब्रुवारीला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तर दि. ८ मार्च रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणारी पोटनिवडणूक लढविण्यासाठी शिवसेना व भाजपकडून मात्र उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. मनसेकडून भोसले कुटुंबातीलच सदस्याला उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीतही काही इच्छुकांनी तयारी चालविली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता कमीच मानली जात आहे. भाजपकडून पुन्हा एकदा कीर्ती शुक्ल रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@