इतना सन्नाटा क्यूं है भाई?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2018   
Total Views |

 
 
त्रिपुरात १८ फेब्रुवारी रोजी होणार्‍या निवडणुकांमध्ये भाजप बाजी मारणार, असे चित्र आहे. राज्यात भाजपची लाट आहे. एका बाजूला भाजपच्या सभांमधून सळसळता उत्साह दिसत असताना डाव्यांच्या सभांमध्ये गर्दीतला सन्नाटा मुख्यमंत्री माणिक सरकारना सुन्न करतो आहे. मतचाचण्यांच्या आकडेवारीतून नेमके हेच स्पष्ट होते आहे. भाजपचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना मोक्याच्या वेळी गाफील करणारे हे क्षण आहेत.
 
एखाद्या निवडणुकीसाठी पक्ष संघटनेने झोकून देणे म्हणजे काय असते, हे पाहायचे असेल तर त्रिपुरात होऊ घातलेल्या निवडणुका हे सर्वोत्तम उदाहरण आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यापासून सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण घाम गाळतायत. केंद्रीय मंत्री एकेक विधानसभा क्षेत्राचा दौरा करतायत. गृहमंत्री राजनाथ सिंह, वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचे अलिकडेच झालेले दौरे तुफान यशस्वी झाले. एकेकाळी रुपेरी पडदा गाजविणार्‍या खासदार रूपा गांगुली यांच्या सभांनाही चांगली गर्दी होती. याच दरम्यान ‘न्यूज एक्स’चा ओपिनियन पोल आला. यात भाजप आणि आयपीएफटीच्या युतीला ६० पैकी ३१ ते ३८ जागांचे स्पष्ट बहुमत मिळेल आणि डाव्या आघाडीला २३ ते २९ जागा मिळतील, असे भाकीत केले आहे. चालू विधानसभेत डाव्या आघाडीकडे राज्यात ६० पैकी ५० जागांचे भक्कम बहुमत आहे.
 
निवडणुकीला दोन आठवडे शिल्लक असताना हा सर्व्हे आला. येत्या काही दिवसांत त्रिपुरातल्या नद्यांमधून बरेच पाणी वाहून जाणार आहे. अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे दौरे शिल्लक आहेत. राज्यात या दोघांची प्रचंड ‘क्रेझ’ आहे. २०१६च्या जानेवारी महिन्यात त्रिपुरात झालेल्या पहिल्या प्रवासात मी ही ‘क्रेझ’ अनुभवली आहे. बांगलादेश सीमेवरील एका छोट्याशा गावात भाजपचा झेंडा लावलेली एक जीप दाखल झाली. मैदानात खेळणारी काही शाळकरी मुले या जीपभोवती एकत्र झाली आणि त्यांनी ‘‘मोदी, मोदी’’ असा गलका सुरू केला. त्यांना भाजपबद्दल माहिती नव्हती. परंतु जीपवर दिसणारा मोदींचा फोटो मात्र त्यांच्या चांगलाच परिचयाचा होता. मोदी आणि योगी यांच्या जाहीर सभांबाबत त्रिपुरामध्ये जबर उत्सुकता आहे. गुरुवार दि. ८ फेब्रुवारीला मोदींचा त्रिपुरा दौरा होणार असून कैलाशहर आणि सोनामुरा येथे त्यांच्या दोन सभा होणार आहेत. निवडणूक प्रचार संपण्याआधी एक दिवस ते पुन्हा त्रिपुरात येणार आहेत. या सभा अभूतपूर्व व्हाव्यात या दृष्टीने भाजप नेत्यांची जोरदार तयारी सुरू आहे.
 
भाजपने प्रचाराचा धडाका लावला असताना डाव्यांच्या प्रचाराला फारशी गर्दी होत नसल्याचे चित्र आहे. ‘‘सभेला गेलो नाही तर मनरेगाचे काम मिळणार नाही, रेशनचा तांदूळ मिळणार नाही, सरकारी नोकरीवर बालंट येईल, गावात राहणे मुश्कील होईल,’’ या भयाने जे लोक येतात, त्यांच्यात उत्साह नसतो. माणिक सरकार मोदी यांच्यावर जोशात टीकेचे आसूड ओढत असतात तेव्हा समोरचा जमाव मख्ख असतो. गर्दीतले चेहरे कोरे असतात. टाळ्यांचा दुष्काळ असतो. घोषणांचा अभाव असतो. समोरच्या गर्दीतला हा थंड निरुत्साह माकपनेत्यांना प्रचंड बोचतो आहे. महिन्याभरात सीताराम येचुरी, वृंदा करात, सुहासिनी अली आदी नेत्यांच्या सभा झाल्या. परंतु, त्यांच्या सभांमध्ये गर्दीचा हा निरुत्साह सातत्याने जाणवत होता. हा सन्नाटा नेमके काय सांगतोय, हे अलीकडे जाहीर झालेल्या मतचाचण्यांतून पुरेसे स्पष्ट झाले आहे. २००८ आणि २०१३च्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांसमोर लढायला कोणी नव्हतेच. केंद्रात यूपीए सरकारशी ‘सेटिंग’ असल्याने राज्यातल्या काँग्रेसजनांना सहज गुंडाळून डाव्यांनी या निवडणुका एकहाती जिंकल्या. परंतु, आता भाजपने त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. निवडणुकीत पराभव दिसू लागल्यामुळे डाव्यांनी रडीचा डाव सुरू केला आहे. भाजप कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू झाले आहेत. वाहनांच्या मोडतोडीच्या, जाळपोळीच्या घटनाही अमर्याद वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात भाजपच्या सात कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. निवडणुकीचे रण तापू लागले असताना डाव्यांचा रक्तपात अधिक वाढेल, अशी शक्यता आहे. दुर्गमभागात काम करणारे कार्यकर्ते हे डाव्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ बनण्याची भीती आहे. केंद्र सरकारने सीआरपीएफच्या कंपन्यांची कुमक राज्यात पाठवली आहे. आजमितीस ३०० कंपन्या राज्यात तैनात असल्याचे समजते. परंतु, राज्यात डाव्यांना धार्जिणे असलेले पोलीस आणि ‘त्रिपुरा रायफल्स’चे जवान ही मूळ समस्या आहे.
 
त्रिपुरात पोलिसांसह सर्व सरकारी कर्मचारी डाव्या पक्षांचे सभासद असतात. लाल सरकारच्या इशार्‍यावरून विरोधकांचा बंदोबस्त करण्याचे काम ते इमानेइतबारे करीत असतात. परंतु, सत्तेवर आल्यास सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करू, हे भाजपने दिलेले आश्वासन जादूच्या छडीसारखे काम करणार अशी चिन्हे आहेत. सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. त्यामुळे डाव्यांची ही हुकमी मते भाजपकडे वळण्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेश भाजपचे प्रभारी सुनील देवधर आणि अध्यक्ष विप्लब देव यांच्या फोनवर टीएसआरच्या जवानांचे, कर्मचार्‍यांचे सतत निनावी फोन येतात आणि यावेळी आपला पाठिंबा भाजपलाच आहे, अशी ग्वाही हे लोक देतात. मतदान केंद्राच्या आत कोणाला मत दिले जाते, हे पाहणारे डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदान केंद्राबाहेरील गर्दीला दमात घेणारे डाव्यांचे पोसलेले गुंड असे चित्र त्रिपुरात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत होते. असे काही व्हिडिओ युट्यूबवरही उपलब्ध आहेत. परंतु, दरवेळी बघ्याची भूमिका घेणारे किंवा डाव्यांचे हस्तक म्हणून वावरणारे पोलीस आणि टीएसआरचे जवान भाजपच्या बाजूला कलले आहेत. कारण, विकास झाला तरच स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षण आणि रोजगार मिळेल हे त्यांनाही कळून चुकले आहेत. दारिद्य्र रेषेखालील ६८ टक्के जनता, जेमतेम ३७ लाख लोकसंख्येपैकी बेरोजगार असलेले साडेसात लाख तरुण यावेळी डाव्यांना जाब विचारण्याच्या मनस्थितीत आहेत. ओपिनियन पोलची आकडेवारी तरी हेच सांगते आहे.
 
 
 
- दिनेश कानजी
 
@@AUTHORINFO_V1@@