प्रकाश आंबेडकरांचे जावईशोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |


 
 
 
 मिलिंद एकबोटेंना मोक्का लावला जाणार होता. मात्र, तत्कालीन सरकारला तसे करण्यापासून शरद पवारांनी रोखले, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. आता ही वस्तुस्थिती असेल तर मिलिंद एकबोटे किंवा शरद पवार यांच्या आधी संशयाचे मळभ प्रकाश आंबेडकरांभोवतीच निर्माण होते. २००१ ते २०१८ म्हणजेच जवळजवळ १७ वर्षे हे तथ्य प्रकाश आंबेडकरांनी का दडवून ठेवले?
 
 
भीमा-कोरेगावला न घडलेल्या गोष्टींचे भांडवल करून महाराष्ट्रात अराजक निर्माण केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा भाव माध्यमांमध्ये चांगलाच वधारला आहे. महाराष्ट्राला दलित सवर्ण दंगलींची पार्श्वभूमी होती. एका मोठ्या कालांतराने ही दरी बुजली होती. प्रकाश आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या परिस्थितीमुळे मने दुभंगण्याची ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. इतके करूनही प्रकाश आंबेडकर थांबायला तयार नाहीत. आता त्यांनी दररोज नवे आरोप करायला सुरुवात केली आहे. प्रकाश आंबेडकर कधीही प्रस्थापित दलित नेता म्हणून उदयास आले नाहीत. बाबासाहेबांचे नातू आणि अकोला लोकसभा मतदार संघाचे आजी-माजी खासदार अशी त्यांची ख्याती राहिली. भीमा-कोरेगावचा संघर्ष आणि त्याला दिला गेलेला जातीय रंग यावर आता ते तग धरून आहेत. वस्तुत: महाराष्ट्रातल्या दलित समाजाच्या राजकारणात त्यांच्या इतका बुद्धिमान व विषयांची जाण असलेला दुसरा नेता नाही. नियतीचा न्याय असा की, वारसा प्रकाश आंबेडकरांच्या वाट्याला आलेला असला तरी सत्तेचे सारे मार्ग मात्र रामदास आठवलेंकडे गेले. दलित नेता असण्याचे जे काही लाभ आठवलेंना मिळाले ते प्रकाश आंबेडकरांना कधीच मिळाले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांची धरसोड वृत्ती व निवडत असलेल्या विषयांबाबतची संदिग्धता. मागे एकदा प्रकाश आंबेडकरांनी जातीचा रकानाच काढून टाकण्याची सूचना केली होती. महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचे काही प्रमाणात स्वागतही झाले होते आणि चर्चाही घडून आली होती. मात्र, अशी सूचना करण्याच्या पलीकडे प्रकाश आंबेडकरांनी काहीच केले नाही.
 
 
पुढे काळ सरकला आणि तो विषयही मागे पडला. त्यांच्या राजकीय भूमिका या नेहमीच संभ्रमात टाकणा-या ठरल्या. त्यामुळे त्यांना सातत्याने त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते वा अनुयायी फारसे कुणीही सापडले नाहीत. भीमा-कोरेगाव दंगलींच्या मागे मोठे कारस्थान होते आणि त्यामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजीराव भिडे यांचा हात होता, असा आरोप त्यांनी ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेताना केला होता. पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर शरद पवारांच्या मागे लागले आहेत. पवार हे जातीय राजकारणातले कसलेले खेळाडू. जातीचे सगळे राजकारण करायचे आणि पुन्हा ‘सेक्युलर पुढारी’ म्हणून आपले नाणे चालवत राहायचे, हे पवारच करू शकतात. २००१ मध्ये सासवडला जी दंगल झाली, त्यात मिलिंद एकबोटेंना मोक्का लावला जाणार होता. मात्र, तत्कालीन सरकारला असे करण्यापासून शरद पवारांनी रोखले, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. आता ही वस्तुस्थिती असेल तर मिलिंद एकबोटे किंवा शरद पवार यांच्या आधी संशयाचे मळभ प्रकाश आंबेडकरांभोवतीच निर्माण होते. २००१ ते २०१८ म्हणजेच जवळजवळ १७ वर्षे हे तथ्य प्रकाश आंबेडकरांनी का दडवून ठेवले? आज ज्याला ते सनसनाटी सत्य म्हणून मांडत आहेत त्यावर यापूर्वीच भाष्य करण्याची गरज त्यांना का वाटली नाही? या प्रश्नाचे थेट उत्तर प्रकाश आंबेडकर कधीच देणार नाहीत. त्याचे कारण या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातल्या दलित नेतृत्वामध्ये दडले आहे. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या गोंधळाच्या राजकारणामुळे सत्तेची पदे मिळविली नाहीत. अन्य मंडळींनी मात्र ती बरोब्बर मिळविली. या तडजोडीच्या राजकारणाला आज दलित चळवळीतला युवा वर्गही मोठ्या प्रमाणावर कंटाळला आहे. आजच्या दलित नेत्यांच्या राजकीय पक्षांमध्ये त्यांना त्यांच्या राजकीय आशा आकांक्षांचे प्रतिबिंब मुळीच दिसत नाही. विशेषत: मायावतींनी उत्तर प्रदेशची सत्ता दोनदा काबीज केल्यानंतर दलित चळवळीचे उगमस्थान मानल्या जाणा-या महाराष्ट्रात तसे काहीच घडले नाही हे त्यांच्यासाठी अनाकलनीय आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच दलित नेत्यांनी आपापल्या सोईनुसार राजकीय सोयरिक जुळविली. ती मायावतींनीसुद्धा जुळविली होती. मात्र त्यामागून येणारे मिंधेपण त्यांनी मानले नाही. महाराष्ट्रात कधी, काँग्रेस कधी शरद पवार अशा मांडवाखालूनच दलित नेते फिरत राहिले. प्रारंभीच्या काळात जेव्हा प्रकाश आंबेडकर काँग्रेसविरोधी राजकारण करीत होते तेव्हा त्यांच्या स्वर्गीय प्रमोद महाजनांची त्यांच्याबरोबरची मैत्रीची चर्चा राजकीय वर्तुळात होत असे. मिळेल त्या संधीचा वापर करून राजकीय लाभ मिळवित राहण्याची महाराष्ट्रातल्या दलित राजकीय नेत्यांची वृत्ती महाराष्ट्रातल्या राजकीय दलित चळवळीला घातक ठरली.
 
मायावतींनी कधीही कुणालाही कायमस्वरूपी शत्रू मानले नाही. जातीच्या राजकारणातले त्यांचे प्रयोग ‘सोशल इंजिनिअरिंग’ म्हणून चर्चिले गेले. अधिकाधिक दलितांना सत्तेत सहभाग कसा मिळवून देता येईल, हे त्यांनी पाहिले. याउलट महाराष्ट्रातल्या दलित राजकारणाने सतत विद्वेषाचे राजकारण केले. मायावतींनी प्रसंगी भाजपशीही युती केली.
महाराष्ट्रात डावे आणि ढोंगी पुरोगामी मंडळींनी संघाच्या भीतीचा जो काही बागुलबुवा केला त्याला सर्वात जास्त बळी पडलेल्यांमध्ये दलित चळवळीतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हिंदुत्व चळवळीची खोटी प्रतिमा यांनी दलित समाजात यांनी उभी केली आणि दुहीचे राजकारण शिजत राहिले. त्याचा सर्वाधिक फटका चळवळीलाच बसला, कारण प्रस्थापितांनाच सत्तेचा लाभ पुन्हा पुन्हा मिळाल्याने नवे नेतृत्व उदयाला येऊच शकले नाही. आजही प्रकाश आंबेडकरांचा आरोप एका विशिष्ट जातीच्या मंडळींवरच आहे. त्यांचा संघद्वेष आणि हिंदुत्ववादी चळवळीविषयीचा आकस जाहीर आहे. वस्तुत: भीमा-कोरेगावला जे झाले त्याचा या हिंदुत्व विचारांनी कामकरणा-या कोणत्याही संघटनेशी काहीही संबंध नाही. संभाजी महाराजांच्या समाधीबाबत जे झाले तेही स्थानिक राजकारणच होते. शत्रू नसेल तर तो निर्माण करा. त्याविषयी खोटे बोलत राहा, लोक कधी ना कधी तुमच्यावर विश्वास ठेवतील. या हिटलरच्या शैलीप्रमाणे सध्या प्रकाश आंबेडकरांचे काम सुरू आहे.
 
 
डावे आणि बाबासाहेबांचे अनुयायी यांचा जो काही मिलाफ घडवून आणण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर गेली अनेक वर्षे करीत आहेत, हाही त्याच षड्‌यंत्राचा एक भाग आहे. यातून प्रकाश आंबेडकरांना काहीच मिळणार नाही मात्र राजकीय दलित चळवळीचे मोठे नुकसान होईल.
 
@@AUTHORINFO_V1@@