सब समाज को साथ लिये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018   
Total Views |
 

 
 
मुंबई ते कारवार परिसरात विस्तृत बहरलेला, सगळ्या कथागाथांना पुरून उरत समाजाने १०० वर्षांपूर्वी म्हणजे जुलै १९१७ साली मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळाची स्थापना केली. १०० वर्ष संस्थेने अनेक चढउतार पाहिले. संस्थेचा इतिहास म्हणजे त्या समाजाचा इतिहास, प्रकृती आणि भूमिकाच म्हणावा लागेल.
 
 
१९१७ साली सुरू झालेली ‘मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ’ संस्था समाजात घडणारे देशाबरोबर जगात घडणारे स्थित्यंतरे पाहत आता शतकोत्तराच्या उंबरठयावर आहे. पारतंत्र्यांच्या काळात, अगदी महायुद्धाच्या वातावरणातही संस्थेने ’एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ मंत्राची कास सोडली नाही.
 
१९ व्या शतकाच्या सुरवातीला मोखे गावचे कै. वासुदेव कोळंबकर उर्फ तिळ तांडेल उर्फ संत आणि त्यांचे सहकारी. कै. श्रीधर गावकर, कै.परशुराम मायबा, कै. दत्तात्रय चिंदरकर, कै. कृष्णाजी चोडणकर, कै. तुकाराम उर्णेकर वगैरे अशा सर्व विभूती एकत्र आल्या. त्यांनी मुंबई ते कारवार पट्टयात विसावलेल्या समाजाच्या शैक्षणिक साहाय्यासाठी मदत व्हावी यासाठी ‘मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ’ संस्था सुरू केली.
 
संस्थेच्या कामाचा व्याप वाढत होता. समाजाची स्वतःची जागा असावी. त्यावर वास्तू उभारावी. त्या वास्तूद्वारे समाजहिताचे उपक्रम राबवावे, असे स्वप्न समाजाचे होते. त्यासाठी संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत होती. शेवटी १९६५ साली संस्थेच्या इमारतीसंदर्भात काम करणारी समिती स्थापन केली होती. ही संस्था कार्यालयासाठी जागा मिळवणे, इमारत बांधणे याविषयीच्या सर्व बाबींचा तपशीलवार अभ्यास करत होती. प्रयत्न करत होती. १९७१ साली संस्थेने भांडूप पश्‍चिम येथे गाढवनाका येथे ’सबका साथ समाज का विकास’ भूमिकेतून समाजाच्या सहकार्याने जमीन खरेदी केली. स्वत:च्या जागेवर वास्तू उभारण्यासाठी संस्था कामाला लागली. इमारत समितीचा पुढाकार होताच. त्यातही तत्कालीन विश्‍वस्त कै. बापू जुवेकर यांचा सिंहाचा वाटा होता. इमारतीसाठी पहिले देणगी देणारे दानशूर होते स.रा. कुबल. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष होते दशरथ बटा.
 
संस्थेचा उल्लेख करताना दशरथ बटांचा उल्लेख होणे गरजेचेच आहे. १९२९ साली कोकणातून मुंबईत नशीब आजमाविण्यासाठी आलेले दशरथ. इतर अनेक चाकरमान्यांप्रमाणे वेळ मिळेल तेव्हा कोकणात घरी जायचे. गाव-शहर, शहर-गाव अशी परिक्रमा सुरूच असायची. एकदा एका व्यक्तीने त्यावेळच्या तरुण दशरथना एका गरीब गरजू विद्यार्थ्याबद्दल सांगितले. शैक्षणिक साहित्याअभावी, पैशाअभावी या विद्यार्थ्यांना मनात नसतानाही परिस्थितीला शरण जात शिक्षण सोडावे लागले, हे दृश्य तर गावात सगळीकडेच. दशरथ यांना हे नवीन नव्हते. पण आपली जितकी कुवत तितकी मदत करावी, या हेतूने मुंबईला परतल्यावर त्यांनी त्या गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले. मुंबईत अनेकांनी मदत केली आणि गावातल्या त्या हुशार गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे सुरूच राहिले. पुढे गावात त्या विद्यार्थ्याला भेटताना, त्याच्या डोळ्यातले समाधान, कृतज्ञता यामुळे दशरथ यांच्या आयुष्याला एक वेगळेच परिमाण लाभले. दशरथ म्हणतात, ’’मी काय केले होते? फक्त त्याची समस्या योग्य जागी मांडली होती आणि त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक आयुष्य वाचले होते.’’ त्यामुळे दशरथ कोणत्याही शैक्षणिक संदर्भातल्या मदतीबाबत पुढेच राहिले. ‘मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ’ हेही समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे होते. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मार्गदर्शन, विनामूल्य शैक्षणिक साहित्य वाटप यासाठी विद्यावर्धक मंडळ सातत्याने प्रयत्नशील असे. दशरथ बटा हे गावित समाजाचेच असल्याने समाजाच्या ‘मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळा’शी तसे जुळलेलेच. पूर्व उपनगरात शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत दशरथ बटा ‘मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळा’चे कामही जोमाने करू लागले.
 
संस्था १९१७ साली स्थापन झाली, मात्र संस्थेची जमीन खरेदी १९७१ साली झाली याचे कारण काय होते? कारण समाजात लोक खाऊन पिऊन सुखी होती. मनात दुसर्‍याच्या गरजेला उपयोगी पडण्याची जाणीवही होती. पण त्या मंडळाच्या उपक्रमाला मुद्दाम स्वतःहून पैसे काढणे किंवा पैसे गोळा करणे यासाठी समाजबांधव पाठीच होता. नेमकी हीच उणीव दशरथ बटांनी भरून काढली. दिवसभर कामाला गेलेले लोक कधी निवांत भेटतात तर रात्री घरी. ही गोष्ट लक्षात घेत ७० च्या दशकातले संस्थेचे अध्यक्ष दशरथ आपल्या सहकार्‍यांना घेऊन समाजबांधवांच्या घरी थडकायचे. नमस्कार चमत्काराचे सोपस्कार झाले की, ताकाला जाऊन भांडे न लपवता सरळ मुद्द्याला हात घालायचे. ’’समाज आपला आहे, संस्था आपली आहे, तुमचे आर्थिक सहकार्य हवे आहे. ते तुम्ही न सांगता करालच,’’ या शब्दांत दशरथ बोलत. त्यावेळी ज्याच्याकडे हा प्रस्ताव मांडला जाई त्याची ना बोलण्याची इच्छाच होत नसे. आपआपल्या यथासांग शक्तीने लोक वर्गणी द्यायचे. त्याची कायेदशीर पावती, हिशोबही वेळच्यावेळी मिळत असे. त्यामुळे आपले योगदान कायदेशीर आणि योग्य जागी होत आहे, याचा आनंद समाजबांधवांना मिळे. या सर्वामध्ये सेलटकर यांचेही योगदान खूप मोठे होते. संस्थेला आर्थिक योगदान मिळवून देण्यामध्ये सेलटकर नेहमी यशस्वी पुढाकार घेत. शेलटकरांची आठवण काढताना सध्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश बटा खूप भावूक झाले. पुढे सुरेश बापर्डेकर, शंकर पोसम, मालंडकर या त्रयींची संस्थात्मक आणि सामाजिक कामगिरी सांगताना गणेश म्हणाले, ’’या तिघांनीही संस्थेच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. संस्थेचे काम हे केवळ संस्थेचे न ठेवता त्यांनी त्या कामाला समाजाच्या उत्थानाचे काम केले आहे. आमचा समाजाला केंद्रामध्ये इतर मागासवर्गीय समाजामध्ये आरक्षण आहे तर राज्यात एसबीएसच्या अंतर्गत आरक्षण आहे. ही तफावत दूर करण्यासाठी हे तिघेही केंद्र सरकारशी वाटाघाटी करत आहेत. संस्थेचे समाजाशी नव्हे तर पूर्ण राज्याशी निगडित असलेले महत्त्वाचे कामही आहे. ते म्हणजे मुंबई ते कारवार गावित समाजाची वस्ती आहे. गावित म्हणजे समुद्राचे राजे. समुद्राशी संबंधित सगळ्याच बाबींशी गावित समाज जोडलेला. सध्या कोकण ते कारवार किनारपट्टीचा भाग हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. यामध्ये भूपुत्रांचा सहभाग अपेक्षित आहे. सागराच्या दृष्टीने पर्यटन स्थळ विकसित करणे म्हणजे सागरी लाटांवर हुकूमत करणारे मनोरंजनात्मक खेळ, पद्धती यायलाच हवे. पण आपल्या देशात सागरी तटासंदर्भातले शिक्षण हे कोचीन येथे दिले जाते. आपल्या संस्थेने यामध्ये आग्रही भूमिका घेतली आहे की, सागराशी संबंधित शिक्षण हे कोकण किनारपट्टीवर सुरू व्हावे. त्यासंबंधी काहीही अडचण असेल तर ‘मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ’ त्याकामी सरकारला सगळे सहकार्य करायला तयार आहे. इथपर्यंत तयारी आहे की प्रशिक्षण केंद्राला जागा नसेल तर संस्थेचे पदाधिकारी पोसम हे गावी असलेली स्वतःची जागा द्यायला तयार आहेत.
 
 
संस्थेच्या अन्य कामाची माहिती देताना संस्थेचे विश्‍वस्त गुरूदास चोपडे म्हणाले की, ‘‘संस्था होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तर देतेच पण वेळोवेळी समाजाचे एकत्रिकरणसुद्धा करते. संस्थेचा वाढदिवस, शिवजयंती, दिवाळी पहाट, कोजागिरी पौर्णिमा वगैरे सणांना समाज झाडून एकत्र येतो. संस्थेमार्फत वधूवर सूचक मंडळही चालवले जाते.’’ पुढे हाच धागा पकडत गणेश म्हणाले, ’’सध्या सर्वच समाजामध्ये लग्नासंबंधीच्या अनेक पारंपरिक बंधांनी वेगळे रूप धारण केले आहे. आम्ही वधुवर मंडळाद्वारे याबाबत जागृती आणण्याचा प्रयत्न केला की लग्न करताना वधूवरांनी एकमेकांच्या वैयक्तिक बाबीच न तपासता एकमेकांचे घरदार, कौटुंबिक पार्श्‍वभूमी यावर भर द्यावा. कारण होते काय की उच्चशिक्षित वधू किंवा वर आपल्या तोलामोलाचे स्थळ शोधतात, त्यामध्ये बहुतेकदा निराशाच पदरी येते. अशावेळी वधूवरांचे वैयक्तिक शिक्षण, नोकरी यावर जास्त भर न देता त्यांच्या इतर सकारात्मक बाबी पाहाव्यात. यामध्ये संस्थेला यशही मिळाले आहे. आम्ही पालकांसाठी आणि प्रत्यक्ष तरुण तरुणींसाठीही मार्गदर्शन शिबीर घेतो की, वयात लग्न करा. आजकाल मुलेमुली दोघेही उच्च शिक्षण घेऊन करिअर करण्याच्या मागे असतात. त्यामध्ये वयाची तिशी सहज उलटून जाते. आर्थिक स्थैर्य मिळाल्यावर ते लग्नाचा विचार करतात. वय उलटून गेल्यावर लग्न करणे हे सध्याच्या जगात स्वीकारार्ह असले तरीसुद्धा त्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. कारण योग्य वयात लग्न झाले तर पुढच्या सगळ्या जबाबदार्‍या योग्य पद्धतीने पूर्ण करता येतात. वधूवर मंडळ फक्त लग्न जुळवणे हे काम न करता भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या १६ संस्कारांपैकी एक असलेल्या विवाह संस्काराला योग्य ते परिमाण देण्याचा प्रयत्न करते.’’
 
गणेश बोलत होते. त्यांचे म्हणणे ऐकून वाटले, आधुनिकता आणि पारंपरिकता यामध्ये समन्वय साधण्यासाठी ‘मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ’ नक्कीच अग्रेसर आहे. या संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा मागोवा घेताना आढळले की, या संस्थेमध्ये असलेले बोपर्डीकर आणि गुरूदास चोपडेकर हे तर बाल स्वयंसेवक आणि आताही रा.स्व.संघ परिवारात त्यांच्यावर जबाबदारी आहेत. दोघांचेही म्हणणे की संघाचे आणि समाजाचे काम वेगळे नाही. संघाचे काम म्हणजेच समाजाचे काम आणि समाजाचे काम म्हणजेच संघाचे काम. यावर गणेश बटा म्हणाले की, ‘‘होय, मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळातर्फे आम्ही केवळ सामाजिक कार्य करत असलो तरी त्याचा उद्देश आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि देशाचा विकास व्हावा हेच आहे.’’ पुढे बोलता बोलता गणेश यांनी संस्थेच्या शतकमहोत्सी सांगता सोहळ्याची निमंत्रण पत्रिका दिली. त्यात कंसामध्ये क्षत्रिय मराठा, आरमारी मराठा, गोमांतक क्षत्रिय मराठा, गावित, दर्यावर्दी मराठा समाज असे लिहिलेले होते. कार्यक्रम तर गावित समाजाचा आणि या सर्व समाजाची नावे का बरं छापली? असे विचारल्यावर गणेश म्हणाले, ‘‘कारण गावित समाज ही कोणती जात नाही तर समान उद्योगधंदा करणार्‍या लोकांच्या समूहाला गावित गणले गेले. पत्रिकेवर लिहिलेले सर्व समाजबांधव गावितमध्ये येतात.’’ हे ऐकून मनात गोंधळ सुरू झाला. कारण आजपर्यंत असे ऐकले होते की जन्माने जात निर्माण होते पण इथे तर नवीन ऐकले की, समान कामामुळे विविध समाजाची एक जात तयार झाली. आपल्या विधानाला पुष्टी देण्यासाठी गणेश म्हणाले, ’’गोव्यात आमचे पूर्वज सारस्वत ब्राह्मण होते म्हणजे आजही आहेत. पुढे पोर्तुगिजांच्या राज्यात देवाधर्माची बाटाबाटी झाली. धर्म वाचविण्यासाठी आम्ही कोकण किनारपट्टीला आलो. तिथे पोटापाण्यासाठी दर्यासंबंधित कामे केली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी कोकण किनारपट्टीवर आरमार उभारले, त्यावेळी सर्व जातीचे लोक आरमारामध्ये सामील झाले. छत्रपतींच्या आदेशानुसार ते होडी, जहाजाच्या साहाय्याने स्वराज्याचे रक्षण करू लागले. त्यावेळी होडीला ’गाबरू’ म्हणत असत. गाबरू चालवणारे गाबरी त्याचा अपभ्रंश इंग्रजांनी गावित केला. तोच हा गावित समाज. या गावितांमध्ये कितीतरी समाजाचे लोक सामील आहेत. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेत या सर्व समाजाची नावे टाकली. कारण कागदोपत्री किंवा म्हणायला जरी आम्ही वेगवेगळ्या समाजाचे असलो तरी पूर्वजांचा व्यवसाय एकच होता, त्या व्यवसायानुसार आम्ही गावितच आहोत.’’ गोव्यात सारस्वत ब्राह्मण असलेले गणेश व्यवसायानुसार स्वतःची जात गावित सांगत होते. बरं, आता या जातीला सवलती मिळतात म्हणून नाही तर कित्येक पिढ्यांपूर्वीही त्यांचे पूर्वज गावितच जात सांगायचे.
 
जातीचा गुंता सोडविण्याचा कितीतरी थोरांनी प्रयत्न केला. त्याबाबत कितीतरी गाथा, आख्यायिका वाचल्या, ऐकल्या पण गावित समाजाचा इतिहास ऐकून वाटले की, जातीपातीचे राजकारण करत एकमेकांबद्दल द्वेषभाव बाळगणार्‍यांनी जरा विचार करावा की आपल्याच देशात एखाद्या शतका अगोदर एक जात उद्योेगावरूनच जन्माला आली. विशेष म्हणजे या जातीमध्ये पोटजाती वगैरे काही नाही आहेत. आहेत त्या चक्क वेेगवेगळ्या जाती. या सर्व जाती गुण्यागोविंदाने ‘मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळा’च्या छत्राखाली समाजाचे एकत्रिकरणही करत आहेत. असो, विषयांतर झाले असे वाटेल, पण मुद्दा हाच आहे की ‘मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळा’ समोर अनेक आवाहने आली, कित्येक दशकं मंडळ जैसे थे परिस्थितीत राहिले, पण या मंडळाने कासवगतीने का होईना आपले काम सुरू ठेवले. आज या संस्थेमध्ये समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे तरुण तनमनधनाने एकवटलेले आहेत. संस्थेचा आर्थिक व्यवहार कसे होत असतील?
 
यावर गणेश म्हणाले, ’’संस्थेची सभासद वर्गणी असते, समाजात आणि समाजाबाहेरही दानशूर व्यक्ती आहेत. त्या सहकार्य करतात. आम्ही स्मरणिका काढतो. तसेच संस्थेची वास्तू आहे. त्यातूनही काही आर्थिक उत्पन्न संस्थेला मिळते. पण एक मात्र खरे की कितीही अडचण आली, आमच्या संस्थेचे काम थोडा वेळ थांबले पण त्याला पूर्णविराम मिळाला नाही. गावाहून मुंबईत शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था नसते. त्यासाठी भविष्यात आम्हाला संस्थेच्या भांडूप येथील वास्तूत गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार करायचे आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत.
  
संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्‍वस्त निःस्वार्थीपणे संस्थेच्या उद्दिष्टांसाठी काम करत आहेत. या संस्थेचे आणि समाजाचेही भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.
 
 
 
- योगिता साळवी 
 
@@AUTHORINFO_V1@@