इथे गरज दबावगटाची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2018
Total Views |
 
 
 
कल्याण-डोंबिवली शहरात पसरलेली अव्यवस्था, वाहतूक कोंडी, अस्वच्छता यामुळे शहराला लागलेला नकारात्मकतेचा बट्टा दिवसेंदिवस आणखी अधोरेखित होत आहे. वास्तविक पाहाता आज या दोन्ही शहरांची व्याप्ती इतकी वाढली आहे की, दोन्ही शहरांचा कारभार एकत्रितरित्या कार्यक्षमपणे चालवता येईल, अशी कार्यप्रणाली कुचकामी ठरत आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून या दोन्ही शहरांनी आता रितसर काडीमोड घेत आपापला स्वतंत्र पालिकेचा कारभार थाटावा. विकास नेमका कोठे अडला आहे, हे तरी सामान्य नागरिकांना कळेल. एक ना अनेक कारणांनी करदाता कल्याण-डोंबिवलीकर फक्त ग्रासला आहे.
 
निमूटपणे निवडणुका आल्यानंतर मत देणार्‍या सोशिक नागरिकांनी दबावगट तयार करून आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याची आणि त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मूलभूत हक्कांसाठी व्यवस्थेविरुद्ध वेळप्रसंगी आंदोलन करण्याची आता गरज आहे. डोंबिवलीत अशाप्रकारे नागरिकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न काही वर्षांपूर्वी झालाही होता, जो अराजकीय आणि केवळ मूलभूत गरजा आणि शहराच्या विकासासाठी निरलसपणे करण्यात आलेला एक प्रयत्न होता. पण, या शहरातील राजकीय व्यवस्था इतकी उदासीन आणि अकार्यक्षम आहे की, या प्रयत्नांना पुरेसे पाठबळ तर सोडाच, पण भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध अशी नागरिकांची चळवळही डोंबिवलीत नीट तग धरू शकली नाही. या शहरांतील नगरसेवक बस स्टॉप, मोफत वृत्तपत्र वाचनालय, पेव्हर ब्लॉक बसवणे याखेरीज चौकात म्युरल उभारणे अशी कामे करून ‘कार्यसम्राट’ झाले आहेत, पण मुळात नागरिकांना काय हवे आहे, याचा विचार फार कमी ठिकाणी झालेला दिसतो. त्यामुळे मूलभूत हक्कांसाठी तरी कल्याण-डोंबिवलीकरांनी विविध दबाव गट तयार करून अकार्यक्षम व्यवस्थेला ताळ्यावर आणण्याची गरज आहे.
 
वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढावे लागेल, पण डोंबिवलीचा नावलौकिक कायम ठेवायचा असेल तर याचा विचार प्रत्येक डोंबिवलीकरांनी आणि ऐतिहासिक वारसा जपणार्‍या कल्याणकरांनी करणे गरजेचे आहे. शहरात आज अशा अनेक संस्था फार चांगले कार्य करत आहेत. त्यांना पाठबळ देऊन त्यांच्या कार्यात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची गरज आहे. जेणेकरून नवे प्रकल्प वाढीस लागतील. त्यातून भविष्यातील डोंबिवलीकरांना याचा फायदा होईल. यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू करण्याची गरज आहे.
 
 
 
- तन्मय टिल्लू 
@@AUTHORINFO_V1@@