बालरंगभूमीची शिल्पकार काळाच्या पडद्याआड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2018
Total Views |
 

 
ज्येष्ठ अभिनेत्री, रंगकर्मी, नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्या ८५ वर्षे वयाच्या होत्या. केवळ बालनाट्याला वाहिलेली अशी ’बालरंगभूमी - लिटिल थिएटर’ची स्थापना त्यांनी १९५९ साली केली. त्या संस्थेतर्फे पहिले नाटक रत्नाकर मतकरी यांच्याकडून लिहून घेतले होते. ते होते ’मधुमंजिरी.’ त्यामध्ये त्यांनी चेटकिणीची भूमिका अप्रतिम सादर केली होती. ती भूमिका खूप गाजली. आज सुधाताई नसल्या तरी त्यांचे बालरंगभूमीतील योगदान कधीही विस्मरणात जाणार नाही. पल्लेदार संवाद, अभिनय कौशल्य यामुळे त्यांनी आपला वेगळा ठसा बालरंगभूमी आणि मराठी नाट्यव्यवसायात उमटवला होता.
 
सुधा करमरकर यांचा जन्म १८ मे १९३४ साली मुंबईत झाला. त्यांचे वडील तात्या आमोणकर हे गिरगाव, मुंबईतील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. तात्यांनी सुधाताईंना लहानपणीच गायन आणि नाट्य शिक्षणाचे धडे घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे घरातूनच नाट्यसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले होते. त्याकाळी पार्श्वनाथ आळतेकर यांच्या कला अकादमीमध्ये त्यांनी नाट्यकलेचे संपूर्ण शिक्षणही घेतले, तर पार्वतीकुमार यांनी त्यांना नृत्याच्या तालावर थिरकायला शिकविले. सुधाताईंनी भरतनाट्यममध्येही प्राविण्य मिळवले. वयाच्या अठराव्या वर्षी त्या भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात प्रवीण झाल्या. त्याचवेळी त्यांना मो. ग. रांगणेकरांच्या ’रंभा’ या नाटकात नृत्यकुशल नायिकेची, रंभेचीच भूमिका मिळाली आणि त्यांची ती भूमिकाही सर्वार्थाने गाजली. साहित्य संघाच्या नाटकात छोट्या-मोठ्या भूमिका सुधाताईंनी लीलया साकारल्या. त्यावेळी नटवर्य केशवराव दाते, नानासाहेब फाटक, दुर्गाबाई खोटे, मा. दत्ताराम अशा अनेक नामवंत कलाकारांबरोबर काम करण्याची नामी संधी त्यांना लाभली. या सगळ्या ज्येष्ठ रंगकर्मींकडून नाट्यकलेचे मोलाचे लाभलेले मार्गदर्शन सुधाताईंना रंगमंचावर पदोपदी पथदर्शकच ठरले. भारतीय विद्या भवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत दामू केंकरे दिग्दर्शित ’उद्याचा संसार’ हे नाटक सादर केले गेले. त्या स्पर्धेत, सर्व नाटकांमधून निवड होऊन सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सुधा करमरकरांना मिळाले.
 
सुधाताईंनी अमेरिकेत जाऊन ’बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास केला. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली. तेथील बालरंगभूमीचा अभ्यास केला, तेथून मुंबईत परतल्यावर साहित्य संघाच्या सहकार्याने ‘बालरंगभूमी - लिटिल थिएटर’ची त्यांनी स्थापना केली. ’मधुमंजिरी’ हे पहिले नाटक सुधाताईंनी रत्नाकर मतकरी यांच्याकडून लिहून घेतले. स्वयंदिग्दर्शित केलेल्या त्या नाटकात त्यांनी केलेली चेटकिणीची भूमिका विशेष गाजली. १९५९ साली रंगमंचावर आलेल्या या पहिल्या बालनाट्याने रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाचीच मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांनी आपल्या ‘लिटिल थिएटर’ या संस्थेतर्फे ‘चिनी बदाम’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जादूचा वेल’, ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ अशा २५ नाटकांची निर्मिती करून ती सादर केली. यांतून मुलांची भरपूर करमणूक तर झालीच, पण मुलांचे नाटक कसे असावे, याचा धडा सुधाताईंनी संबंधितांना घालून दिला. याशिवाय त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर ’विकत घेतला न्याय’, ‘अनुराधा’, ‘तो राजहंस एक’, ‘कुंती’ , ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘गीता’, ‘कालचक्र’, ‘जाई’, ‘भाऊबंदकी’, ‘दुर्गाकाकू’ , ‘बेईमान’, ‘धनवंती’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘येसूबाई’, ‘रंभा’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘राणी लक्ष्मीबाई’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘सुमित्रा’, ‘मला काही सांगायचंय’, ‘यशोधरा’ अशा विविध भूमिका रंगविल्या.
 
तेव्हा, सुधाताईंनी जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या नाट्यकृतींच्या रुपाने त्यांच्या स्मृती चिरंतर राहतील.
 
 
 
- दीनानाथ घारपुरे 
 
@@AUTHORINFO_V1@@