काँग्रेसशी सोयरिक करण्यास मार्क्सवाद्यांचा नकार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Feb-2018
Total Views |
 

 
लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांना गती येऊ लागल्याचे दिसत आहे. राजस्थानमधील पोटनिवडणुकांचे निकाल पाहून तर काँग्रेससह सर्व विरोधकांना हर्षवायू होणेच बाकी राहिले आहे. आता मतभेद विसरून भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या दिशेने जुळवाजुळव सुरू झाली आहे.
 
भाजपमुळे देशाची घटना धोक्यात आली असल्याची आवई उठवून विरोधकांनी प्रजासत्ताकदिनी विविध ठिकाणी ’संविधान बचाव रॅली’चे आयोजन केले होते. मुंबईत या रॅलीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह डाव्या पक्षांचे नेते, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांच्यासह भाजपला पाण्यात पाहणारी मंडळी सामील झाली होती. या ’संविधान बचाव रॅली’ला किती आणि कसा प्रतिसाद मिळाला, हे सर्वविदित आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या एकाधिकारशाहीविरुद्ध संघर्ष करून घटनेचे रक्षण करण्यात तत्कालीन भारतीय जनसंघ आघाडीवर होता, याचे विस्मरण या रॅलीत सहभागी झालेल्यांना कसे काय झाले? की वेड पांघरून ही सर्व मंडळी पेडगावला गेली होती, हे काही समजत नाही. आता २०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून दूर सारायचेच, अशा निर्धाराने विरोधक कामाला लागले आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव आदींसह सर्व लिंबू टिंबू पक्षांनी त्या दिशेने प्रयत्न चालू केले आहेत. आपण एकत्रित लढलो तर भाजप औषधालाही उरणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. येथे एकत्रित येऊन लढणे हे शब्द महत्त्वाचे आहेत. केवळ भाजपला विरोधासाठी विरोध करण्यासाठी केलेली तत्त्वहीन युती कशी आणि किती टिकणार? पण, तरीही विरोधकांचे प्रयत्न चालू आहेत. पण, ही आवळ्याभोपळ्याची मोट बांधली जाण्याआधीच मोटेला भोके पडू लागली असल्याचे दिसून येऊ लागले आहे. विरोधी पक्षातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेससमवेत जाण्यास नकारघंटा वाजविली आहे. या पक्षाच्या केंद्रीय समितीची नुकतीच कोलकाता येथे बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेससमवेत जाण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, सीताराम येचुरी यांचा हा प्रस्ताव ५५ विरुद्ध ३१ मतांनी फेटाळून लावण्यात आला. येथेच पहिली माशी शिंकली आणि विरोधकांचे ऐक्य एवढे सहजसाध्य नाही, हे लक्षात आले.
 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दोन गट आहेत. (पण पक्षास ते मान्य नाही.) एक पश्चिम बंगालमधील आणि दुसरा केरळमधील मार्क्सवाद्यांचा. प. बंगालमधील मार्क्सवाद्यांना काँग्रेससमवेत जावे, असे वाटते. पण, प्रकाश करात यांच्या प्रभावाखालील केरळच्या मार्क्सवाद्यांना काँग्रेसशी युती करणे अमान्य आहे. त्यातूनच पक्षात महत्त्वाचे स्थान असलेल्या येचुरी यांनी मांडलेला प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. प्रस्ताव अमान्य झाल्याचे लक्षात घेऊन सीताराम येचुरी यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली, पण त्यांनी राजीनामा देऊ नये, असे त्यांना सांगण्यात आले. या निमित्ताने मार्क्सवादी पक्षात सीताराम येचुरी आणि प्रकाश करात यांच्यात मतभेद असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. ’‘आमच्यात झालेले मतभेद म्हणजे पक्षात अंतर्गत लोकशाही असल्याचेच द्योतक आहे,’’ अशी सारवासारव पक्षाच्या नेत्यांना करावी लागली. आता या पक्षाचे एप्रिल महिन्यात हैदराबाद येथे अधिवेशन होणार आहे. त्यावेळी काँग्रेससमवेत जायचे की नाही यावर अधिक खल होईल.
 
कोलकाता येथील बैठकीत येचुरी यांचा ठराव फेटाळला गेल्यावर सोमनाथ चॅटर्जी यांच्यासारख्या माजी ज्येष्ठ नेत्यांना, पक्षाने या आधी केलेल्या ऐतिहासिक घोडचुकांचे स्मरण झाले. प. बंगालचे नेते ज्योती बसू यांना पंतप्रधान होण्याची संधी होती, पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यास विरोध केल्याने ही संधी हुकली. संधी हातची गेल्यानंतर ऐतिहासिक घोडचूक झाल्याचे लक्षात आले, पण वेळ निघून गेली होती. अशीच घोडचूक मार्क्सवादी पक्षाने संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन केली होती. तसे त्यावेळी करायला नको होते, असे काही नेत्यांना वाटत होते. पण, नंतर पश्चात्ताप करून काय उपयोग?
 
काँग्रेससमवेत जाण्यास पक्षाच्या केंद्रीय समितीने विरोध केला असला तरी हैदराबाद येथील अधिवेशनात बहुतांश सदस्यांना आपल्या बाजूने वळविण्यात यश येईल, अशी आशा येचुरी यांना वाटत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अस्तित्व आता प. बंगाल, त्रिपुरा आणि केरळपुरतेच मर्यादित आहे. प. बंगालमधील त्या पक्षाच्या प्रदीर्घ राजवटीस तृणमूल काँग्रेसने जबर धक्का दिला आणि त्या पक्षाच्या हातून सत्ता खेचून घेतली. आता केरळमध्ये आणि त्रिपुरामध्ये तो पक्ष सत्तेवर आहे. त्रिपुरामधील माणिक सरकार यांच्या सरकारपुढे, काही दिवसांतच होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आव्हान उभे केले आहे. भाजपने प्रचाराचा जोरदार धुमधडाका उडवून दिला असल्याने माणिकबाबू काळजीत पडले आहेत. सीताराम येचुरी आणि प्रकाश करात यांच्यातील मतभेदातून येचुरी पदत्याग करण्यास निघाले होते. पण, त्रिपुरातील निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून तसे करण्यापासून त्यांना रोखण्यात आले.
 
एकेकाळी मार्क्सवादी पक्षात मोठे स्थान असलेले आणि पक्षाचा आदेश न पाळल्याने पक्षातून हकालपट्टी झालेले सोमनाथ चॅटर्जी यांनी काँग्रेससमवेत न गेल्यास त्याचा फायदा भाजपला होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. आधीच पक्ष दोन राज्यांपुरता मर्यादित, संसदेतही प्रभावी संख्याबळ नाही, हे सर्व लक्षात घेऊन काँग्रेससमवेत जाण्यातच हित आहे, असे काही मार्क्सवादी नेत्यांना वाटत आहे. पण, तत्त्वनिष्ठ प्रकाश करात गटास तसे वाटत नाही. सीताराम येचुरी यांनी कोलकाता येथील केंद्रीय समितीच्या आणि पॉलिट ब्युरोच्या अशा दोन्ही बैठकांमध्ये राजीनामा द्यायची तयारी दर्शविली होती, पण ती अमान्य करण्यात आली. आता या महाभारताचे कुरुक्षेत्र हैदराबाद येथे होणारी पार्टी काँग्रेस असेल, असे सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे. तेथे प्रकाश करात गट कुरघोडी करतो का सीताराम येचुरी गट?, हे दिसून येणार आहे. कोलकाता येथील बैठकीत काँग्रेससमवेत जाण्यास साम्यवाद्यांनी दिलेला नकार पाहून काँग्रेस गोटात अस्वस्थता पसरली आहे. मार्क्सवादी पक्षाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश करात यांना केले आहे. विरोधकांची आघाडी होण्याआधीच झालेला अपशकुन लक्षात घेता पुढे काय होऊ शकते, हे आताच लक्षात येऊ लागले आहे.
 
विरोधकांची आघाडी होणार की कडबोळे होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. विरोधकांमधील ममता बॅनर्जी, शरद पवार, राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती अशा सर्वांना आताच पंतप्रधानपदाची स्वप्ने पडण्यास सुरुवात झाली आहे. काही निवडणूक निकाल पाहून, भाजपची घसरण सुरू झाली असल्याच्या स्वप्नरंजनात ही मंडळी आहेत. विरोधकांच्या बैठका झडू लागल्या आहेत, पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नमनालाच नाट लावला आहे. दुसरीकडे, भाजपही आतापर्यंतच्या अनुभवातून योग्य तो बोध घेऊन विरोधकांचे मनसुबे पूर्णपणे धुळीस मिळविण्याच्या दृष्टीने कामाला लागणार हे सांगण्यासाठी कोणा राजकीय अभ्यासकाची आवश्यकता नाही!
 
 
- दत्ता पंचवाघ

 
 
@@AUTHORINFO_V1@@