कांद्यावरील निर्यातमूल्य हटविल्याने भावातील घसरण थांबली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2018
Total Views |

शेतकर्‍यांमध्ये समाधान

 
 
 
 
नाशिक : गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असताना कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटविल्याने लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला २००१ रुपये भाव मिळाला. शुक्रवारच्या निर्यातमूल्य शून्यावर आणण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वेगाने कोसळत असलेल्या कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली असून शेतकर्‍यांमधे समाधान व्यक्त होत आहे.
 
कांद्याला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांना कधी नव्हे तो आर्थिक फायदा होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच विंचूर उपबाजार आवारात ३७०० चा उच्चांक गाठलेल्या कांद्याचे दर गेल्या आठवड्यापासून झपाट्याने खाली येत होते. कांदा निम्म्या दरावर आल्याने या काळात देशांतर्गत बाजारात मोठी घसरण पाहावयास मिळाली. त्यामुळे निर्यातमूल्य हटविण्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र काल कांदा निर्यातमूल्य तडकाफडकी पूर्णतः हटविण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केल्याने शनिवारी येथील उपबाजार आवारात आवक वाढून कांदा दरात ६०० रुपयांनी भाव वाढले. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे निर्यात खुली झाल्याने कांद्याचे दर स्थिर अथवा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी बाजारात कांदा विक्रीसाठी आणला होता.
 
केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य शून्य केले आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याचा दर २८०० ते २९०० रुपये होता. त्यानंतर हा दर घसरून, १४०० ते १५०० रुपयांवर आला होता. कांद्याची निर्यात आणखी वाढावी, या हेतूने केंद्र सरकारने हा शेतकरीहिताचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १९ जानेवारी रोजी देशांतर्गत बाजारपेठेतील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे मूल्य ८०० ऐवजी ७५० डॉलरपर्यंत कमी केले होते. स्थानिक बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात आल्यामुळे व आवक वाढल्यामुळे निर्यातमूल्य पूर्ण रद्द करण्याची घोषणा शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. त्यामुळे स्पर्धात्मक दराने निर्यात करणे शक्य होईल. वाणिज्य मंत्रालयाने २ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत नियमांमध्ये सुधारणा केल्याचे आणि पुढील सूचना जारी होईपर्यंत कांदा निर्यातमूल्य रद्द केल्याचे म्हटले आहे. भारतातील एकूण कांदा निर्यातीत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरित २० टक्क्यांमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो.लासलगावच्या कांदा बाजारामध्ये मागील सोमवारी तर सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला होता. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले.
 
@@AUTHORINFO_V1@@