अर्धशिशीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे : डॉ. तांडेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Feb-2018   
Total Views |
 


 
भारतात कुठलीही डोकेदुखी ही साधारण डोकेदुखी आहे म्हणून त्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. यात अर्धशिशीसारखा गंभीर आजारही असतो. अर्धशिशीचा झटका आल्यावर रुग्ण काहीच काम करू शकत नाही. यामुळे रुग्णाचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. तेव्हा, या आजाराचे नेमके स्वरूप, त्याची लक्षणे आणि उपाय यासंबंधी न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुशील तांडेल यांनी ‘महा एमटीबी’च्या वाचकांसाठी केलेले हे वैद्यकीय मार्गदर्शन..
 
अर्धशिशी म्हणजे काय? त्याची साधारण लक्षणे आणि कारणे कोणती?
 
अर्धशिशी म्हणजे डोक्याच्या एका बाजूला घण मारल्यासारखा त्रास होणे. अर्धशिशीमध्ये डोक्याची एक बाजू कमालीची दुखते. हा त्रास एका बाजूपासून सुरू होऊन दुस-या बाजूलाही सरकतो. डोक्याची नस धडधडत असते. रुग्णाला उलटीसारखे होते. अशावेळी रुग्णाला प्रकाश आणि मोठा आवाज सहन होत नाही. म्हणून रुग्ण अंधारलेल्या खोलीत आणि शांततेत राहणे पसंत करतात. अर्धशिशीचे बहुतांशी कारण हे अनुवांशिक असते. घरातील कुणा व्यक्तीला हा आजार असेल, तर तो अनुवांशिक रूपाने पुढच्या पिढीला होऊ शकतो. ताणतणाव हेदेखील अर्धशिशीचे कारण असू शकते. जास्त तणाव आल्याने अर्धशिशीसारखे आजार उद्भवू शकतात. उपाशी राहणे, वेळेवर आहार न घेणे, जागरण हीसुद्धा अर्धशिशीची कारणे आहेत. बरेचदा रुग्णाच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळेत बदल होतो. यामुळे रुग्णाला आम्लपित्ताचा त्रास संभवतो. हे पित्त उलटीद्वारे बाहेर पडल्यास रुग्णाला आराम मिळतो.
 
साधारण डोकेदुखी आणि अर्धशिशी यामध्ये नेमका फरक कसा ओळखावा?
 
साधारण डोकेदुखीची कारणे वेगळी असू शकतात. साधारण डोकेदुखी डोळ्यांमुळे होणा-या त्रासांमुळेदेखील होऊ शकते. जसे की, चष्म्याचा क्रमांक वाढणे. त्याचबरोबर सर्दी आणि तणाव हेही साधारण डोकेदुखीला कारणीभूत ठरतात पण, अर्धशिशीमुळे शक्यतो डोक्याचा एकच भाग दुखतो पण दुर्दैवाने, भारतात अर्धशिशीसारख्या आजाराकडे लोक फारशा गांभीर्याने पाहत नाही. तत्काळ स्वरूपाची उपाययोजना म्हणून डोकेदुखीवरच्या गोळ्यांचे सेवन आपल्याकडे करतात. त्यावर रुग्णाला आरामही मिळतो. पण, वारंवार डोकेदुखीने रुग्ण हैराण होतो. पाश्चिमात्य देशातील लोक याकडे अधिक गांभीर्याने पाहतात. डॉक्टरांचा सल्ला घेतात. आपल्याकडे साधारण डोकेदुखी आहे, असे समजून याकडे दुर्लक्ष केले जाते, जे गंभीर आहे.
 
अर्धशिशीचा त्रास एखाद्या विशिष्ट वयोगटात जाणवतो का? त्यातही पुरुषांना आणि महिलांना होणा-या त्रासात काही फरक असतो का?
तरुण वयात अर्धशिशी होण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच महिलांना अर्धशिशी होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. मासिक पाळीच्या वेळी महिलांना अर्धशिशीचा त्रास उद्भवतो. उपवास करणे हेही एक अर्धशिशीचे कारण असू शकते.
 
अर्धशिशीवरील उपचारांविषयी काय सांगाल?
Calcium channel blocker, Beta blocker. दोन प्रकारच्या गोळ्या यावर उपचार म्हणून घेता येतात. या गोळ्या सलग तीन महिने घेतल्या तर अर्धशिशीच्या झटक्यांचे प्रमाण कमी होते, तर दुस-या Triptan प्रकारची गोळी आहे रुग्णाला जेव्हा अर्धशिशीची लक्षणं दिसतात, तेव्हा ही गोळी घ्यावी. त्यामुळे हा अर्धशिशीचा झटका येत नाही. पण, या गोळ्या डॉक्टरांच्या उचित सल्ल्यानुसारच घ्याव्या. उपचारांमुळे अर्धशिशीचा त्रास कमी कमी होत जातो आणि थांबतोही. तणावाची भूमिका अर्धशिशीमध्ये महत्त्वाची ठरते. अर्धशिशीच्या ब-या झालेल्या रुग्णास तणावामुळे पुन्हा अर्धशिशी बळावू शकते. बरेचदा रुग्णास जिलेबी आणि दूध घेतल्यास आराम मिळतो. शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यानेही अर्धशिशीचा त्रास होऊ शकतो.
 
अर्धशिशीचा त्रास असणा-यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे?
योग्य आणि वेळोवेळी घेतलेला आहार, तणावमुक्त राहणे, पुरेशी झोप हे अर्धशिशीवरील मुख्य उपाय आहेत. काही लोकांना अर्धशिशीचा झटका आल्यानंतर उलटी होती. त्यानंतर त्यांना बरे वाटते. उलटीतून शरीरातील पित्त बाहेर पडते आणि रुग्णाला आराम मिळतो. व्यसन हेहीएक कारण आहे. सुप्तावस्थेत असलेला अर्धशिशी मद्यपान आणि धूम्रपानामुळे बाहेर येतो. म्हणून अर्धशिशीच्या रुग्णांनी अशा व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे.
 
 
 
- तुषार ओव्हाळ 
 
@@AUTHORINFO_V1@@