सह्याद्रीच्या खाचेतील 'तैलबैल '

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2018
Total Views |
 
 
 
माणसाचं जगणं हे आश्चर्यांनी भरलेलं असावं असं मला नेहमी वाटतं. एक कलाकार म्हणून तर मला हे प्रकर्षाने जाणवतं. सुदैवाने हातात कॅमेरा आला आणि जगण्याला नवा अर्थ मिळाला. सह्याद्री भटकंतीत दिसलेल्या अनेक आश्चर्यजनक गोष्टींना कॅमेरा मध्ये टिपता आलं. ही सगळी आश्चर्य 'आठवणी ' म्हणून कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेवता आली ते ह्या कॅमेरा मुळे . भटकण्यामुळे आपल्यात कमालीची जिज्ञासा तयार होते. ही जिज्ञासा आपल्याला 'आश्चर्यजनक ' गोष्टींपर्यंत पोचवते आणि मग सुरु होतो एक थरारक प्रवास. निसर्गाने खास लपवून ठेवलेली चमत्कारिक गोष्ट एकाकी आपल्यासमोर हजर होते. मेंदू चक्रावतो . काही क्षण समजत नाही कि नक्की आपण काय बघतोय. ज्यासाठी इतका आटा पिटा करून आपण इथवर पोचलो ती गोष्ट प्रत्यक्षात बघताना जो आनंद होतो तो केवळ अस्सल भटक्याच जाणू शकतो . माझ्या आजवरच्या भटकंतीत सह्याद्रीने मला अनेक आश्चर्यांशी दोस्ती करून दिली . कधी दुर्मिळ फूल दाखवून , कधी एखादा अजस्त्र सुळका दाखवून , कधी आकाशात संपूर्ण रंगछटा दाखवून, कधी बेलगाम नदी दाखवून , कधी तुफानी वारा दाखवून, कधी ताशीव कडे दाखवून, कधी हिंस्त्र प्राण्यांचं अस्तित्व दाखवून, कधी शिट्टी सारख्या आवाज काढणारा पक्षी दाखवून , कधी कानठळ्या बसवून कान बंद पडेपर्यंत विजांचा गडगडाट ऐकवून तर कधी घनदाट जंगलातून गूढ आवाज ऐकवून. अश्या आणि कितीतरी वेगवेगळ्या आश्चर्यांनी झालेली भटकंती आठवली कि अंगावर शहारा येतो. ह्याच अनुभवातून रोजच्या जगणात प्रचंड फायदा होतो आणि चारचोघांपेक्षा समाधानी आयुष्य जगण्यात फार मदत होते. अबोलपणे निसर्गाने दिलेली शिकवण हेच एक मोठं आश्चर्य आहे.
 
 

 
एकंदरीत आजचा विषय 'आश्चर्य ' आहे हे वाचकांना एव्हाना समजलं असेलच. ह्याचं कारण असं आहे कि आज आपण सह्याद्रीच्या अश्याच एका जबरदस्त आश्चर्याने भरलेली जागा बघणार आहोत. सुप्रसिद्ध लोणावळ्याजवळ असलेल्या 'तैलबैल ' च्या अजस्त्र नैसर्गिक खाच असलेल्या भिंतीबद्दल. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे "डाईक "; तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाची भिंत साधारणपणे १०१३ मीटर / ३३२२ फूट उंच असून उत्तर - दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर "V " आकाराची खाच आहे. भान हरपून जावं अशी हि खाच . यामुळे या भिंतीचे २ भाग झालेले आहेत. या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. फोटोग्राफीचा संसार घेऊन श्रावण महिन्यात तैलबैला गाठलं. रंगेबिरंगी फुलांनी आणि हिरवाईने नटलेल्या परिसरात भटकताना काय समाधान मिळत होतं सांगू. डोळा भरून पृथ्वीचं हे लोभस रूप बघितलं आणि पुढचा प्रवास चालू केला . गावातून भिंतीपर्यंत पोहोचायला साधारण अर्धा तास पुरतो. पुढे मात्र गिर्यारोहणाचं सामान असल्याखेरीज चढाई होऊ शकत नाही म्हणून मी भिंतीच्या अगदी जवळ जाऊन शूट करायचं ठरवलं. सह्याद्रीचा भव्य दिव्य आणि बेभान करून सोडणाऱ्या चमत्कारिक गोष्टीला मी याची देही याची डोळा अनुभवत होतो . कशी काय निर्माण झाली असेल हि खाच ह्या विचाराने भंडावून सोडलं होतं . लांबून अक्राळ विक्राळ वाटणारा सहयाद्री , जवळून मात्र फार प्रेमळ भासतो. प्रथमदर्शनी भिंत बघून काहीसा घाबरलेलो मी, तिच्या जवळ जाताच अगदी प्रेमात पडलो . एका क्षणात मला आपलंस करून घेतलं. हीच ताकद आहे सह्याद्रीची, नाही का ? म्हंटलं तर दगड, म्हंटलं तर माया. अश्या ह्या नितांत सुंदर अश्या तैलबैलाच्या भिंतीचा आनंद घेत, आश्चर्याचे सुखद धक्के पचवत, मनसोक्त फोटोग्राफी केली. लिखाण केलं. पुढच्या खेपेला भिंतीवर प्रस्तरारोहण करूनच यायचं असा निश्चय सुद्धा झाला आणि आल्या वाटे गावात परतलो. मावशींनी एव्हाना गरम गरम पिठलं भाकरी तयार करूनच ठेवली होती. त्यावर आडवा हाथ मारून अगदी समाधानाने झोपलो.
 

 
धन्य तो सह्याद्री! धन्य त्याची किमया !
भेटूया पुढच्या लेखात. भटकत राहा !
 
 
 
-अनिकेत कस्तुरे
 
@@AUTHORINFO_V1@@