सातवाहन साम्राज्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Feb-2018
Total Views |
 

इसवी सन पूर्व पहिल्या दशकात शकांचे साम्राज्य होते. शक हे मूळचे मंगोलियाचे. शकांचे साम्राज्य म्हणजे अक्षरशः जुलमी राजवट. शक साम्राज्य संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने सिमुक या सातवाहन राजाने स्वराज्याची स्थापना केली. पण, शकांचे साम्राज्य एवढे विस्तारलेले होते की, सातवाहनांच्या २० पिढ्या शकांना नेस्तनाबूत करण्यात कामी आल्या. ’सातवाहन’ हा भारताचा प्राचीन राजवंश होता. त्यांनी इ. स. पूर्व २३० पासून तिसर्‍या शताब्दीपर्यंत दक्षिण भारतावर राज्य केले. पुराणातील काही संदर्भांनुसार, दक्षिण क्षेत्रात साम्राज्याची स्थापना करणारा हा पहिला वंश होता. भारतीय इतिहासात हा वंश ’आंध्र वंश’ नावाने विख्यात आहे. सातवाहन वंशाच्या राजांनी विदेशी आक्रमणकर्त्यांबरोबर संघर्ष करून त्यांना कधीच स्थिरावू दिले नाही. सातवाहनांच्या शासनकाळाबाबत विभिन्न पुराणांनुसार मतमतांतरे आढळतात. ’मत्स्यपुराणा’नुसार सातवाहनांनी ४६० वर्षे राज्य केले, तर ’ब्राह्मणपुराणा’नुसार त्यांनी ४५६ वर्ष सत्ता उपभोगली. मात्र, वायुपुराण सातवाहनांची ४११ वर्षांची सत्ता दर्शविते, तर ’विष्णुपुराणा’नुसार सातवाहनांचा सत्ताकाळ केवळ ३०० वर्षे असल्याचा दाखला देते. वर्तमानातील कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या भागात सातवाहनांची सत्ता होती.
मौर्य वंशाच्या पतनानंतर सातवाहन साम्राज्य शक्तिशाली झाले. सम्राट अशोकाच्या काळात सातवाहन त्याचे मांडलिक होते. त्याच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर इ. स. पू. २२५-२३० पर्यंत सातवाहनांनी महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्रीय भाषा ही सातवाहनांची राजभाषा होती. (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरित झाली) सत्कारणी याने त्याच्या काळात सुरू केलेला ’शालिवाहन शक’आजही सुरू आहे. पुराणात सातवाहनांना ’आंध्र’ असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते, असाही उल्लेख पुराणात आढळतो. आंध्र म्हणजे ‘ऐतरेय ब्राह्मण’ व महाभारतात ज्यांचा उल्लेख ’औंड्र’ असा आला आहे त्या वंशाचे. मूळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्राना ’असूर राजा महाबळीचा पुत्र’ असे उल्लेखलेले आहे. पुरातन काळापासून हा समाज दक्षिणेत वास्तव्य करून होता. ओडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही ’औंड्र’ वरूनच पडली.
 
बौद्ध व जैन संस्कृतीच्या कालखंडानंतर पैठण (जुने नाव प्रतिष्ठान) मध्ये सातवाहनांचे राज्य स्थापन झाले. त्यांच्या काळात पैठणचा सर्वाधिक विकास झाला. सातवाहन राजे कला व विद्येचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची सुरू झालेली परंपरा ही वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकली.
 
सिमुक हा सातवाहनांचा संस्थापक होता. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून शुंगाची सत्ता संपुष्टात आणली व सातवाहनांचे राज्य स्थापित केले. अमरावतीजवळ असलेल्या गुंटूर जिल्ह्यात धरणीकोटा हे त्यांचे सुरुवातीचे राजधानीचे शहर होते. मात्र, कालांतराने औरंगाबाद येथील प्रतिष्ठान (आताचे पैठण) हे राजधानीचे शहर बनले. नाणेघाट येथील लेण्यांमध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुकने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून ’दक्षिणापथपति’ ही पदवी धारण केली होती. त्याने तांब्यापासून बनविलेली नाणी प्रचलित केली. सिमुक याला ‘शिशुक,’ ‘सिन्धुक,’ ‘शिप्रक’ या नावांनीही संबोधले जात असे. सिमुकने आपल्या काळात अनेक जैन, बौद्ध मंदिरे बांधली.
 
सिमुकनंतर त्याचा छोटा भाऊ कान्हा (कृष्ण) राजा बनला. त्याने १८ वर्षांच्या कार्यकाळात साम्राज्यविस्तार केला. नाशिक शिलालेखात आढळते की, त्याच्या कार्यकाळात सातवाहनांचे साम्राज्य नाशिकपर्यंत पसरले होते. कान्हानंतर सत्करणी प्रथम हा गादीवर आला. सातवाहनांचा संस्थापक सिमुकचा हा मुलगा. नाणेघाट शिलालेखानुसार त्याने आपल्या साम्राज्याचा खूप विस्तार केला. हा सातवाहन वंशाचा सर्वश्रेष्ठ शासक मानला जातो. ’अप्रतिहतचक्र’ ही उपाधी याच्या नावापुढे लावली जात असे. सातवाहन शासकांमध्ये प्रिय आणि प्रचलित असलेले सत्करणी हे नाव धारण करणारा हा प्रथम सम्राट. सत्करणी प्रथमच्या मृत्यूनंतर त्याची दोन अल्पवयीन मुले वेदश्री, सतश्री सिंहासनावर बसले, परंतु अल्पवयीन असल्याने प्रशासन त्यांची आई नयनिका हिच्या हाती आले. तिने आपल्या वडिलांच्या मदतीने शासनाचा कारभार सुरू ठेवला होता. कालांतराने सतश्री याने राज्यकारभार आपल्या हाती घेतला. गौतमीपुत्र सत्करणी या सातवाहन साम्राज्याचा २३वा शासक. याच्या काळात सातवाहनांनी अनेक पराक्रम गाजवले, तसेच आपला साम्राज्यविस्तार केला. सत्करणी याने सौराष्ट्र, बेरार, मालवा, कोकण ही राज्ये आपल्या साम्राज्याला जोडली. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन करताना असे म्हटले जाते की, ’त्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी पीत असत.’ आपल्या कार्यकाळात त्याने दोन अश्वमेध व एक राजसूय यज्ञ केले. याच्या कारकिर्दीत मध्य भारत सातवाहनांच्या अधिपत्त्याखाली असल्याचे आढळते. तो वैदिक धर्माचा पोषक असून अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीतही त्याचे धोरण उदार होते. त्याने बौद्धांच्या तत्कालीन संघांना बरीच मदत केली होती. सध्या मुंबई येथील कार्ले नावाच्या बौद्ध संघाला त्याने त्यावेळी करजक नावाचे गाव दान केले होते. त्याने आपल्या कालखंडात अनेक नाणी पाडली. त्यातील बर्‍याचशा नाण्यांवर सत्करणीचा चेहरा मुद्रित केलेला आढळतो. त्याने जवळपास २० वर्षे शकांबरोबर संघर्ष केला. अखेर नाशिकमधील गोवर्धनजवळ त्याने शक राजा नहपान याच्याशी युद्ध करून त्याला पराजित केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे युद्ध होते. या युद्धानंतर सातवाहनांचा उत्कर्ष सुरू झाला. शक राज्यकर्ता नहपानच्या पराभवानंतर सत्करणीने त्याचे सर्व शिक्के ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्याचे मुद्रण केले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर ही शकांची राजधानी तसेच प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्यावर सातवाहनांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले स्वकीय साम्राज्य होते. कल्याण, सोपारा (नालासोपारा), भोगवर्धन (भोकरदन), तगेर (तेर), करहाटत (कर्‍हाड), नेवासा ही शहरे सातवाहनांच्या काळात समृद्ध झाली. या शहरांतील उत्खननातून सातवाहनांचा इतिहास जगासमोर आला. तत्कालीन राजांची नाणी उत्खननादरम्यान आढळली. सातवाहनांची प्रमुख भाषा प्राकृत होती. सातवाहन राजकुमारांना ’कुमार’ असे संबोधिले जात असे. सरकारी खजिन्याचे प्रमुख स्त्रोत हे भूमिकर, मिठावरील कर तसेच न्यायशुल्क हे होते. सातवाहनांचे महारथी, महासेनापती, महाभोज असे तीन प्रकारचे सामंत असत. व्यापार्‍यांना ’नैगम’ म्हटले जात असे. व्यापारी समूहाच्या प्रमुखाला ’सार्थवाह’ संबोधले जात असे. सातवाहनांच्या काळात बौद्ध मंदिरे आणि बौद्ध भिक्षुकांच्या निवासस्थानांची बर्‍याच प्रमाणात बांधणी झाली. ब्राह्मणांना भूमिदान अथवा जहागिरी देण्याची प्रथा सर्वप्रथम सातवाहनांनी सुरू केली. यांच्याच काळात अंजिठा-वेरूळची बौद्ध लेणी कोरली गेली. सातवाहनांनी सह्याद्री पर्वत परिसरात अनेक किल्ल्यांची निर्मिती केली, घाट बांधले. सातवाहनकालीन गुंफा पुणे जिल्ह्यातील कार्ले, कान्हेरी, भाजे येथे आढळून आली आहेत. सातवाहनांची नगररचना सर्व सोईंनी युक्त अशी होती. विविध नमुन्यांच्या पक्क्या भाजलेल्या विटा, छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार योजना, कोरीव नक्षीकाम अशी सुसज्ज अशी नगररचना यांच्या काळात विकसित होती.
 
सातवाहनांचे एकूण ३० शासक झाले. ते हिंदू धर्माचे अनुयायी होते. त्यांनी बौद्ध आणि जैन विहारांना बर्‍याच प्रमाणात साहाय्य केले. सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. त्याच्या तोंडाशी लेणे खोदून सातवाहनांनी आपल्या पराक्रमाची नोंद करून ठेवली आहे. द्वितीय शताब्दीच्या अंती सातवाहनांचे पश्चिमेत काठियावाड, कृष्णाखोरे आणि दक्षिण पूर्वेत तामिळनाडू येथे राज्य प्रस्थापित होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट, अमरावती, महाराष्ट्रातील जुन्नर, पैठण (प्रतिष्ठान) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. त्यापैकी पैठण हे राजधानीचे शहर होते. नाशिक येथील पांडवलेणी या बौद्ध लेण्यांच्या कोरीव कामात, ’’सातवाहनांनी दान दिले,’’ असा उल्लेख आढळतो. सातवाहनांचा काळ हे महाराष्ट्रासाठी सुवर्णयुग ठरल्याने इतिहाससंशोधक सातवाहनांना ’महाराष्ट्राचे राजे’ मानतात. तिसर्‍या शताब्दीत त्यांची शक्ती क्रमशः क्षीण होऊ लागली आणि त्यांचे स्थानीय शासक स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करू लागले. दरम्यान इक्ष्वांकू, पल्लव, कलिंग, वाकाटक या छोट्या संस्थानांनी आंध्रमधील छोटे छोटे प्रदेश बळकावून आपल्या साम्राज्यात विलीन केले. पूर्वेला चालुक्य साम्राज्य अस्तित्वात येईपर्यंत ही स्थिती कायम होती. तोपर्यंत सातवाहन साम्राज्य संपुष्टात आले होते.
 
 
 
- रश्मी मर्चंडे 
 
@@AUTHORINFO_V1@@