'त्या' वास्तू हिंदूना परत करा : शिया वक्फ बोर्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
मुघल आक्रमण काळात व त्याही पूर्वी ज्या मुस्लिम शासकांनी भारतातील मंदिरे तोडून त्या जागी मशिदी बांधल्या होत्या अशा सर्व मशिदी हिंदूंना परत करण्यात याव्यात असा सल्ला शिया वक्फ बोर्डाने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला दिला आहे. शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी एका पत्राद्वारे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला याविषयी विनंती केली आहे. त्यामुळे आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
मुघल आक्रमणाच्या काळात असलेल्या सर्व सुलतानांनी अनेक मंदिरांचा विध्वंस केला व त्याच जागांवर मशिदी बांधल्या हा इतिहास सर्वविदित आहेच, मात्र अशा जागी बांधलेल्या मशिदीमध्ये शरियाच्या नियमाप्रमाणे प्रार्थना केली जात नाही असे रिझवी यांनी या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अशा सर्वच जागा हिंदूंना परत करून इस्लामची शिकवण जगास दाखवून द्यावी असा सल्ला रिझवी यांनी आपल्या पत्रातून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला दिला आहे.
 
 
 
रिझवी पुढे म्हणतात की, भारतामध्ये अशा एकंदर ९ वास्तू आहेत ज्या मंदिरांच्या जागेवर बांधल्या आहेत असे इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर समजते. त्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर, मथुरेचे केशव देव मंदिर, जौनपूरचे अटाला देव मंदिर, काशीचे विश्वनाथ मंदिर, गुजरातमधील बटना येथील रुद्र महालय मंदिर, अहमदाबाद येथील भद्रकाली मंदिर, पश्चिम बंगालमधील पंडुवा येथील अदीना मस्जिद, विदिशा मध्यप्रदेश येथील विजया मंदिर आणि दिल्लीतील कुतुब मिनार या वास्तूंचा त्यात समावेश आहे.
 

 
 
 
देशभरातील सर्व मुल्ला मौलवी हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत, तसेच काही कडव्या विचारांचे मुस्लिमही याचे सदस्य असल्यामुळे आपल्या प्रस्तावाला कठोर विरोध होणार आहे याची आपल्याला पुरेशी कल्पना असल्याचे रिझवी यांनी पत्रात म्हटले आहे. परंतु विरोधकांच्याही पंचायतीमध्ये आपले म्हणणे मांडले पाहिजे या इस्लामी संकेतानुसार आपण आपले म्हणणे मांडत असल्याचे रिझवी यांनी पत्रात लिहिले आहे. आपल्या पत्राच्या शेवटी देखील त्यांनी पुन्हा हाच प्रश्न उपस्थित केला आहे की ज्या प्रार्थनास्थळामध्ये अन्य धर्माची उपासना चालते त्या ठिकाणी मशिद बांधून आपण शरियाच्या नियमाप्रमाणे प्रार्थना करू शकतो का याचे उत्तर बोर्डाने द्यावे. अयोध्या राम मंदिराचा न्यायालयीन खटला अंतिम टप्प्यात आला असतानाच वसीम रिझवी यांच्या या स्पष्ट पत्राचा काय परिणाम होतो याकडे मुस्लिम तसेच हिंदू जगताचेही लक्ष लागले आहे.
@@AUTHORINFO_V1@@